गोदावरी स्वच्छतेसाठी आता कायमस्वरूपी कर्मचारी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 18 मे 2017

नाशिक - गोदावरी घाटाच्या स्वच्छतेसाठी असलेल्या गोदावरी संवर्धन कक्षाकरिता आता कायमस्वरूपी स्वच्छता कर्मचारी देण्यात येणार आहेत, अशी माहिती महापालिका आयुक्त अभिषेक कृष्णा यांनी दिली. महापौरांच्या अचानक भेटीने स्वच्छतेचे पितळ उघड पडले. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला.

नाशिक - गोदावरी घाटाच्या स्वच्छतेसाठी असलेल्या गोदावरी संवर्धन कक्षाकरिता आता कायमस्वरूपी स्वच्छता कर्मचारी देण्यात येणार आहेत, अशी माहिती महापालिका आयुक्त अभिषेक कृष्णा यांनी दिली. महापौरांच्या अचानक भेटीने स्वच्छतेचे पितळ उघड पडले. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला.

स्वच्छ भारत अभियानांतर्गत नाशिक शहराचा क्रमांक घसरल्यानंतर स्वच्छतेवर विशेष लक्ष केंद्रित करण्यासाठी महापौर रंजना भानसी यांनी गंगाघाटावर अचानक भेट देत स्वच्छतेचा आढावा घेतला. महापौरांच्या भेटीत त्यांना गोदाघाट स्वच्छतेचे कर्मचारी जागेवर आढळून आले नाहीत. ठिकठिकाणी कचरा साचलेला दिसला. यामुळे महापौरांनी आरोग्य अधिकाऱ्यांना चांगलेच सुनावले. यानंतर महापालिका आयुक्तांनी याप्रश्‍नी बैठक घेत गैरहजर कर्मचाऱ्यांबाबत आरोग्य अधिकाऱ्यांकडून आढावा घेतला. स्वच्छता कर्मचाऱ्यांना केवळ गोदाघाटाचा परिसर स्वच्छ करायचा नसून, त्याचा व्याप मोठा असल्याचे आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले. यावर तोडगा काढत महापालिका आयुक्तांनी गोदावरी संवर्धन कक्षाकरिता स्वतंत्र स्वच्छता कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याचे सांगितले. हे स्वच्छता कर्मचारी 19 किलोमीटर परिसरात असलेल्या गोदाकाठासाठी 50 मीटरच्या परिक्षेत्रातील स्वच्छता करणार आहेत. यासाठी स्वतंत्र 60 कर्मचाऱ्यांची निवड करण्यात येणार आहे. ते गोदावरी संवर्धन कक्षास जोडले जातील. त्यांच्यावर नियंत्रणासाठी एक स्वच्छता निरीक्षक आणि दोन उपविभागीय स्वच्छता निरीक्षक यांचीही नियुक्ती केली जाणार आहे.

दोन दिवसांत अहवाल देण्याचे आदेश
महापौर भानसी यांनी केलेल्या दौऱ्यात त्यांना सकाळी 18 स्वच्छता कर्मचारी गैरहजर असल्याचे आढळून आले. या सर्वांच्या बाबतीत सकाळी ड्यूटीवर कोण होते, कोण नव्हते याचा अहवाल दोन दिवसांत तयार करण्याचे आदेश आरोग्य अधिकारी डॉ. विजय डेकाटे यांना देत कानउघाडणी केली. त्यानंतर त्यांच्यावर कारवाई केली जाणार असल्याचे आयुक्तांनी सांगितले.

Web Title: permenent employee for godavari cleaning