कुठे काय तर...कुठे काय... नाशिकमध्ये चक्क डुक्कर घोटाळा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 19 जून 2019

- शहरात परवानगीशिवाय डुक्कर पाळण्यास बंदी 
- मालकांनी स्थलांतरित करावे, अन्यथा कारवाई 

 

नाशिक : शहरात फिरणारी डुकरे अस्वच्छतेला कारणीभूत ठरत असल्याने महापालिकेने परवानगीशिवाय डुकरे पाळता येणार नसल्याचे आदेश जारी केले आहेत. शहरात डुकरे भटकताना आढळल्यास मारून मृत डुकरांची विल्हेवाट लावली जाईल, तसेच त्या डुकराच्या बदल्यात संबंधितांना कुठलीही भरपाई देण्यात येणार नाही. डुकरांच्या मालकांनी शहरातील डुकरे तातडीने शहराबाहेर स्थलांतरित करावीत, अन्यथा कारवाईचा इशारा दिला आहे. 

गेल्या वर्षापासून महापालिकेने शहरातून डुकरे हटविण्याची मोहीम राबवली आहे. सार्वजनिक ठिकाणी फिरणाऱ्या डुकरांमुळे अस्वच्छतेबरोबरच आजारांना निमंत्रण मिळत असल्याने महापालिका अधिनियमातील तरतुदीनुसार कारवाई सुरू केली आहे. गेल्या वर्षी शंभराहून अधिक डुकरे पकडून पाथर्डी येथील प्रकल्पावर विल्हेवाट लावण्यात आली. त्यानंतर डुकरे पकडण्याचे कंत्राटदेखील काढण्यात आले. कंत्राटदाराकडून वर्षभरात एकही डुक्कर पकडले गेले नाही; परंतु ठेकेदाराला सव्वा लाख रुपये देयके अदा करण्यात आली. त्यामुळे लेखी परवानगीशिवाय डुक्कर पाळण्यास बंदी घालण्यात आली. डुकरे स्थलांतरित करावीत, अन्यथा मारली जातील. नागरिकांनीदेखील डुकरे भटकताना आढळल्यास महापालिकेकडे एनएमसी ई-कनेक्‍ट ऍप्लिकेशनवर तक्रारी करण्याचे आवाहन करण्यात आले. 

देयके दिल्याची चौकशी 
शहरात गेल्या वर्षी डुक्कर पकडण्यासाठी पशुसंवर्धन विभागाने ठेकेदार नियुक्त केला होता. वर्षभरात एकही डुक्कर न पकडता एक लाख दहा हजार रुपयांचे देयके अदा केल्याप्रकरणी आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. डुकरे पकडण्यासाठी प्रतिडुक्कर पैसे देणे अपेक्षित होते; परंतु दोनशे डुकरे न पकडल्यास पाच हजार रुपये, अशी दंडाची अट टाकली होती. ठेकेदाराने एकही डुक्कर न पकडल्याने त्याला पाच हजारांचा दंड केला. पण दुसरीकडे एक लाख दहा हजारांचे बिल अदा केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pig scam in nashik municipal corporation