मुले चोरणारे निघाले बहुरूपी 

दीपक कच्छवा
शनिवार, 16 जून 2018

विसापूर तांडा ग्रामस्थांनी आज दाखवलेली सतर्कता कौतुकास्पद आहे. गावात कोणीही अनोळखी व्यक्ती फिरताना दिसल्यास तातडीने पोलिसांना कळवावे. कायदा हातात न घेता, अनोळखींची माहिती पोलिसांना कळवावी. 
- दिलीप शिरसाठ, सहाय्यक पोलिस निरीक्षक. मेहुणबारे.

मेहुबारे (ता. चाळीसगाव) : गेल्या काही दिवसांपासून मुले चोरणारी टोळी सक्रिय असल्याचा मेसेज सोशल मिडियावरुन "व्हायरल' झाला आहे. त्यामुळे सर्वत्र भीती पसरली आहे. अशातच आज सकाळी नऊच्या सुमारास विसापूर तांडा (ता. चाळीसगाव) गावात मुले चोरणाऱ्या सहा जणांची टोळी चारचाकी वाहनासह आल्याची माहिती ग्रामस्थांना मिळाली. या टोळीला मुले चोरणारे समजून गावकऱ्यांनी चांगलाच चोप दिला व पोलिस येईपर्यंत ग्रामपंचायत कार्यालयात त्यांना कोंडून ठेवले. चौकशीअंती महिलेच्या वेशातील सहाही जण बहुरूपी निघाले. 

याबाबत माहिती अशी, विसापूर तांडा भागात आज सकाळी आठच्या सुमारास इंडिका (एम. एच. 14, बीए- 3833) गाडीत महिलांचा पेहराव केलेले सहा जण आले. त्यांनी गावात काही वेळ पाहणी केली व पुढे पिंपळवाडी, दरेगाव व लोंढे या गावात फिरून पुन्हा ते गाडीने विसापूर तांडा येथे आले. गावात पुन्हा ते आल्याने ग्रामस्थांना संशय आला. अगोदरच "व्हॉट्‌स ऍप'वर मुले चोरणारी फासे पारधी लोकांची टोळी फिरत असल्याचा मेसेज अनेकांनी वाचला होता. त्यामुळे ही ती टोळी तर नाही ना? असा संशय ग्रामस्थांना आला व सर्वांनी एकच आरडाओरड करून सहाही जणांना पकडले व त्यांना चांगलाच चोप दिला. पकडलेल्या टोळक्‍याच्या गाडीच्या काचेची तोडफोडही जमावाने केली. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, म्हणून या सर्वांना ग्रामपंचायत कार्यालयात डांबून ठेवण्यात आले. 

घटनास्थळी पोलिस दाखल 
मेहुणबारे पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच, सहायक पोलिस निरीक्षक दिलीप शिरसाठ आपल्या सहकाऱ्यांसह गावात आले. ग्रामपंचायत कार्यालयात कोंडून ठेवलेल्या सहाही जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. या दरम्यान मुले पकडणारे सापडल्याची अफवा पसरली. आमदार उन्मेष पाटील यांनाही ही घटना समजताच त्यांनी गावात येऊन ग्रामस्थांची समजूत काढली. यावेळी नगरसेवक संजय पाटील व पदाधिकारी उपस्थित होते. 

अन निघाले बहुरूपी 
पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या सहाही जणांची कसून चौकशी केल्यानंतर ते गावोगावी भिक्षा मागणारे बहुरूपी निघाले. पोटाची खळगी भरण्यासाठी ते वेशांतर करीत असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले. भीमराव साळुंके (वय 40), भवानी सोळंके (21), गणेश सावंत (21, तिघे रा. मुक्ताईनगर), सुरेश सावंत (22, रा. पिंगळी, ता. संग्रामपूर, जि. बुलढाणा) मंगल शिंदे (44, रा. दोलरखेडा ता. मुक्ताईनगर) व आकाश सावंत (21, रा. पिंगळी, ता. संग्रामपूर) अशी संशयितांची नावे आहेत. पोलिसांनी या सर्वांवर दंडात्मक कारवाई केली आहे. या सहाही जणांचा बहुरुपीचा पिढीजात व्यवसाय असून त्यावरच त्यांचा उदरनिर्वाह चालत असल्याचे पोलिसांनी सांगितले. सहाय्यक पोलिस निरीक्षक दिलीप शिरसाठ यांनी या संदर्भात मुक्ताईनगर पोलिस ठाण्यातही संपर्क साधला असता, ते कुठल्याही गुन्हेगारी पार्श्‍वभूमीचे नसून या सर्वांकडे रेशनकार्ड, आधारकार्ड असल्याचे त्यांनी सांगितले. 

ग्रामस्थांची दगडफेक 
ग्रामपंचायत कार्यालयातून सहाही बहुरुपींना बाहेर काढल्यानंतर त्यांच्यावर जमावाने दगडफेक केली. सुदैवाने यात कोणाला काही इजा झाली नाही. त्यामुळे गावात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. आमदार उन्मेष पाटील यांनी ग्रामस्थांना शांतता राखण्याचे आवाहन केल्यानंतर तणाव निवळला. 

विसापूर तांडा ग्रामस्थांनी आज दाखवलेली सतर्कता कौतुकास्पद आहे. गावात कोणीही अनोळखी व्यक्ती फिरताना दिसल्यास तातडीने पोलिसांना कळवावे. कायदा हातात न घेता, अनोळखींची माहिती पोलिसांना कळवावी. 
- दिलीप शिरसाठ, सहाय्यक पोलिस निरीक्षक. मेहुणबारे.

Web Title: people beaten criminal in Chalisgaon