पत्नीपीडित पतींने केले गोदाघाटावर पिंडदान

पत्नीपीडित पतींने केले गोदाघाटावर पिंडदान

नाशिक : कोणतीही चूक नसताना, केवळ मनाविरुद्ध विवाह केलेल्या पत्नींकडून खोटेनाटे गुन्हे दाखल केल्याने नाहक मानसिक अन्‌ आर्थिक त्रासासह अनेकांना तुरुंगवासही भोगावा लागला. अशा त्रस्त पतींनी आज (ता.7) गोदाघाटावर पत्नींच्या नावे पिंडदान केले. राज्यभरातील सुमारे 120 पेक्षा अधिक पतींनी पिंडदान कार्यक्रमात सहभागी झाले आणि कायद्याने नव्हे तर धार्मिक परंपरा अन्‌ रितीरिवाजानुसारच पत्नीपासून सुटकारा मिळावा यासाठी पिंडदान केले.

मुंबईतील वास्तव फाऊंडेशनच्या माध्यमातून पत्नीचे पिंडदान उपक्रम करण्यात आला. गोदाघाटावरील रामकुंड परिसरात आज सकाळी कोलकत्त्यासह मुंबई, औरंगाबाद, पुणे, नाशिकसह राज्यभरातील पत्नींच्या खोट्या-नाट्या गुन्ह्यांमध्ये त्रस्त असलेल्या आणि अशा पत्नींपासून मानसिक-भावनिकदृष्ट्या सुटकारा मिळावा, यासाठी न्यायालयांमध्ये कित्येक वर्षांपासून घटस्फोटासाठी दावे दाखल केलेल्या पतींनी पत्नींच्या नावाने पिंडदान केले. हिंदू धार्मिक परंपरा अन्‌ रितीरिवाजानुसार विवाह सोहळा पार पडतो. त्यावेळी पत्नी म्हणून आलेल्या महिलेच्या मनाविरुद्धही लग्न झालेले असते. बऱ्याचदा ती पतीच्या घराची जबाबदारी सांभाळण्यात अयशस्वी होते. त्यामुळे पती-पत्नींमध्ये मनोमिलन होत नाही. परिणामी, पत्नीच खोटे-नाटे आरोप करीत पतीसह त्याच्या कुटुंबियांविरोधात पोलिसात खटले दाखल करते. महिला संरक्षण कायद्याचा गैरवापर केला जातो. परिणामी पतींसह त्यांचे कुटूंबियांची मानसिक, सामाजिक, आर्थिक प्रतिष्ठा पणाला लागते. तर दुसरीकडे न्यायालयाने घटस्फोट दिला तरी पतींच्या मनातील पत्नीविषयीची भावना जात नाही. कारण नसताना त्यांना त्रास सहन करावा लागतो. तसेच, हिंदू धार्मिक परंपरेमध्ये घटस्फोटाला मान्यता नाही. त्यामुळे त्यावर पिंडदान हाच एकमेव पर्याय आहे. वास्तव फाऊंडेशनच्या माध्यमातून अशा त्रस्त 120 पतींनी आज रामकुंडावर एकत्रित येऊन आपल्या पत्नींच्या नावाने पिंडदान करीत तिच्यापासून कायमचा सुटकारा मिळावा, सुखशांती लाभावी अशी भावना व्यक्त केली. तसेच, महिला हक्क आयोगाप्रमाणे पुरुष हक्क आयोगाची निर्मिती करण्याचीही मागणी केली.

काहीही चूक नसताना पुरुषांना पत्नींमुळे कायद्याच्या ससेमिरेला सामोरे जावे लागते. त्यामुळे मानसिक व भावनिक खच्चीकरण झालेले असते. कोणतेही नाते संपुष्ठात आणण्यासाठी आपण पिंडदान करीत असतो. तीच संकल्पनेवर आधारित आम्ही पत्नींचे पिंडदान करीत त्रस्त पतींच्या मनातील भितीला घालविण्याचा प्रयत्न केला आहे.
 
- अमित देशपांडे, अध्यक्ष, वास्तव फाऊंडेशन.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com