शुगर अन्‌ तणावामुळे पिंगळे पुन्हा जिल्हा रुग्णालयात 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 21 मार्च 2017

नाशिक - नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीतील आर्थिक अपहारप्रकरणी सध्या मध्यवर्ती कारागृहात न्यायालयीन कोठडीत असलेले सभापती व माजी खासदार देवीदास पिंगळे यांना आज सायंकाळी प्रकृतीच्या कारणास्तव जिल्हा रुग्णालयात दाखल केले. 

नाशिक - नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीतील आर्थिक अपहारप्रकरणी सध्या मध्यवर्ती कारागृहात न्यायालयीन कोठडीत असलेले सभापती व माजी खासदार देवीदास पिंगळे यांना आज सायंकाळी प्रकृतीच्या कारणास्तव जिल्हा रुग्णालयात दाखल केले. 

कृषी उत्पन्न बाजार समितीतील कर्मचाऱ्यांचा दिवाळी बोनस व महागाई भत्त्यातील फरकाची सुमारे 58 लाख रुपये परस्पर काढून घेतल्याबद्दल त्यांना गेल्या डिसेंबरमध्ये अटक करण्यात आली. गेल्या साडेतीन महिन्यांपासून ते मध्यवर्ती कारागृहात आहे. पिंगळे यांना शुगरसह अनेक शारीरिक व्याधी आहेत. त्या संदर्भातही त्यांनी न्यायालयात दाद मागितली होती; परंतु न्यायालयाने कारागृहात वैद्यकीय सेवा असल्याचे सांगत जामीन अर्ज फेटाळला होता. मात्र, आज सायंकाळी उशिरा त्यांना जिल्हा रुग्णालयात आणण्यात आले, तेव्हा त्यांना चालण्यासाठीही दुसऱ्याचा आधार घ्यावा लागला. शारीरिक व्याधींनी ते अत्यंत कृश झाल्याचे दिसले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून त्यांना दाखल करून घेतल्याचे अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. जी. एम. होले यांनी सांगितले. पिंगळे यांना रक्तातील वाढलेली साखर व तणाव यामुळे दाखल करून घेण्यात आल्याचे सांगण्यात आले. 

डॉ. शिंदे प्रकरणामुळे कारागृहाने घेतली दक्षता 
दरम्यान, गर्भपात व गर्भलिंगनिदान चाचणीप्रकरणी अटक करण्यात आलेले डॉ. बळिराम शिंदे यांचा न्यायालयीन कोठडीत असताना मध्यवर्ती कारागृहात हृदयविकाराने मृत्यू झाला होता. त्या वेळी कारागृह प्रशासनावर निष्काळजीपणाचा आरोप करण्यात आला होता. त्यामुळे श्री. पिंगळे यांच्यासंदर्भात कारागृह प्रशासनाने कोणताही धोका न घेता त्यांना जिल्हा रुग्णालयाकडे तपासणीसाठी पाठविले. जिल्हा रुग्णालयानेही त्यांची तपासणी करून, तसेच अशक्तपणा असल्याने त्यांना दाखल करून घेतले. अन्य वैद्यकीय चाचण्या करून त्यांचा अहवाल आल्यानंतर रुग्णालयात ठेवण्याची आवश्‍यकता आहे की नाही, याबाबत निर्णय घेतला जाईल. 

Web Title: Pingle again district hospital