कळवणच्या सभापतिपदी पाच वर्षांत पाच सदस्यांना संधी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 2 मार्च 2017

पवार दांपत्याची हॅट्ट्रिक
पंचायत समितीत नितीन पवार व जयश्री पवार यांनी २००७ मध्ये प्रवेश केला. पंचायत समितीच्या सभापतिपदाची संधी नितीन पवार यांना दोन वेळा मिळाली. २०१२ मध्ये पवार दांपत्याने नाशिक जिल्हा परिषदेत प्रवेश केला. जिल्हा परिषद अध्यक्षपदाची संधी जयश्री पवार यांना मिळून जिल्हा परिषदेचे अडीच वर्षे राजकारण पवार दांपत्याभोवती फिरले. २०१७ च्या निवडणुकीत पवार दांपत्याने विरोधकांची अनामत जप्त करून जिल्हा परिषदेत दुसऱ्यांदा प्रवेश करीत विजयाची हॅट्ट्रिक पूर्ण केली आहे. विजयाची हॅट्ट्रिक करणारे जिल्ह्यातील ते एकमेव दांपत्य ठरले आहे.

कळवण - तालुका १०० टक्के आदिवासी असून, आदिवासी उपयोजनेत समाविष्ट आहे. येथील पंचायत समितीचे सभापतिपद हे अनुसूचित जमातीसाठी राखीव असून, बापखेडा वगळता पंचायत समितीच्या खर्डेदिगर, मोकभणगी, निवाणे, मानूर, कनाशी या गणांना संधी मिळणार आहे. पाच वर्षांत पाच जणांना संधी देण्याचे धोरण अवलंबिले जाण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे.

पंचायत समिती सभापती व उपसभापतिपदाच्या निवडीसाठी नितीन पवार यांची भूमिका निर्णायक ठरणार आहे. २००२ पासून पंचायत समितीच्या सत्तेची सूत्रे माजी मंत्री ए. टी. पवार व जिल्हा परिषदेचे सदस्य नितीन पवार यांच्याकडे आहे. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत पंचायत समितीची एकहाती सत्ता राष्ट्रवादी काँग्रेसने मिळविली आहे. 

पंचायत समितीत मागील पंचवार्षिकमध्ये ‘राष्ट्रवादी’चे संख्याबळ चार असल्याने सहयोगी सदस्याचा टेकू घेऊन पाच वर्षे कारभार करावा लागला होता. आता सदस्य संख्या दोनने वाढली असून, आठपैकी सहा जागा राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाल्याने जिल्हा परिषदेचे सदस्य नितीन पवार यांची भूमिका ‘किंगमेकर’ म्हणून राहणार आहे. पंचायत समितीत काँग्रेसचे संख्याबळ घटले असून, तीनवरून ते दोन झाले आहे. सभापतिपद अनुसूचित जमातीसाठी राखीव असल्याने मोकभणगी, खर्डेदिगर या दोन गणांतून पुरुष सदस्य; तर मानूर, कनाशी, निवाणे गणातून स्त्री सदस्य असे अनुसूचित जमाती जागेवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे पाच सदस्य निवडून आले आहेत. 

सभापतिपदासाठी या पाच सदस्यांची नावे समोर असून, पाच वर्षांत पाच जणांना संधी देण्याचे धोरण अवलंबिले जाण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे. उपसभापतिपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या बापखेडा गणातील विजय शिरसाठ यांचे नाव अग्रस्थानी आहे.

पवार दांपत्याची हॅट्ट्रिक
पंचायत समितीत नितीन पवार व जयश्री पवार यांनी २००७ मध्ये प्रवेश केला. पंचायत समितीच्या सभापतिपदाची संधी नितीन पवार यांना दोन वेळा मिळाली. २०१२ मध्ये पवार दांपत्याने नाशिक जिल्हा परिषदेत प्रवेश केला. जिल्हा परिषद अध्यक्षपदाची संधी जयश्री पवार यांना मिळून जिल्हा परिषदेचे अडीच वर्षे राजकारण पवार दांपत्याभोवती फिरले. २०१७ च्या निवडणुकीत पवार दांपत्याने विरोधकांची अनामत जप्त करून जिल्हा परिषदेत दुसऱ्यांदा प्रवेश करीत विजयाची हॅट्ट्रिक पूर्ण केली आहे. विजयाची हॅट्ट्रिक करणारे जिल्ह्यातील ते एकमेव दांपत्य ठरले आहे.

Web Title: Pawar couple hat-trick