Abhay Yojana : शास्तीमाफी योजना; मुदत संपताच कर भरणाऱ्यांची ‘ओहोटी’!
धुळे : मालमत्ता कर थकबाकीवरील (Arrears) शास्तीमाफी योजनेची मुदत संपली असून, या मुदतीत महापालिकेच्या तिजोरीत पावणेसहा कोटी रुपये जमा झाले. (Penalty amnesty scheme has expired deposit of Rs 5 crores in treasury of Municipal Corporation within term dhule news)
दरम्यान, शास्तीमाफीची मुदत संपल्याबरोबर थकबाकीदारांसह नियमित कर भरणाऱ्यांची संख्याही रोडावल्याचे चित्र पाहायला मिळाले. त्यामुळे महापालिका प्रशासन आता कारवाईचा धडाका सुरू करेल की पुन्हा शास्तीमाफी योजना जाहीर करेल याकडे लक्ष असणार आहे.
मालमत्ता कर थकबाकीवरील शास्ती अर्थात दंडाच्या रमकमेवर शंभर टक्के सवलत देण्याचा निर्णय महापालिका आयुक्तांनी घेतला. सुरवातीला ६ ते ११ फेब्रुवारी अशा सहा दिवसांसाठी ही योजना होती. या सहा दिवसांत अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याच्या पार्श्वभूमीवर योजनेला मुदतवाढ देण्यात आली.
त्यामुळे १२ ते २८ फेब्रुवारीदरम्यान योजनेचा दुसरा टप्पा सुरू झाला. या दुसऱ्या टप्प्यात मात्र थकबाकीदारांचा बऱ्यापैकी प्रतिसाद मिळाल्याचे पाहायला मिळाले. काही दिवस कर भरण्यासाठी महापालिकेत रांगा लागल्याचे चित्रही होते. ६ ते २३ फेब्रुवारीदरम्यान एकूण चार हजार ७६३ थकबाकीदारांनी योजनेचा लाभ घेतला होता. त्यातून चार कोटी ४६ लाख ३१ हजार ७५ रुपये महापालिकेच्या तिजोरीत जमा झाले होते. नंतरच्या पाच दिवसांत यात पुन्हा वाढ झाली.
हेही वाचा : कॅशबॅक किंवा खरेदीवर सूट मिळणारंच कार्ड निवडा...
पावणेसहा कोटी जमा
योजनेच्या पहिल्या व दुसऱ्या टप्प्यात अर्थात ६ ते २८ फेब्रुवारी या २३ दिवसांत महापालिकेच्या तिजोरीत पाच कोटी ७६ लाख रुपये जमा झाले. या कालावधीत सहा हजारांवर थकबाकीदारांनी योजनेचा लाभ घेतला. योजनेचा लाभ घेणाऱ्या या सहा हजारांवर थकबाकीदारांची तब्बल तीन कोटी ५८ लाख रुपये शास्ती योजनेमुळे माफ झाली.
मुदत संपल्यानंतर गळती
योजनेचा कालावधी संपल्यानंतर मालमत्ता कर भरणाऱ्यांची गळती सुरू झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. बुधवारी (ता. १) केवळ दीड-दोन लाख रुपयेच मालमत्ता कर जमा झाल्याची माहिती मिळाली. त्यामुळे महापालिकेपुढे मोठा प्रश्न उभा राहिला आहे.
प्रारंभी योजनेनंतर थकबाकीदारांवर धडक व कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा महापालिका प्रशासनाकडून देण्यात आला होता. मात्र, शास्तीमाफी योजनेनंतर कर भरणाऱ्यांची संख्या अगदीच रोडावल्याने आता महापालिका प्रशासन कारवाई सुरू करणार की पुन्हा शास्तीमाफी योजनेचाच आधार घेणार याकडे लक्ष असणार आहे.
मार्चअखेर कसरत
मार्चअखेर जास्तीत जास्त कर वसुलीचे लक्ष्य महापालिका प्रशासनापुढे असणार आहे. त्यामुळे उपलब्ध मनुष्यबळ व मिळणारा कालावधी याचा मेळ घालत कोणत्या मार्गाने जास्तीत जास्त कर वसुली होईल याकडे प्रशासनाला लक्ष घालावे लागणार आहे. अन्यथा पुन्हा थकबाकीचा बोजा वाढणार आहे.---
शास्तीमाफीची स्थिती अशी
- योजनेचा कालावधी......... ६ ते २८ फेब्रुवारी
- मनपा तिजोरीत जमा रक्कम...५,७६,२१,२३०
- शास्तीद्वारे सूट..................३,५८,५०,४४५
- लाभार्थी थकबाकीदार...................६,१४८
- ऑनलाइन कर भरणारे......................९३१