नामपूर शहरात मतदानाचा टक्का घसरला 

प्रशांत बैरागी - सकाळ वृत्तसेवा 
गुरुवार, 23 फेब्रुवारी 2017

नामपूर - गटात सर्वच राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी जिवाचे रान करून प्रचार केल्यानंतरही गटातील विविध गावांमध्ये मतदानाचा टक्का घसरल्याचे चित्र पाहायला मिळाले. सर्वाधिक साडेदहा हजार मतदार असलेल्या नामपूर शहरात केवल 47 टक्के मतदान झाले. घटलेले मतदान फायदेशीर ठरणार की घातक, याचाही अंदाज घेण्याचे काम दिवसभर सुरू होते. 

नामपूर - गटात सर्वच राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी जिवाचे रान करून प्रचार केल्यानंतरही गटातील विविध गावांमध्ये मतदानाचा टक्का घसरल्याचे चित्र पाहायला मिळाले. सर्वाधिक साडेदहा हजार मतदार असलेल्या नामपूर शहरात केवल 47 टक्के मतदान झाले. घटलेले मतदान फायदेशीर ठरणार की घातक, याचाही अंदाज घेण्याचे काम दिवसभर सुरू होते. 

नामपूर जिल्हा परिषद गटात दहा वर्षांपासून भारतीय जनता पक्षाचा एकछत्री अंमल आहे. भाजपकडून 2007 मध्ये टेंभे येथील एकलव्य सेनेचे कार्यकर्ते विक्रम मोरे व 2012 मध्ये सुनीता पाटील यांनी गटाचे नेतृत्व केले. यंदा भाजपकडून निवडणूक लढविण्यासाठी अनेक इच्छुक होते. भाजपच्या गटातील पोषक वातावरणामुळे कॉंग्रेसचे विधानसभा निवडणुकीतील उमेदवार तथा ज्येष्ठ नेते सोमनाथ सोनवणे यांनी निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये प्रवेश केला. मोराणे येथील भाजप आदिवासी आघाडीचे तालुकाध्यक्ष तथा निष्ठावान कार्यकर्ते कन्हू गायकवाड यांना भाजपने उमेदवारी बहाल केल्याने नाराज झालेले सोमनाथ सोनवणे शिवसेनेकडून रणांगणात उतरले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने निवृत्त पशुसेवक राजाराम अहिरे यांची उमेदवारी सर्वप्रथम जाहीर करून प्रचारात आघाडी घेतली होती. तालुक्‍यात राजाराम अहिरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे एकमेव उमेदवार आहेत. मनसेचे तालुकाध्यक्ष तथा पंचायत समितीचे सदस्य सतीश विसपुते, जिल्हा उपाध्यक्ष मनोज सोनवणे यांच्यासह तालुका कार्यकारिणी व कार्यकर्त्यांनी सारा मतदारसंघ पिंजून काढत गटात तगडे आव्हान निर्माण केले. 

राष्ट्रवादी कॉंग्रेसने ग्रामपंचायतीचे माजी सदस्य नंदू शिंदे यांना उभे केले. सोमनाथ सोनवणे यांच्या शिवसेना व्हाया भाजप प्रवेशामुळे कॉंग्रेसला उमेदवाराची शोधाशोध करावी लागली. ऐनवेळी मनसेचे वाहतूक शाखेचे अध्यक्ष शरद पवार यांना कॉंग्रेसने उमेदवारी दिली. जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी यंदा प्रथमच कॉंग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना आणि भाजप यांच्यासह विविध छोटे पक्ष, अपक्ष उमेदवारही रिंगणात होते. त्यामुळे प्रचाराच्या काळात मतदारांचीही करमणूक झाली. गेली दहा वर्षे शिवसेनेच्या युतीमुळे भाजपला यशाची फळे चाखता आली. परंतु, यंदा शिवसेनेने स्वतंत्र उमेदवार दिल्याने भाजपची वाट बिकट बनली आहे. विशेष बाब म्हणजे भाजपच्या विद्यमान जिल्हा परिषद सदस्या सुनीता पाटील यांचे पती नामपूर गटातील आरक्षणाच्या फटक्‍यामुळे शेजारील जायखेडा गटातील भाजपचे उमेदवार होते. त्यामुळे निवडणूक काळात सुनीता पाटील यांना प्रचाराकडे फारसे लक्ष देता आले नाही. नोटाबंदीचा परिणाम, आरक्षित झालेला मतदारसंघ, मतदान केंद्रापर्यंत वाहतूक व्यवस्थेचा अभाव, मतदारयाद्यांमधील घोळ आदींमुळे मतदानाचा टक्का घसरल्याचे बोलले जाते. गट, गणातील उमेदवारांचे समर्थक आता आकडेमोड करण्यात व्यस्त झाले आहेत. त्यामुळे नामपूर गटातील निकालांकडे तालुक्‍याचे लक्ष लागले आहे. जिल्हा परिषदेसाठी नामपूर गटात सरासरी 55 टक्के मतदान झाले. 

Web Title: Percent down vote