अमळनेरच्या डॉक्‍टरकडून पत्नीचा छळ

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 10 डिसेंबर 2018

जळगाव - शहरातील व्यंकटेशनगर येथील माहेरवाशीण विवाहितेचा डॉक्‍टर पतीकडून छळ होत असल्याची तक्रार रामानंदनगर पोलिस ठाण्यात दाखल झाली आहे. मेडिकल टाकण्यासाठी माहेरून दहा लाख रुपये आणावे, यासाठी डॉक्‍टर पतीसह सासू- सासरे छळ करीत असल्याचे दाखल गुन्ह्यात नमूद करण्यात आले आहे. सासरच्या मंडळींकडून बुवाबाजीचे प्रयोगही केले जात असल्याचे तक्रारदार विवाहितेने नमूद केले आहे. 

रामानंदनगर पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यात दीपाली श्रावण महाजन (रा. व्यंकटेशनगर) यांनी नमूद केल्याप्रमाणे, अमळनेर येथील माळीवाड्यातील रहिवासी डॉ. गोविंदा भिका महाजन यांच्याशी ७ डिसेंबर २०१४ ला त्यांचा विवाह झाला. लग्नानंतर काही वर्षे सासरच्या मंडळींनी दीपालीस चांगले वागणूक दिली. मात्र, नंतर किरकोळ वादातून सासू-सासरे तिचा छळ करू लागले. घडल्या प्रकाराबाबत आई-बाबांना सांगितल्यावर कौटुंबिक बैठकीनंतर प्रकरण निवळले. नंतर काही दिवसांनी पुन्हा त्रास सुरू झाला. 

दीपालीने पतीला मेडिकल टाकण्यासाठी १० लाख रुपये आणून द्यावे, यासाठी तिचा सतत छळ सुरू होता. पैसे आणत नाही म्हणून सासरच्यांनी सहा महिन्यांपूर्वी तिला माहेरी सोडून अद्यापही घ्यायला आले नाहीत. त्रास अधिक वाढल्याने दीपालीने पोलिस ठाणे गाठून पती डॉ. गोविंदा भिका महाजन, सासरे भिका महाजन, सासू मीनाबाई, दीर उदय यांच्याविरुद्ध तक्रार दिल्यावरून गुन्हा दाखल झाला. 

बुवाबाजीचे अघोरी प्रयोग 
दीपालीने तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे, सासरच्या मंडळींकडून तिच्यावर बुवाबाजीचे धागे-दोरे, गंडे-ताईतचे प्रयोग करण्यात येत होते. सासरे भिका महाजन एक वेळेस तिला मालेगाव येथील बाबाच्या मठात घेऊन गेले होते. त्यानंतर तिला त्रास देण्यास सुरवात झाली. कुटुंबात तू आल्यापासून वाटोळे झाल्याचे वारंवार सांगण्यात येत होते. इतकेच नाही तर गर्भधारणा होऊ नये, यासाठी अघोरी पद्धतीने कसले तरी, काढे व जडबुटीचे औषध पाजण्यात आल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

Web Title: Persecution of wife by doctor