तब्बल चाळीस वर्षांनी उघडली पेशवेकालीन रहाड

- युनूस शेख
मंगळवार, 14 मार्च 2017

जुने नाशिक - जुनी तांबट लेन येथील पेशवेकालीन बंद केलेली रहाड तब्बल ४० वर्षांनी उघडणार आहे. काल (ता. १२) दुपारी विधिवत पूजा करून रहाड खोदण्याच्या कामाचा प्रारंभ झाला. रहाड बघण्यासाठी परिसरातील नागरिकांनी गर्दी केली होती.

जुने नाशिक - जुनी तांबट लेन येथील पेशवेकालीन बंद केलेली रहाड तब्बल ४० वर्षांनी उघडणार आहे. काल (ता. १२) दुपारी विधिवत पूजा करून रहाड खोदण्याच्या कामाचा प्रारंभ झाला. रहाड बघण्यासाठी परिसरातील नागरिकांनी गर्दी केली होती.

होळीच्या पाचव्या दिवशी शहरात रंगपंचमी खेळण्याची पेशवेकालीन परंपरा आहे. त्यानुसार रंग खेळण्यासाठी जुने नाशिक व पंचवटीच्या विविध भागांत रहाडींची निर्मिती करण्यात आली होती. आबालवृद्धांपर्यंत सर्व जण रहाडीत उतरून रंग खेळण्याचा आनंद घेतात. दर वर्षी होळीच्या दुसऱ्या दिवसापासून रहाडीचे खोदकाम काम सुरू होते. रंगपंचमीच्या आदल्या दिवसांपर्यंत स्वच्छता करून त्यात स्वच्छ पाणी भरून ठेवले जाते.

रंगपंचमीच्या दिवशी त्यात रंग तयार करून टाकले जातात. त्यानंतर पुन्हा रहाडीची पूजा करून नागरिकांना रंग खेळण्यासाठी मोकळी करून दिली जाते. 

जुनी तांबट लेन येथे अशा प्रकारची ३०० वर्षांपूर्वीची रहाड आहे. काही अपरिहार्य कारणांसह रहाडीचे मानकरी मुरलीधर लोणारी, तांबट, प्रकाश काळे, प्रभाकर लोणारी यांचे देहावसन झाल्याने १९७७ पासून रहाड बंद होती. त्यांनतर बऱ्याच वेळा बंद केलेली रहाड सुरू करण्याची मागणी नागरिकांनी केली. परंतु, त्यावर निर्णय होऊ शकला नाही. त्यानंतर या रहाडीचे अस्तित्वच नष्ट झाले म्हणून पुन्हा एकदा जुनी तांबट लेन मित्रमंडळाने रहाड खुली करण्याचा निर्णय घेतला. रहाड खुली केली जात असल्याची माहिती सोशल मीडियावर व्हायरल होताच रहाड पाहण्यासाठी नागरिकांनी काल रात्रीपासून गर्दी केली होती.

ज्येष्ठांकडून आठवणींना उजाळा
रहाडीचे खोदकाम करण्यासाठी नागरिकांनी केलेल्या गर्दीत ज्येष्ठ व्यक्तींचा समावेश होता. तारुण्यात या रहाडीमध्ये रंग खेळण्याचा आनंद घेतल्याची आठवण काहींनी सांगितली. काही अपरिहार्य कारणाने रहाड बंद केल्याने त्याचा आनंद कुठेतरी हिरावून गेला होता. आज तीच रहाड पुन्हा एकदा खुली झाल्याचे पाहून त्यांनी रंग खेळतानाचे त्या वेळी घडलेले किस्से सांगत जुन्या आठवणींना उजाळा दिला.

Web Title: peshwa era rahad open