चाळीसगाव : खड्डे बुजविण्यासाठी सरसावले पोलिस

दीपक कच्छवा 
रविवार, 8 सप्टेंबर 2019

आज पोलिस कर्मचारी व गावातील तरुणांच्या सहकार्याने विशेषतः गिरणा पुलाजवळ धोकादायक खड्डे मुरूम टाकून बुजले. यामुळे तरुणांसह पोलिसांचे कौतुक होत आहे.

मेहुणबारे (ता. चाळीसगाव) : मृत्यूचा सापळा बनलेल्या चाळीसगाव- धुळे महामार्गावरील जीवघेणे खड्डे बुजण्यासंदर्भात राष्ट्रमार्ग विभागाकडून दखलच घेतली जात नसल्याने खड्ड्यांमुळे होणारे अपघात टाळण्यासाठी येथील पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक सचिन बेंद्रे यांनी खड्डे बुजण्याकामी पुढाकार घेतला. आज पोलिस कर्मचारी व गावातील तरुणांच्या सहकार्याने विशेषतः गिरणा पुलाजवळ धोकादायक खड्डे मुरूम टाकून बुजले. यामुळे तरुणांसह पोलिसांचे कौतुक होत आहे.

चाळीसगाव- धुळे महामार्गावरील मेहुणबारे ते चाळीसगाव या पंधरा किलोमीटरच्या रस्त्यावरून वाहन चालवताना जीवघेण्या खड्ड्यांमुळे कसरत करून वाहन चालवावे लागते. रस्त्याच्या दुरुस्तीसंदर्भात राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे तक्रारी करूनही त्याची दखल घेतली जात नाही. बऱ्याचदा लहान मोठ्या खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने अपघात होण्याचे प्रकार वाढले आहेत. येथील पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक सचिन बेंद्रे यांनी स्वतः पुढाकार घेऊन हवालदार जालमसिंग पाटील, शैलेश माळी, ज्ञानेश्वर बडगुजर, टेकवाडेचे माजी सरपंच वाल्मीक पाटील तसेच गावातील तरुणांच्या सहकार्याने आज दुपारी दोनला दोन ट्रॅक्टर मुरूम मागवून खड्डे बुजविण्याचे काम हाती घेतले.

धोकादायक खड्डे बुजले

या रस्त्यावर खड्ड्यांमुळे एका दाम्पत्याचा अपघात झालेला असताना साहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन बेंद्रे यांनी त्या दाम्पत्याला मदत केली होती. त्याचवेळी श्री. बेंद्रे यांनी खड्डे बुजण्यासंदर्भात विचार केला होता. ‘हे काम आमचे नसले, तरी कोणाचाही खड्ड्यांमुळे अपघात होऊ नये, म्हणून आम्ही किमान ज्या ज्या ठिकाणी शक्य आहे, ते खड्डे बुजण्याचे काम हाती घेतले आहे’ असे ‘सकाळ’शी बोलताना सांगितले. या रस्त्यावरील गिरणा पुलाच्या वळणावर धोकादायक खड्डे पडले असून या खड्ड्यात रोज एक तरी अपघात होतच आहे.

गावातील तरुणांची मदत

दोन दिवसांपूर्वी तरवाडे गावाजवळ खड्ड्यांमुळे एका तरुणाचा बळी गेला होता. या खड्ड्यांसंदर्भात दै. ‘सकाळ’ने बातमीच्या माध्यमातून पाठपुरावा सुरू ठेवला आहे. या अपघाताचे वृत्त वाचून सचिन बेंद्रे यांनी खड्डे बुजण्याचे ठरविल्यानंतर त्याला गावातील तरुण भरत वाघ, ऋषिकेश महाजन, पवन कोळी, अमोल कोळी, भुरा पावरा, शरद ढालवाले या तरुणांनी प्रतिसाद दिला. खड्डे बुजण्यासाठी ट्रॅक्‍टरमधून मुरूम आणण्यात आला. या तरुणांबरोबर स्वतः श्री. बेंद्रे व पोलिस कर्मचाऱ्यांनी श्रमदानाच्या माध्यमातून खड्डे बुजले. येथील पोलिसांच्या या कृतीतून राष्ट्रीय महामार्ग विभागाने बोध घ्यावा व आता तरी रस्ता दुरुस्तीबाबत दखल घ्यावी, अशी मागणी होत आहे.

गिरणा पुलादरम्यान मोठ्या प्रमाणात लहानमोठे खड्डे पडले आहेत. ज्यामुळे वाहतूक कोंडी तसेच अपघात होण्याचे प्रकार वाढले आहेत. खड्डे बुजण्यासाठी गावातील तरुणांचे चांगले सहकार्य लाभले. सध्या जीवघेणे खड्डे बुजविण्यात आले असून त्यामुळे अपघात टळण्यास मदत होणार आहे.
- सचिन बेंद्रे, सहाय्यक पोलिस निरीक्षक, मेहुणबारे (ता. चाळीसगाव)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: police clears pits on chalisgaon city road