पंधरवड्यात पेट्रोल दोन रुपयांनी स्वस्त!

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 15 मे 2019

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत खनिज तेलाच्या दरात सुरू असलेली घसरण यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या दरात देखील घसरण झाली आहे. खनिज तेलात सातत्याने होत असलेल्या घसरणीमुळे पंधरवड्यात पेट्रोल दोन रुपयांनी स्वस्त झाले. तर डिझेलचे दर हे १ रुपया ८३ पैशांनी खाली आले आहे.

जळगाव - आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत खनिज तेलाच्या दरात सुरू असलेली घसरण यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या दरात देखील घसरण झाली आहे. खनिज तेलात सातत्याने होत असलेल्या घसरणीमुळे पंधरवड्यात पेट्रोल दोन रुपयांनी स्वस्त झाले. तर डिझेलचे दर हे १ रुपया ८३ पैशांनी खाली आले आहे.

पेट्रोल- डिझेलचे दरात गेल्या दोन वर्षांपासून सातत्याने बदल होत आहे; परंतु चालू महिन्याच्या सुरवातीपासूनच दरात घसरण होण्यास सुरवात झाली आहे. हे दर आंतरराष्ट्रीय स्तरावरील खनिज तेलाच्या दरात सातत्याने घसरण होत असल्याचा परिणाम आहे. पेट्रोल- डिझेलचे दर रोज आठ- दहा पैसे कमी होत आहेत. यामुळे पंधरा दिवसांपूर्वी म्हणजे १ मे रोजी पेट्रोलचे ७९ रुपये ८९ पैसे होते. यात दोन रुपयांची घसरण होऊन आज (ता.१४) पेट्रोलचे दर ७७ रुपये ८७ पैसे इतके आहेत. यात आणखी बदल होण्याची शक्‍यता वितरकांनी व्यक्‍त केली आहे.

९ मेपासून सातत्याने घसरण
पेट्रोल- डिझेलच्या दरात घसरण होण्याची सुरवात १ मेपासून झाली आहे. यानंतर दर काही दिवस स्थिर राहिले होते. मात्र ९ मेपासून सातत्याने दर खाली येत राहिले. यामुळे आज पेट्रोलचे प्रतिलिटर दर ७७ रुपये ८७ पैसे आणि डिझेल प्रतिलिटर ६८ रुपये ९६ पैसे इतके झाले आहेत. साधारण आठवडाभराचा विचार केल्यास पेट्रोल १ रुपया ७९ पैसे आणि डिझेल ८० पैशांनी स्वस्त झाले आहेत. दर कमी झाल्याने वाहन धारकांना थोडा दिलासा मिळाला आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत खनिज तेलाच्या दरात सातत्याने बदल होत असून, त्याचा परिणाम म्हणून इंधनाचे दर रोज बदलत आहेत. यामुळे पेट्रोलचे दर साधारण दोन रुपयांनी कमी झाले आहेत.
- तुषार जाखेटे, संचालक, शंकरलाल रामरतन पेट्रोलपंप

महिन्याच्या सुरवातीपासून म्हणजे १ मेपासून पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी होत आहेत. यात ९ मेपासून अधिक परिणाम जाणवत असून, पंधरा दिवसांत पेट्रोल दोन रुपयांनी, तर डिझेल पावणे दोन रुपयांनी स्वस्त झाले आहे.
- राजू काळे, संचालक, काळे पेट्रोलपंप

Web Title: Petrol Rate Decrease