मोदींच्या सभेत कांदाफेकीचीच भीती, शेतकऱ्यांना व्यासपीठापासून दूर ठेवणार?

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 16 एप्रिल 2019

22 एप्रिलला सकाळी नऊला पंतप्रधान मोदी यांची जाहीर सभा होणार आहे. आमदार डॉ. राहुल आहेर व अनिल कदम यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र देत सभेसाठी परवानगी मागितली आहे. त्यापार्श्‍वभूमीवर जिल्हाधिकारी सूरज मांढरे, पोलिस अधिक्षक डॉ. आरती सिंह यांच्या उपस्थितीत प्रशासनाची सोमवारी (ता.15) आढावा बैठक झाली.

नाशिक ः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची येत्या सोमवारी (ता. 22) दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील पिंपळगाव बसवंत येथे जाहीर सभा होणार आहे. त्यात कांदाफेकीसारखी कुठलीही अप्रिय घटना होऊ नये म्हणून प्रशासकीय यंत्रणा आठवडाभर आधीपासूनच कामाला लागली आहे. 

22 एप्रिलला सकाळी नऊला पंतप्रधान मोदी यांची जाहीर सभा होणार आहे. आमदार डॉ. राहुल आहेर व अनिल कदम यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र देत सभेसाठी परवानगी मागितली आहे. त्यापार्श्‍वभूमीवर जिल्हाधिकारी सूरज मांढरे, पोलिस अधिक्षक डॉ. आरती सिंह यांच्या उपस्थितीत प्रशासनाची सोमवारी (ता.15) आढावा बैठक झाली. पंतप्रधानांच्या जाहीर सभेच्या पार्श्‍वभूमीवर बंदोबस्ताचे नियोजन आणि विविध विभागांना पत्र देऊन तयारीच्या सूचना देण्यात आल्या. राजकीय रणधुमाळीत सभेत कुठलाही गोंधळ किंवा शेतीच्या प्रश्‍नांवरून तीव्र भावना व्यक्त होऊ शकतात. या शक्‍यतेवरून प्रशासनाने बंदोबस्ताच्या नियोजनाची खास बैठक घेतली. 

राजकीय कुरघोडीचा भाग म्हणून पंतप्रधानांच्या सभेत कार्यकर्त्यांना चिथावणी देऊन गोंधळ घालण्यास कुणी प्रवृत्त केल्यास अशा घटना कशा हाताळायच्या, याविषयी बैठकीत चर्चा झाली. सुरक्षाव्यवस्था कडक ठेवण्यावर प्रशासनाने लक्ष केंद्रित केले आहे. यापूर्वी नाशिक जिल्ह्यातील विविध राजकीय पक्षांच्या ज्येष्ठ नेत्यांच्या जाहीर सभांत कांदाफेकीपासून निषेधाचे फलक झळकाविण्यापर्यंतच्या गोंधळाच्या घटना घडल्या आहेत. सध्या लोकसभा निवडणुकीचे राजकीय वातावरण पेटले आहे. दुष्काळ, कांद्याचे भाव, निवृत्तिवेतन योजनेसह इतरही अनेक प्रश्‍नांबाबत सरकारी पातळीवरून उपायोजना नाही. राजकीय पक्षांच्या प्रचारातून हे मुद्दे गायब होत असल्याने त्याविषयीचा रोष जाहीर सभांतून उमटू शकतो, अशी भीती गोपनीय विभागाला वाटत असल्याने आतापासूनच त्याबाबत उपाययोजना सुरू झाल्या आहेत. 

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतलेल्या आजच्या बैठकीत राजकीय कुरघोडीच्या घटनांतून संभाव्य उद्रेकांच्या शक्‍यतेवरच खूप वेळ चर्चा झाली. त्यादृष्टीने जाहीर सभेच्या बंदोबस्ताचे तसेच व्यासपीठापासून तर उपस्थित नागरिकांमधील अंतर किती असावे, कसे नियोजन करावे याविषयी पोलिस अधीक्षक आणि स्थानिक आमदारांनी एकत्रित पाहणी करून नियोजन करण्याचे ठरले. 

Web Title: PM Narendra Modi rally has threat of farmers strikes in Dindori