'त्याने' वृध्देच्या हाताला घेतला चावा..अन् त्यानंतर..

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 24 नोव्हेंबर 2019

हिरामण शंकर पाटील (८८) गुरुवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास घराबाहेर गेले असता, संशयित सुनील ढाके हा सत्यभामा हिरामण पाटील (८५) यांना वायरमन असून, आजोबांनीच पाठविल्याचा बहाणा करून घरात शिरला. त्यानंतर त्याने सत्यभामा पाटील यांच्या हाताला चावा घेत त्यांच्या हातातील ३० हजार रुपयांची सोन्याची बांगडी बळजबरीने हिसकावून पोबारा केला.

नाशिक : संभाजी चौकात राहणाऱ्या वृद्धेला एकटी पाहून संशयिताने तिच्या हाताला चावा घेत हातातील सोन्याची बांगडी बळजबरीने हिसकावून पोबारा केल्याची घटना गुरुवारी (ता. 21) सकाळी घडली होती. गुन्हे शाखा, मुंबई नाका पोलिसांनी तपास सुरू करत 24 तासांतच शुक्रवारी (ता. 22) पहाटेच्या सुमारास संशयिताला आयटीआय पुलानजीकच्या परिसरातून सापळा रचून अटक केली. 

वायरमन असल्याचा बहाणा करून तो घरात शिरला
सुनील नथू ढाके (वय 52, रा. अष्टविनायक कॉलनी, पीएफ ऑफिसजवळ, आयटीआय पुलाजवळ, सातपूर) असे संशयित चोरट्याचे नाव आहे. तेजस प्रशांत सोनवणे (रा. साईद्वार, संभाजी चौक, उंटवाडी रोड, नाशिक) यांच्या फिर्यादीनुसार, त्यांचे आजोबा हिरामण शंकर पाटील (88) गुरुवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास घराबाहेर गेले असता, संशयित सुनील ढाके हा सत्यभामा हिरामण पाटील (85) यांना वायरमन असून, आजोबांनीच पाठविल्याचा बहाणा करून घरात शिरला. त्यानंतर त्याने सत्यभामा पाटील यांच्या हाताला चावा घेत त्यांच्या हातातील 30 हजार रुपयांची सोन्याची बांगडी बळजबरीने हिसकावून पोबारा केला. घटनेची माहिती मिळताच, मुंबई नाका पोलिसांत या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हे शाखेचे उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील यांच्या आदेशानुसार सहाय्यक आयुक्त समीर शेख, युनिट एकचे पोलिस निरीक्षक आनंदा वाघ, मुंबई नाका पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय ढमाळ यांनी घटनास्थळी धाव घेतली. 
 
Image may contain: one or more people and people standing

...अन्‌ संशयिताचा काढला माग 
संभाजी चौक परिसरात असलेला सीसीटीव्ही पोलिसांनी तपासला असता, त्यात संशयित कैद झाला होता. सहाय्यक आयुक्त समीर शेख, पोलिस निरीक्षक आनंदा वाघ, विजय ढमाळ संभाजी चौकात चहा पिण्याचा बहाणा करून चहावाला आणि पाववडे विक्रेत्याकडे संशयिताची छबी दाखवून ओळख पटविण्याचे काम करीत असताना त्या ठिकाणी जमलेल्या गर्दीतून एकाने त्यास ओळखले आणि संशयित सुनील हा याच चौकात असलेल्या एका इलेक्‍ट्रॉनिक्‍स दुकानात कामाला होता, अशी माहिती समोर आली. तसेच त्याला जुगाराचाही नाद असल्याने त्याचा पत्ताही पोलिसांनी शोधून काढला. आयटीआय पुलानजीकच्या वसाहतीमध्ये सापळा रचण्यात आला. संशयित सुनील ढाके शुक्रवारी (ता. 22) रात्री अडीचच्या सुमारास मद्याच्या नशेत घरी आला असता, दबा धरून असलेल्या पोलिसांनी त्याला अटक केली. ही कामगिरी सहाय्यक निरीक्षक एस. पी. गेंगजे, उपनिरीक्षक सी. एम. श्रीवंत, मधुकर घुगे, संजय भिसे, सुनील आहिरे, योगेश ढमाले, सचिन कारंजे, युवराज गायकवाड यांच्या पथकाने बजावली.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Police Caught The thief within 24 hours Nashik Crime News