PM Kisan Nidhi Yojana : पीएस किसान निधी योजनेत चौदाव्या हप्त्याचे नियोजन सुरू| PM Kisan Nidhi Yojana Planning for 14 th installment is underway dhule news | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

PM Kisan Nidhi Yojana

PM Kisan Nidhi Yojana : पीएस किसान निधी योजनेत चौदाव्या हप्त्याचे नियोजन सुरू

Dhule News : शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न मिळण्यासाठी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत सर्व पात्र शेतकरी कुटुंबांना (पती, पत्नी व त्यांची १८ वर्षांखालील अपत्ये) दोन हजार रुपये प्रतिहप्ता याप्रमाणे तीन हप्त्यांत सहा हजार रुपयांचा प्रतिवर्षी लाभ त्यांच्या बँक खात्यात थेट (डीबीटीद्वारे) जमा करण्यात येतो. (PM Kisan Nidhi Yojana Planning for 14 th installment is underway dhule news)

या योजनेच्या सुरवातीपासून एकूण १३ हप्त्यांत राज्यातील ११०.३९ लाख लाभार्थ्यांना २३६०७.९४ कोटी रुपयांचा लाभ अदा झाला आहे. केंद्र सरकार स्तरावर योजनेच्या एप्रिल ते जुलै २०२३ कालावधीतील १४ व्या हप्त्याचे नियोजन सुरू असून, मे २०२३ मध्ये या हप्त्याचा लाभ दिला जाईल.

तथापि, केंद्र सरकारने १४ व्या हप्त्यासाठी लाभार्थ्यांच्या भूमिअभिलेख नोंदी पोर्टलवर अद्ययावत करणे, लाभार्थ्यांची बँक खाती आधार क्रमांकास जोडणे, ई-केवायसी प्रमाणीकरण करणे बंधनकारक केले आहे.

भूमिअभिलेख नोंदी अद्ययावत करणे प्रलंबित असलेल्या लाभार्थ्यांनी संबंधित तहसीलदार तथा तालुका नोडल अधिकारी पीएम किसान यांच्याकडून त्यांच्या नोंदी अद्ययावत करून घ्याव्यात. बँक खाती आधार क्रमांकास जोडणे व ई-केवायसी प्रमाणीकरण करणे या दोन्ही बाबींची पूर्तता लाभार्थ्याने स्वत: करायची आहे.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

लाभार्थ्याने स्वत:च्या सोयीनुसार ई-केवायसी पडताळणीसाठी पीएम किसान पोर्टलवरील https://pmkisan.gov.in/ या लिंक आधारे किंवा सामाईक सुविधा केंद्रामार्फत (सीएससी) या दोनपैकी एका सुविधेच्या आधारे त्यांची ई-केवायसी पडताळणी करावी. तसेच बँकेत समक्ष जाऊन आपले बँक खाते आधार क्रमांकास जोडून घ्यावे.

या तीन बाबींची पूर्तता केलेल्या पात्र लाभार्थ्यांनाच पुढील हप्त्याचा लाभ अदा करणार असल्याचे केंद्र सरकाने स्पष्ट केले आहे.

पीएम किसान योजनेतील पात्र लाभार्थी राज्य शासनाने २०२३- २०२४ च्या अर्थसंकल्पात घोषणा केलेल्या ‘नमो शेतकरी महासन्मान निधी’ या योजनेसाठीदेखील पात्र राहतील व त्यांना पीएम किसान योजनेप्रमाणे अतिरिक्त सहा हजार रुपये वार्षिक देय राहतील. पीएम किसान योजनेच्या १४ व्या व त्या पुढील हप्त्यांचा लाभ मिळण्यासाठी सर्व पात्र लाभार्थ्यांनी आवश्यक बाबींची पूर्तता करावी, असे आवाहन कृषी आयुक्तालयाने केले आहे.