कीडनियंत्रणावर प्रभावी प्रयोगाद्वारे वाढविले उत्पादन

‘इकोपेस्ट ट्रॅप’ यंत्रासह कांतिलाल पाटील.
‘इकोपेस्ट ट्रॅप’ यंत्रासह कांतिलाल पाटील.

गरज ही शोधाची जननी असते. त्यातूनच प्रतिकूल हवामान, रोग व किडींचा विळखा वाढल्याच्या स्थितीत शेती उत्पादनावर झालेला विपरित परिणाम कमी करणारा प्रभावी कीड नियंत्रणाचा उपाय चोपडा तालुक्‍यातील तरुणाने शोधला आहे. त्यासाठी त्याने स्वतः कमी खर्चात तयार होणारा स्वयंचलित ‘इकोपेस्ट ट्रॅप’ विकसित केला असून, हा प्रयोग कमालीचा यशस्वीही ठरल्याने त्याची परिणामकारकताही सिद्ध होत आहे.
 

चोपडा तालुक्‍यातील मंगरूळ येथील कांतिलाल पाटील यांचे शिक्षण बीएस्सी (कृषी) पर्यंत झालेले आहे. एकत्रित कुटुंबाच्या १७ एकर शेतीत कापूस, गहू, केळी, मका, कलिंगड यासारखी पिके ते घेतात. २०१५ मध्ये कीड व रोगामुळे कलिंगडाचे पीक पूर्णतः वाया गेल्यानंतर त्यांनी कीड नियंत्रणाच्या दृष्टीने प्रयोगांवर भर दिला. त्याच प्रयत्नातून इकोपेस्ट ट्रॅपची संकल्पना आकारास आली. 

असा आहे प्रयोग 
या ट्रॅपमध्ये ०.५ वॅटचा बारीक एलईडी दिवा बसवलेला आहे, जो सायंकाळी अंधार पडल्यावर आपोआप प्रकाशित होतो. सकाळी सूर्य उजाडल्यावर बंदही पडतो. त्यासाठी दिव्याला सेन्सर जोडलेला आहे. निशाचर वर्गातील प्रौढ कीटक रात्री समागमासाठी बाहेर पडल्यानंतर दिव्याचा प्रकाश पाहून इकोपेस्ट ट्रॅपकडे बरोबर आकर्षित होतात. किडींच्या या सवयीचा कीड नियंत्रणात कांतिलाल पाटील यांनी चांगला उपयोग करून घेतला आहे.

इकोपेस्ट ट्रॅप तंत्रामध्ये नर आणि मादी दोन्हीही आकर्षित होत असल्याने किडींचे चांगल्या प्रकारे नियंत्रण शक्‍य होते. एका ट्रॅपसाठी शेतकऱ्यास साधारणतः २०० रुपयांपर्यंत खर्च येतो. विशेष म्हणजे पिकामध्ये प्रकाशमान झालेला ट्रॅप (सापळा) पाहून रानडुकरांसारखे प्राणी तिकडे फिरकत नाहीत. विशेष म्हणजे, हा प्रयोग यशस्वी ठरल्याने त्याचा शेतीच्या उत्पादनावर सकारात्मक परिणामही झाला. 

ट्रॅपच्या पेटंटसाठी अर्ज... 
कांतिलाल पाटील यांनी तयार केलेल्या इकोपेस्ट ट्रॅपचा स्वतःच्या शेतावरील कपाशी पिकात नुकताच वापर केला होता. त्याचे चांगले परिणाम त्यांना दिसून आले. प्रतिकूल हवामानामुळे परिसरातील शेतकऱ्यांचे कापसाचे उत्पादन घटलेले असताना, कांतिलाल यांना एकरी १० क्विंटलपर्यंत उत्पादन नोव्हेंबरपर्यंत मिळाले. ‘इकोपेस्ट ट्रॅप’ला पेटंट मिळावे म्हणून पाटील यांचे प्रयत्न सुरु आहेत. कृषी विभागानेही त्यांना ट्रॅपचा प्रसार करण्यासाठी शक्‍य ती मदत व प्रोत्साहन देण्याचे ठरवले आहे.

शेतीतूनच कापडणेकर स्वावलंबी

धुळे शहरापासून दक्षिणेला सरासरी पंधरा किलोमीटरवर कापडणे आहे. तेथील लोकसंख्या १६ हजार असून गावाची ७० टक्के अर्थव्यवस्था शेतीवरच अवलंबून आहे. प्रगतीशील मानसिकता, कष्टाची तयारी, सरकारी योजनांच्या योग्य लाभातूनही कापडणेकर स्वावलंबी झाल्याचे दिसून येते. मुख्य कांदा पिक, फळपिकांमध्ये कलमी बोरे, ॲपल बोरे, मेथी, मूळा, कोथंबीर, फ्लॉवर यासारख्या भाजापीला उत्पादनात अग्रेसर, सेंद्रीय उत्पादनात फ्लॉवर, मूळा, कापूसासह विविध पिके कापडण्याचे शेतकरी घेतात. बोरे थेट कोलकत्त्यात निर्यात होतात. तसेच भाजीपाला राज्यात ठिकठिकाणी व गुजरातकडे निर्यात होतो. 

चांगली पिके घेतली जात असल्याने रोजगार निर्मितीलाही वाव मिळतो. अनेक युवक, तरूणांनी गावालगत महामार्गावर बोरे विक्रीचा व्यवसायही स्विकारला आहे. भाजीपाला विक्रीची केंद्रे सुरू झाली आहेत. महिला व पुरूषांचे वीसहून अधिक बचत गट कार्यान्वीत आहेत. त्यात महिला गटांचे प्रमाण अधिक आहेत. यातून आर्थिक देवाणघेवाण सुकर होत असल्याने प्रगतीलाही चालना मिळते. त्याचा अनुभव गटाचे सदस्य घेत आहेत. भाजीपाला उत्पादनातून चांगली मिळकत शेतकऱ्यांना होते. 

पांझरा नदीचे पाणी पाटचारीव्दारे सोनवद धरणात नेले जात असल्याने कापडण्याला सिंचनाचा चांगला लाभ होतो. पाटाच्या पाण्यातून शेतकरी लघुबंधारे भरून घेतात. भात नदीही जिवंत होत असल्याने क्षेत्राला सिंचनाचा चांगला लाभ होऊन शेतीला आधार मिळतो. पूर्वी पावसाळ्यानंतरही शेतात पाणी न्यावे लागत असे. दशकापासून हे चित्र पालटले असून कापडणेकर स्वावलंबी झाल्याचे दिसून येत आहे. बहुतांश बैलगाडीचा वापर करणारे कापडणेकर गेल्या दशकापासून मोटारसायकल वापरू लागले आहेत. याव्दारे शेतात जाताना दिसतात. शिक्षणातही या गावाने आघाडी घेतली आहे. असा अमुलाग्र बदल शेतीतून होऊ शकतो, हे कापडण्याने दाखवून दिले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com