भूखंड प्रकरणात "तिच' चौकडी निष्पन्न 

भूखंड प्रकरणात "तिच' चौकडी निष्पन्न 

जळगाव - शहरातील मेहरुण शिवारातील माधवी प्रभुदेसाई यांच्या मालकीच्या भूखंडांचे खोटे दस्तऐवज तयार करून तसेच दुय्यम निबंधक कार्यालयात बनावट महिला मालक उभी करून परस्पर पन्नास लाखांचा भूखंड लाटल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात अटकेत असलेल्या संशयितांना "पोलिसी खाक्‍या' दाखवताच त्यांनी आदर्शनगरातील बंगला हडप करणाऱ्या चौकडीच्या नावांची कबुली दिली असून, मास्टरमाईंड शुभम पाटील आणि गुन्ह्यात निष्णात वकील ऍड. हेमंत दाभाडेसह बनावट महिलेचे नाव निष्पन्न झाले आहे. अटकेतील दोघा संशयितांना न्यायालयाने अतिरिक्त दोन दिवसांच्या पोलिस कोठडीत पाठविण्याचे आदेश दिले आहे. 

मेहरुण शिवारात बाजारभावानुसार पन्नास लाख रुपये किंमत असलेल्या (सर्वे.42/01 प्लॉट नं.45) हा भूखंड माधवी यशवंत प्रभुदेसाई यांच्या मालकीचा असताना बनावट महिला मालक म्हणून भूखंड 29 सप्टेंबरला जिल्हा उपनिबंधक कार्यालयात उभी करून या भूखंडाची विक्री करण्यात आली होती. या प्रकरणी माधवी यांचे बंधू तक्रारदार संजय यशवंत प्रभुदेसाई (वय 60) यांच्या तक्रारीवरून औद्योगिक वसाहत पोलिस ठाण्यात संदीप श्रावण वारुळे, अनोळखी स्त्री, राजू जाधव, अर्जुन कृष्णा सोनवणे यांच्याविरुद्ध 30 सप्टेंबरला फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. यात संशयित संदीप वारुळे याला 29 नोव्हेंबरला अटक केली. पोलिसांनी कोठडीचा हक्क राखून त्यास न्यायालयीन कोठडी देण्यात आली. तद्‌नंतर गुन्ह्यात वारुळेचे साथीदार असलेले सागर राजू वाघ (वय 20), अर्जुन कृष्णा सोनवणे (वय 23, दोन्ही रा. गौतमनगर तांबापुरा) यांना पोलिस पथकाने दहा रोजी ताब्यात घेतल्यावर संदीप वारुळेला पुन्हा कारागृहातून ताब्यात घेत तिघांना न्यायालयात हजर करण्यात आले. त्यांना 12 डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले. आज कोठडीची मुदत संपल्यावर तिघांना न्यायालयात हजर केल्यावर न्या. एम. एम. चौधरी यांच्या न्यायालयाने तिघा संशयितांना पुन्हा दोन दिवस 14 पर्यंत अतिरिक्त कोठडीत रवाना करण्याचे आदेश दिले आहे. सरकारपक्षातर्फे ऍड. अविनाश पाटील यांनी कामकाज पाहिले. 

तीच चौकडी, तसाच गुन्हा 
आदर्शनगरातील प्रभाकर शंकरराव टिकले यांच्या मालकीचा "प्रसाद' बंगला शुभम पाटील याने बनावट मालक म्हणून प्रल्हाद बिसन परदेशी उभा करून परस्पर विक्री केला होता. यासाठी परदेशी यांना अडीच लाख रुपये देण्यात आले होते. तशाच पद्धतीने माधवी प्रभुदेसाई यांच्या वयाशी साम्य असलेली बनावट महिला शोधून संशयितांनी बनावट ओळखपत्रे, आधारकार्ड तयार करून नंतर उपनिबंधक कार्यालयात खरेदी विक्रीचा व्यवहार करून 50 लाखांचा भूखंड हडपल्याच्या तपासात उपनिरीक्षक संदीप पाटील यांनी शुभम सुनील पाटील (रा. अयोध्यानगर), त्याचा साथीदार वकील ऍड. हेमंत दाभाडे आणि बनावट महिला म्हणून उषाबाई दीपक वाघ यांची नावे निप्षन्न केली आहे. 

"मास्टरमाइंड'ला ऍड. दाभाडेंची मदत 
तपासाधिकारी संदीप पाटील यांच्या तपासात मास्टरमाइंड शुभम पाटील व मिळकत खरेदी करणाऱ्यासह गुन्ह्यांची संपूर्ण रचना आखली. उपनिबंधक कार्यालयाच्या कार्यपद्धतीची खडा अन्‌ खडा माहिती असल्याने त्यांच्या गाफिलपणाचा पुरेपूर वापर गुन्ह्यात करण्यात आला. तद्‌नंतर खरेदीत करून घेण्यासाठी ऍड. हेमंत दाभाडे यांच्या मार्गदर्शनात बोगस दस्तऐवज तयार करण्यात आल्याचे समोर आले आहे. गुन्ह्यातील बनावट महिला उषाबाई दीपक वाघ (रा. गौतम नगर तांबापुरा) याचे नाव निष्पन्न झाले असून, ही महिला आणि वकील ऍड. दाभाडे फरार असून शुभम पाटील बंगला पचविल्याच्या प्रकरणात कारागृहात आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com