बिबट्याच्या डरकाळ्यांनी हादरले पाथर्डी

बिबट्याच्या डरकाळ्यांनी हादरले पाथर्डी

इंदिरानगर,(नाशिक) : पाथर्डी शिवारात उसाच्या शेतातून डरकाळ्या फोडणार्‍या बिबट्यामुळे आज (गुरुवार) परिसरात दहशत पसरली. पाथर्डी गावातून वाडीचे रान भागात जाताना तुषार डेमसे यांचा चार एकर उसाचा प्लॉट आहे. दुपारी येथूनच बिबट्याने डरकाळ्या फोडण्यास सुरवात केल्याने त्यांच्यासह आसपासचे शेतकरी आपापल्या घरात गेले. जे कामानिमित्त शहरात आले होते, त्यांनाही तातडीने फोनवर माहिती देण्यात आली. तब्बल अर्धा तास या डरकाळ्या सुरू होत्या. त्यामुळे सर्वजण कमालीचे भेदरले होते. याबाबत वनविभागाला माहिती दिल्यानंतर वनविभागाचे कर्मचारी पाटील यांनी येथे भेट देऊन प्रत्यक्ष माहिती घेतली. सर्वांनी याबाबत सांगितल्यानंतर उद्या 22 ला येथे पिंजरा बसविण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

5 मार्चला याच भागात राहणारे बाळासाहेब डेमसे यांच्या नातवाच्या बारशाच्या कार्यक्रमासाठी जाणारे वासुदेव सूर्यवंशी आणि कुटुंबीयांनी त्यांच्या कारमधून जाताना रस्त्यावर बिबट्या दिसला होता. माजी नगरसेवक संजय नवले यांनीही त्याचवेळी तो बघितला होता. त्यामुळे हा बिबट्या तोच असावा, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

काल रात्री पाथर्डी सोसायटीचे माजी अध्यक्ष बाकेराव डेमसे यांच्या शेताजवळ देखील बिबट्या बघितल्याचा दावा ग्रामस्थांनी केला आहे. आज सकाळी पांडवलेणी येथे ट्रेकिंगसाठी गेलेल्या सिडकोतील गणेश पानसरे या युवकावर बिबट्याने हल्ला केला. मात्र, मित्रांच्या सतर्कतेमुळे त्याला पिटाळण्यात यश आले. हा बिबट्या तेथून थेट शेतात आला, की काय अशी शंकाही उपस्थित करण्यात येत आहे.

दरम्यान, या भागातील पूर्वानुभव लक्षात घेता ज्यावर्षी पाण्याची कमतरता भासते आणि वालदेवी नदी आणि परिसर कोरडा होतो. त्यावेळी या बिबट्यांचे मोठ्या प्रमाणात पाथर्डी दाढेगाव, पिंपळगाव मार्गे शहरी भागात आगमन होण्याचा पूर्वइतिहास आहे. याच भागातून येणारे बिबटे इंदिरानगर भागातील मोदकेश्वर मंदिर परिसर तसेच मुंबई नाक्यावरील रसोई होटेल आदी भागापर्यंत आले होते, अशा आठवणी नागरिकांनी या निमित्ताने सांगितल्या आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com