'वसाका'त अडकले गिरणा परिसरातील ऊस उत्पादकांचे पेमेंट!

शिवनंदन बाविस्कर
शनिवार, 26 मे 2018

शेतकरी आर्थिक अडचणीत...
खरीप हंगाम तोंडावर येऊन ठेपला आहेत. सर्वत्र शेती तयार करण्याच्या कामांना वेग आला आहे. ज्या शेतकऱ्यांचे पेमेंट अडकले आहे, अशांना शेती कामांत निर्माण झालेल्या आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. काही जणांकडे तर अक्षरशः बियाणे खरेदीला देखील पैसे नाहीत. त्यामुळे कारखान्याने लवकरात लवकर ऊस उत्पादकांची देणी द्यावीत, अशी मागणी होत आहे. 

पिलखोड(ता. चाळीसगाव) : विठेवाडीच्या 'वसाका'त 2017-18 च्या गाळप हंगामात ऊस पुरवठा करणाऱ्या गिरणा परिसरातील शेतकऱ्यांचे पाच ते सहा महिन्यांचे पेमेंट अडकले आहे. पेमेंटसाठी कारखान्यातर्फे टोलवाटोलवी केली जात असल्याने शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती कोलमोडली आहे. कारखान्याच्या वाटा तुडवत शेतकरी हतबल झाले आहेत.

विठेवाडी(ता. देवळा, जि. नाशिक) येथील वसंतरावदादा पाटील सहकारी साखर कारखान्याचे मुख्य प्राधिकृत अधिकारी आमदार डॉ. राहुल आहेर यांनी गाळप हंगामापूर्वी परिसरातील गावांमध्ये बैठका घेतल्या होत्या. बैठकीत शेतकऱ्यांच्या ऊसाला पहिली उचल दोन हजार 300 रुपये देण्याचे आश्वासन दिले होते. या आश्वासनामुळे पिलखोडसह परिसरातील सायगाव, मांदुर्णे, तामसवाडी, उपखेड आदी गावातील सुमारे दीडशे शेतकऱ्यांनी 'वसाका'ला ऊस दिला. 

पेमेंट अडकले....
ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे पाच ते सहा महिन्यांपासूनचे पेमेंट अडकले आहे. शिवाय ठरलेल्या भावाप्रमाणे अद्यापही पेमेंट मिळाले नसल्याचे शेतकऱ्यांनी 'सकाळ'ला सांगितले. त्यांच्या म्हणण्यानुसार, 15 डिसेंबरपर्यंत कारखान्यातर्फे काही शेतकऱ्यांचे दोन हजार 100 ते एक हजार 900 रुपयांपर्यंत पेमेंट करण्यात आले. त्यानंतर 31 डिसेंबरपर्यंत एक हजार रुपयांप्रमाणे पेमेंट केले गेले. जानेवारीनंतर दिलेल्या उसाचे अद्यापपर्यंत पेमेंट मिळालेले नाही.

आश्वासनांचा फुसका बार...
परिसरातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना कारखान्यातर्फे आश्वासनांवर आश्वासने दिली जात आहेत. आतापर्यंत चार ते पाच वेळा दिलेली आश्वासने पोकळ ठरली आहेत. संतप्त शेतकऱ्यांनी 15 मेस कारखान्याला कुलुप ठोकले होते. 24 मेस 'वसाका' कार्यस्थळावर ऊस उत्पादक शेतकरी, सभासद व प्राधिकृत मंडळाची बैठक झाली. त्यानूसार, त्या दिवशी कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादकांसह चाळीसगाव, मालेगाव, धुळे, नंदुरबार, शिरपुर, शहादा भागातले शेतकरी कारखान्यावर एकत्र आले. यावेळी कारखान्यातर्फे 15 ऑगस्टपर्यंत सर्व ऊस उत्पादकांची थकीत देणी दिली जातील, असे आश्वासन 'वसाका'चे मुख्य प्राधिकृत अधिकारी आमदार डॉ. राहुल आहेर यांनी दिले. आता दिलेले हे आश्वासन कितपत खरे ठरते, याबाबत ऊस उत्पादकांच्या मनात साशंकता आहे.

शेतकरी आर्थिक अडचणीत...
खरीप हंगाम तोंडावर येऊन ठेपला आहेत. सर्वत्र शेती तयार करण्याच्या कामांना वेग आला आहे. ज्या शेतकऱ्यांचे पेमेंट अडकले आहे, अशांना शेती कामांत निर्माण झालेल्या आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. काही जणांकडे तर अक्षरशः बियाणे खरेदीला देखील पैसे नाहीत. त्यामुळे कारखान्याने लवकरात लवकर ऊस उत्पादकांची देणी द्यावीत, अशी मागणी होत आहे. 

Web Title: payment issue in Chalisgaon farmers