कुलगुरूंनी साधला विद्यार्थ्यांशी वैयक्तिक संवाद

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016

जळगाव - उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. पी. पी. पाटील यांच्या पहिल्याच ‘कुलगुरू-विद्यार्थी संवाद पर्वा’ला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. एकूण साठ विद्यार्थ्यांनी कुलगुरूंची भेट घेऊन विविध समस्या मांडल्या व त्यातील बहुसंख्य प्रश्‍न कुलगुरूंनी तत्काळ मार्गी लावले.

जळगाव - उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. पी. पी. पाटील यांच्या पहिल्याच ‘कुलगुरू-विद्यार्थी संवाद पर्वा’ला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. एकूण साठ विद्यार्थ्यांनी कुलगुरूंची भेट घेऊन विविध समस्या मांडल्या व त्यातील बहुसंख्य प्रश्‍न कुलगुरूंनी तत्काळ मार्गी लावले.

कुलगुरूपदाची सूत्रे स्वीकारताना प्रा. डॉ. पाटील यांनी विद्यार्थ्यांसमवेत थेट संवाद साधणार असल्याचे जाहीर केले होते. विद्यार्थ्यांच्या समस्या ऐकण्यासाठी दर महिन्याच्या पहिल्या आणि तिसऱ्या सोमवारी अर्धा दिवस कुलगुरूंनी राखून ठेवला असून, आज या कार्यक्रमाचा प्रारंभ झाला. कुलगुरूंनी त्यांच्या दालनात प्रश्‍न घेऊन आलेल्या विद्यार्थ्यांसमवेत वैयक्तिक चर्चा केली व समस्या जाणून घेतल्या. सामूहिक समस्या न मांडता प्रत्येक विद्यार्थ्याने वैयक्तिक येऊन भेटावे, असे आवाहन कुलगुरूंनी केले व त्याप्रमाणे वैयक्तिक भेट घेऊन आपल्या शैक्षणिक समस्या विद्यार्थ्यांनी मांडल्या. यात संशोधन, शिष्यवृत्ती, आर्थिक मदत, विद्यापीठासाठी बससेवा, विद्यापीठ प्रशाळेतील बंद असलेली उपकरणे, विद्यापीठात बंद असलेले स्पर्धा परीक्षा केंद्र सुरू करणे, ग्रंथालयातील वाचन कक्षाची क्षमता वाढविणे, पीएच. डी.चा प्रबंध सादर केल्यानंतर अनेक महिने उलटले, तरी मौखिक परीक्षा न होणे अशा काही समस्यांचा समावेश होता.

अभिप्राय पाठविण्याचे विद्यापीठाचे आवाहन
कुलगुरू प्रा. डॉ. पाटील यांनी विद्यार्थ्यांच्या समस्या ऐकल्यानंतर आवश्‍यक त्या ठिकाणी तत्काळ अधिकाऱ्यांना बोलावून त्या मार्गी लावल्या. या संवाद पर्वासाठी उपस्थित सर्व विद्यार्थ्यांनी या आगळ्यावेगळ्या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त करून आपले प्रश्‍न तत्काळ मार्गी लागत असल्याबद्दल आनंद व्यक्त केला. या संवाद पर्वाद्वारे ज्या विद्यार्थ्यांच्या समस्या मार्गी लागल्या त्यांनी याबाबत विद्यापीठाकडे अभिप्राय पाठवावेत, असे आवाहन विद्यापीठातर्फे करण्यात आले आहे.

Web Title: Personal communication with students