
Dhule News: वराह हलविण्यास सुरवात; महापालिकेच्या इशाऱ्यानंतर कार्यवाही
धुळे : मालमत्तेचे नुकसान तसेच नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर अखेर रविवार (ता. १९)पासून शहरातील वराहमालकांकडून आपल्या मालकीचे मोकाट वराह मनपा हद्दीबाहेर हालविण्यास सुरवात करण्यात आली. महापालिकेच्या इशाराऱ्यानंतर ही कार्यवाही सुरू झाली.
महापालिका आयुक्त देवीदास टेकाळे, अतिरिक्त आयुक्त नितीन कापडणीस यांनी दिलेल्या निर्देशाप्रमाणे आरोग्य विभागाने वराहमालकांची नुकतीच बैठक घेतली. या बैठकीत उपायुक्त विजय सनेर यांनी महापालिका हद्दीत मोकाट वराहांचा उपद्रव वाढला आहे. त्यामुळे मालमत्तेचे नुकसानदेखील वाढले आहे.
शिवाय शहरातील नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाल्याचे नमूद करत वराहमालकांना आपल्या मालकीचे वराह १९ मार्चपर्यंत महापालिका हद्दीबाहेर हलवावेत, अशा सूचना दिल्या होत्या, अन्यथा कारवाई केली जाईल, असा इशाराही दिला होता. या इशाऱ्यानुसार महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे शहरातील देवपूर वीटभट्टी परिसर तसेच साक्री रोड परिसरात रविवारी (ता. १९) वराहमालकांनी १०० ते २०० वराह शहरातून हलविण्याची कार्यवाही सुरू केली.
याबाबत मनपा आरोग्य विभागाचे कार्यालयीन अधीक्षक राजेंद्र माईनकर यांनी शहरातील वराहमालकांना पुन्हा एकदा सर्व वराह सोमवार (ता. २०)पासून हलविण्याची कार्यवाही अन्यथा आपल्या विरुद्ध दंडात्मक कारवाई तसेच गुन्हे दाखल करण्यात येतील, असा इशारा दिला. याबाबत मुख्य स्वच्छता निरीक्षकांसह सर्व स्वच्छता निरीक्षक, मुकादम लक्ष ठेवून आहेत.