कोबीचे उभे पीक केले उद्‌ध्वस्त

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 31 मार्च 2018

पिंपळगाव बसवंत (जि. नाशिक) - कोबीला दोन रुपये कंद असा भाव मिळू लागल्याने पिंपळगावच्या भगवान गुलाब मोरे या शेतकऱ्याने सरकारच्या शेतीविरोधी धोरणावर संताप व्यक्त करीत उभे पीक कापून टाकले. त्यांनी अर्ध्या एकरात कोबीचे पीक घेतले होते.

पिंपळगाव बसवंत (जि. नाशिक) - कोबीला दोन रुपये कंद असा भाव मिळू लागल्याने पिंपळगावच्या भगवान गुलाब मोरे या शेतकऱ्याने सरकारच्या शेतीविरोधी धोरणावर संताप व्यक्त करीत उभे पीक कापून टाकले. त्यांनी अर्ध्या एकरात कोबीचे पीक घेतले होते.

पिंपळगाव बसवंत परिसरात शेतकरी द्राक्षाला पर्याय शोधू लागले आहेत. पिंपळगावच्या रानमळा भागातील भगवान मोरे या अल्पभूधारक शेतकऱ्याकडे एका एकरावर द्राक्ष बाग आहे. उर्वरित अर्ध्या एकरावर जानेवारी महिन्यात कोबीची लागवड केली. त्यासाठी सुमारे 40 हजार रुपये खर्च झाला. मार्चअखेरीस हे पीक काढणीसाठी आले. काढणीनंतर 800 रुपये भाड्याच्या वाहनाने कोबीचे 500 कंद ओझरच्या भाजीपाला मार्केटमध्ये विक्रीसाठी नेले. तेथे व्यापाऱ्याने प्रतिकंद दोन रुपये दराने लिलाव पुकारला. त्यातून वाहनभाडे वजा जाता अवघे दोनशे रुपये शिल्लक राहिले. काढणीसाठी लागलेली मजुरी पाहता तीन महिने मेहनत घेऊनही मोरे यांना 40 हजार रुपयांची झळ बसली.

कोबीच्या हिरव्यागार कंदांनी शेत बहरलेले, पण त्याला मिळणारा भाव पाहून मोरे यांचा संताप अनावर झाला. हातात विळा घेऊन कोबीचे उभे पीक छाटून टाकले. त्यांनी सरकारविरोधात संताप व्यक्त केला. "हेच का ते अच्छे दिन' अशा शब्दांत त्यांनी संतापाला वाट मोकळी करून दिली.

द्राक्ष काढणीपूर्वी दोन पैसे हाती येतील या अपेक्षेने कोबीची लागवड केली. पण उत्पन्न तर नाहीच; पण झालेला 40 हजार रुपयांचा खर्चही वसूल झाला नाही. या सरकारने शेतकऱ्यांवर वाईट दिवस आणले.
- भगवान मोरे, शेतकरी

भाजीपाल्याचे भाव (एक किलोचे घाऊक दर)
- टोमॅटो : 5 रुपये
- वांगे : 15 रुपये
- फ्लॉवर : 5 रुपये
- कोबी : 2.5 रुपये
- ढोबळी मिरची : 12.5 रुपये
- भोपळा : 5.5 रुपये

पिंपळगाव बसवंत - बाजारभावाअभावी कोबीचे पीक कापून फेकताना भगवान मोरे.

Web Title: pimpalgaon baswant nashik news Cabbage agriculture loss