बोगस डॉक्‍टरकडून रुग्णांची तपासणी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 2 मार्च 2017

कोण हा सीताराम?
सीतारामसारखे बोगस डॉक्‍टर चांदवड तालुक्‍यात अथवा जिल्ह्यातील रुग्णालयात कार्यरत असण्याची शक्‍यता आहे. या बोगस डॉक्‍टरला उपजिल्हा रुग्णालय पाठीशी घालण्याचे काम करत आहे. हा बोगस डॉक्‍टर सीताराम कोण?, कुठला? त्याचे रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांशी असलेले संबंध, याची सखोल चौकशी होऊन अशा सर्वसामान्यांच्या जिवाशी खेळणाऱ्या बोगस डॉक्‍टर व वैद्यकीय अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई मागणी जोर धरत आहे.

चांदवड - चांदवड उपजिल्हा रुग्णालयात बाह्यरुग्ण तपासणी कक्षात वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या वरदहस्ताने वैद्यकीय शाखेची पदवी नसलेला बोगस डॉक्‍टर रुग्णांची तपासणी करत असल्याचा प्रकार उघडकीस आला.

आज (ता. १) बाह्यरुग्ण तपासणी कक्षात प्रमोद निकम हे दहा वर्षांचा मुलगा यशला तपासणीसाठी घेऊन आले असता, त्यांना कक्षात डॉक्‍टरांच्या खुर्चीवर बसून तपासणी करणाऱ्या डॉक्‍टरांविषयी शंका आली. त्यांनी रुग्ण कल्याण समिती सदस्य तुकाराम सोनवणे यांना रुग्णालयात बोलावले. श्री. सोनवणे यांनी माहिती घेतल्यानंतर ही व्यक्ती बोगस डॉक्‍टर असल्याचे उघडकीस आले. त्यानंतर बोगस डॉक्‍टरने तेथून पळ काढला. याबाबत वैद्यकीय अधिकारी अभिजित नाईक यांना विचारले असता, त्यांनी हा बोगस डॉक्‍टर रुग्णालयास कायम सहकार्य करत असल्याचा अजब खुलासा करत बोगस डॉक्‍टरला समर्थन असल्याची कबुली दिली. दरम्यान, उशिराने प्रगटलेल्या वैद्यकीय अधीक्षक मंदाकिनी बर्वे यांना रुग्ण कल्याण समितीचे सोनवणे व उपस्थित रुग्णांनी घडल्या प्रकाराबाबत विचारणा केली असता, श्रीमती बर्वे यांनी असे प्रकार होतच राहतात; शेवटी आम्ही माणसंच आहोत, असे बेजाबदार वक्तव्य करत उपस्थितांना अचंबित केले. नंतर घडलेल्या प्रकारची सारवासारव करत बोगस डॉक्‍टरविरुद्ध पोलिसांत तक्रार करू, असे सांगत उपस्थितांची बोळवण केली.

येथील उपजिल्हा रुग्णालयात तालुक्‍यातील ११२ गावांतून रुग्ण उपचारासाठी येतात; परंतु येथे राजरोस रुग्णांच्या जिवाशी खेळण्याचा जीवघेण्या खेळावर नियंत्रण कुणाचे? लोकप्रतिनिधी नावापुरतेच उरले का?, अशी भावना सर्वसामान्यांमध्ये पसरली आहे. यावर आता तरी कारवाई होईल का?, की एखाद्या निष्पाप व्यक्तीचा बळी गेल्यावर लोकप्रतिनिधी व प्रशासनाला जाग येणार?, असे प्रश्‍न उपस्थित होत आहेत. चांदवड उपजिल्हा रुग्णालयाचा कारभार नेहमीच चर्चेचा विषय राहिला आहे. वैद्यकीय अधिकारी मुख्यालयी न राहणे, वैद्यकीय सेवेसाठी ठराविक व्यक्तीकडून पैसेवसुली, एजंटांचा रुग्णालय परिसरात वाढता प्रभाव, सर्वांत महत्त्वाचे म्हणजे वैद्यकीय अधीक्षक मंदाकिनी बर्वे यांची कार्यपद्धती, त्या कधी वेळेवर हजर राहत नसल्याने इतरांचा प्रश्‍नच उद्‌भवत नाही, रुग्णालयात वैद्यकीय अधिकाऱ्याच्या संख्येबाबत, तसेच उपलब्ध सोयी-सुविधांबाबत असणारा गोंधळ, औषध विभागात पुरेसा साठा असूनदेखील औषधसाठ्याचा तुटवडा असल्याचा बनाव करणे, ज्येष्ठ नागरिकांना दाखला देण्यासाठी दिवसभर थांबवणे, रुग्णालयातील कर्मचाऱ्यांशी समन्वयाचा असलेला मोठा अभाव, त्यातल्या त्यात आज घडलेल्या प्रकाराने तर बेफिकिरीचा कळसच गाठला आहे.

कोण हा सीताराम?
सीतारामसारखे बोगस डॉक्‍टर चांदवड तालुक्‍यात अथवा जिल्ह्यातील रुग्णालयात कार्यरत असण्याची शक्‍यता आहे. या बोगस डॉक्‍टरला उपजिल्हा रुग्णालय पाठीशी घालण्याचे काम करत आहे. हा बोगस डॉक्‍टर सीताराम कोण?, कुठला? त्याचे रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांशी असलेले संबंध, याची सखोल चौकशी होऊन अशा सर्वसामान्यांच्या जिवाशी खेळणाऱ्या बोगस डॉक्‍टर व वैद्यकीय अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई मागणी जोर धरत आहे.

Web Title: Patients checking from bogus doctor