
Summer Heat Rise : वॉटर फिल्टरच्या जमान्यातही ‘माठा’शी नाळ कायम!
धुळे : शहरासह ग्रामीण भागातही वॉटर प्युरिफायर, फिल्टर पोचले. ग्रामीण भागात काही ग्रामपंचायतींनी तर गावासाठी फिल्टर पाण्याची व्यवस्था केल्याचेही पाहायला मिळते. (place of soil matka is still preserved in households dhule news)
पिण्याच्या पाण्यापासून होणारे विविध आजार टाळण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा हा स्वीकार चांगला असला तरी घराघरांत ‘मातीच्या माठा’ची जागा अद्यापही टिकून असल्याचे पाहायला मिळते. सध्या उन्हाच्या झळा वाढू लागल्याने माठ विक्रीची दुकानेही थाटली आहेत. अनेक विक्रेते गल्लोगल्ली माठ विकतानाही दिसतात. आकारानुसार माठाच्या किमती असून, ‘महागाई’ या माठांपर्यंतही ‘झिरपल्या’चे दिसते. अर्थात त्यांच्या किमती वाढल्या आहेत.
गेल्या आठवड्यापासून तापमानात वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. गेल्या दोन-तीन दिवसांत पावसाचेही वातावरण असल्याने पारा चढ-उतार करतोय पण उन्हाच्या झळा बसायला सुरवात झाली आहे. त्यामुळे थंड पाण्याची गरज भासू लागली आहे.
विशेषतः दुपारी उन्हाची तीव्रता जाणवत आहे. परिणामी मातीच्या माठांनाही मागणी वाढल्याचे पाहायला मिळत आहे. अनेक घरांमध्ये फ्रीज असले तरी माठांची जागाही कायम आहे. अनेक जणांना फ्रीजचे पाणी आरोग्यासाठी त्रासदायक ठरते, त्यामुळे अशी मंडळी माठातल्या पाण्यालाच प्राधान्य देतात. गोरगरिबांच्या घरी माठाला कायमस्वरूपी स्थान आहे.
हेही वाचा : देशातले ३२ म्युच्युअल फंडांचं व्यवस्थापन आहे महिलांच्या हाती...
महागाईमुळे किमती वाढल्या
यंदा माठांच्या मागणीसोबतच त्यांच्या किमतीही वाढल्या आहेत. या वेळी कोळसा, भुसा व मातीचे भाव वाढल्याने माठांचे भाव वाढल्याचे विक्रेते सांगतात. त्यामुळे यंदा माठाच्या किमतीत २० ते २५ टक्के वाढ झाली आहे.
शहरातील साक्री रोड, पारोळा रोड, पांझरा नदीकाठी, देवपूर भागात मातीचे रंगीबेरंगी माठ विक्रीसाठी दाखल झाले आहेत. गुजरात, राजस्थान येथून आलेल्या माठांना विशेष मागणी आहे. लहान-मोठे माठ विक्रीसाठी दाखल झाले आहेत. यात लहान आकाराचे माठ १२० ते १५० रुपये, तर मोठे माठ, रांजणाच्या किमती ४०० ते ६०० रुपयांपर्यंत आहेत. शिवाय नळ असलेल्या, लाल रंगाच्या, नक्षीदार अशा माठांच्या वेगवेगळ्या किमती आहेत.