स्थानिक करांचा भरणा जुन्या नोटांच्या स्वरूपात - रुबल अग्रवाल

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 11 नोव्हेंबर 2016

जळगाव - केंद्र सरकारने रद्द केलेल्या पाचशे व हजाराच्या चलनी नोटांच्या स्वरूपात स्थानिक संस्था कर अर्थात मालमत्ताकर व वीजबिले स्वीकारण्यात येतील. यासंबंधी महावितरण तसेच पालिकांना सूचना देण्यात आल्या आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल यांनी दिली. शिवाय या करांच्या रकमा उद्या (११ नोव्हेंबर) मध्यरात्रीपर्यंत स्वीकारण्यात येतील, असेही कळविले आहे. 

केंद्र सरकारने पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा व्यवहारातून बाद केल्या आहेत. या पार्श्‍वभूमीवर जनतेकडून पाणी, वीज, मालमत्ताकर यासह इतर शासकीय देयकांचा भरणा करताना पाचशे आणि हजार रुपयांच्या जुन्या चलनी नोटा ११ नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत स्वीकारण्याची परवानगी केंद्र शासनाने राज्य शासनाला दिली आहे. 

त्यामुळे राज्य शासनाच्या नगरविकास विभागाने एका परिपत्रकाद्वारे शुक्रवारी (११ नोव्हेंबर) मध्यरात्रीपर्यंत जुन्या चलनी नोटांच्या स्वरूपात नागरिकांकडून करांचा भरणा स्वीकारण्यास अनुमती दिली आहे. नागरिकांनी आता या संधीचा लाभ घ्यावा व आपले कर जुन्या चलनी नोटांच्या स्वरूपात भरावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी अग्रवाल यांनी केले आहे.
 
अशा आहेत अटी
यासाठी करांची मागणी आठ नोव्हेंबरपूर्वी केलेली असावी. ही रक्कम विवादित नसावी. तसेच प्रतिसाक्षीत रकमेचा भरणा करून घेता येणार नाही. तसेच या स्वरूपात होणारा भरणा हा नापरतावा असेल, अशा सूचनाही शासनाने निर्गमित केल्या आहेत. जिल्ह्यातील महापालिका, नगर परिषदा, नगरपंचायती यांनी नागरिकांना वरील करांचा भरणा करता यावा, यासाठी आवश्‍यक प्रशासकीय सुविधा कराव्यात, असे निर्देशही शासनाने दिले आहेत. नागरिकांनी या सुविधेचा लाभ घेऊन आपले कर जुन्या चलनात भरावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी श्रीमती अग्रवाल यांनी केले आहे.

Web Title: Payment of old currency in the form of local taxes