मनिऑर्डर पाठविणाऱ्या शेतकऱ्याशी "फोन पे चर्चा' 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 5 डिसेंबर 2018

निफाड : लासलगाव बाजार समितीच्या निफाड उपबाजारात कांद्याला प्रतिक्विंटल दीडशे रुपये भाव मिळाल्याने उद्विग्न होऊन मिळालेले सर्व पैसे मनिऑर्डरने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठविणाऱ्या नैताळेतील शेतकरी संजय साठे यांच्याशी पुरवठा विभागाचे उपजिल्हाधिकारी शशिकांत मंगरुळे यांनी दूरध्वनीवरून चर्चा करत चौकशी केली. 

निफाड : लासलगाव बाजार समितीच्या निफाड उपबाजारात कांद्याला प्रतिक्विंटल दीडशे रुपये भाव मिळाल्याने उद्विग्न होऊन मिळालेले सर्व पैसे मनिऑर्डरने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठविणाऱ्या नैताळेतील शेतकरी संजय साठे यांच्याशी पुरवठा विभागाचे उपजिल्हाधिकारी शशिकांत मंगरुळे यांनी दूरध्वनीवरून चर्चा करत चौकशी केली. 

कांदाउत्पादक शेतकरी संजय साठे यांनी कांदा विक्रीतून मिळालेल्या अवघ्या एक हजार 64 रुपयांची मनिऑर्डर पंतप्रधान मोदींना पाठविली होती. साडेसात क्विंटल कांद्याला प्रतिक्विंटल दीडशे रुपये बाजारभाव मिळाला होता. उत्पादनखर्च तर दूर, वाहतूक खर्चही वसूल होणार नसल्याने संतप्त होऊन त्यांनी ही मनिऑर्डर केली होती. देशभरात सोशल मीडिया आणि प्रसारमाध्यमांतून हा विषय चर्चिला गेला. या पार्श्‍वभूमीवर उपजिल्हाधिकारी मंगरुळे यांनी सोमवारी (ता. 3) रात्री नऊला साठे यांचे क्षेत्र किती, पीक कोणते घेता, आतापर्यंत किती कांदा विकला, भाव काय होता, त्या दिवशी काय घडले याबाबत माहिती घेतली.

निफाड तहसील प्रशासनाने मंगळवारी (ता. 4) नैताळे येथे श्री. साठे यांची भेट घेतली. त्यामुळे आता चौकशीनंतर श्री. साठे यांना काही दिलासा मिळतो का? त्यांच्यासारख्याच हजारो शेतकऱ्यांनाही पंतप्रधान काही दिलासा देतील का? आणि कांद्याच्या भावासाठी सरकारकडून काही केले जाईल का?, याकडे लक्ष लागले आहे. 

निफाडसह जिल्हाभरात दुष्काळी परिस्थिती असून, सातत्याने कांद्याच्या भावात घसरण सुरू आहे. त्यामुळे उत्पादनखर्चही भरून निघत नाही. अशातच कांद्याला मिळालेल्या तुटपुंज्या भावाबाबत सरकारचा निषेध करण्यासाठी नैताळे येथील शेतकरी संजय साठे यांनी गांधीगिरी पद्धत अवलंबली. त्यांनी स्वत:च्या खिशातून 54 रुपये खर्च करत एक हजार 64 रुपयांची रक्कम पंतप्रधान कार्यालयात मनिऑर्डरने पाठवून सरकारचा निषेध केला होता. प्रशासनाने चौकशी केली असली, तरी शेतकऱ्यांच्या पदरात काय पडणार?, हा कळीचा मुद्दा आहे.

Web Title: phone pe charcha with farmer who sends money order