फडणीस फसवणुकीतही उघडणार एस्क्रो खाते 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 28 एप्रिल 2017

नाशिक - जादा व्याजदराचे आमिष दाखवून कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी "मैत्रेय' फसवणूक प्रकरणप्रमाणेच एस्क्रो खाते उघडण्यात येणार आहे. फडणीस ग्रुपचा मुख्य संचालक व संशयित विनय फडणीस सध्या पोलिस कोठडीत असून, एस्क्रो खात्यावर रक्कम टाकण्याची तयारी दर्शविली आहे. दरम्यान, या प्रकरणी पुण्यातही गुन्हा दाखल झाल्याने नाशिकचे पथक पोचेपर्यंत पुणे पोलिसांनी फडणीस ग्रुपच्या कार्यालयातील 22 हार्डडिस्क जप्त करून महत्त्वपूर्ण कागदपत्रेही ताब्यात घेतली. 

नाशिकमधील गुंतवणूकदारांना जादा व्याजदराचे आमिष दाखवून कोट्यवधी रुपयांच्या केलेल्या फसवणुकीबद्दल गेल्या आठवड्यामध्ये मुख्य संचालक व संशयित विनय फडणीस यास विक्रोळीतून (मुंबई) अटक करण्यात आली. येत्या शनिवारपर्यंत कोठडी असून, आर्थिक गुन्हे शाखेचे एक पथक पुण्याला गेले होते. मात्र पुण्यातही फडणीस फसवणुकीसंदर्भात गुन्हा दाखल झाला असून, पुणे पोलिसांनी फडणीस ग्रुपच्या कार्यालयातील महत्त्वाचा डाटा जप्त केला. त्यामध्ये 22 हार्डडिस्क असून, महत्त्वाची कागदपत्रेही आहेत. जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाचा पंचनामा करण्यात आला असून, त्यांची कारवाई पूर्ण झाल्यानंतर त्याची माहिती नाशिकच्या आर्थिक गुन्हे शाखेला दिली जाणार आहे. 

एस्क्रो खाते उघडणार 
मैत्रेय फसवणूक प्रकरणामध्ये एस्क्रो खाते उघडून त्यामध्ये संशयितांनी पैसे जमा केल्यानंतर ते गुंतवणूकदारांना वाटप करणे सुरू झाले. त्याच धर्तीवर फडणीस प्रकरणातही एस्क्रो खाते सुरू करण्यासाठीचे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी संशयित विनय फडणीस यानेही तयारी दर्शविली असून, नाशिकमधील गुंतवणूकदारांना फसविण्यात आलेली रक्कम तो एस्क्रो खात्यावर टाकण्यास तयार असल्याचे पोलिसांतर्फे सांगण्यात आले. या संदर्भात आर्थिक गुन्हे शाखेकडून न्यायालयास माहिती दिली जाणार असून, त्यावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर एस्क्रो खाते उघडले जाणार आहे. 

Web Title: Phadnis fraud case