'खाकी'च्या दगदगीतून आरोग्याचा संदेश

Jaipal Hire
Jaipal Hire

मेहुणबारे (ता. चाळीसगाव) : 'खाकी' हा शब्द ऐकला, की आपल्या डोळ्यांसमोर उभा राहतो तो पोलिस. त्याचे व्यस्त असलेले जीवन. घरगुती जीवनापासून दूर, वेळेवर आहार नाही, त्यातच आरोग्याकडे तर अजिबातच लक्ष नाही.मात्र, अशा सर्व व्यापातून आठवड्यातून चार दिवस 25 किलोमीटर 'सायकलिंग'ने व्यायाम करणारे व या संदर्भात आपल्या कर्मचाऱ्यांमध्ये प्रबोधन करणारे येथील सहायक पोलिस निरीक्षक जयपाल हिरे हे खऱ्या अर्थाने"आयडीयल' ठरले आहेत.

"सिंघम' अधिकारी म्हणून जयपाल हिरे यांची ओळख आहे. दोन वर्षांपासून त्यांचा सुरू असलेला "सायकलिंग'चा उपक्रम त्यांनी कर्मचाऱ्यांमध्येही लोकप्रिय केला आहे. दिवसाला सुमारे 25 किलोमीटर अंतर ते सायकल चालवतात. त्यांचा सारखा पोलिस अधिकारी जेव्हा एखाद्या खेड्यात सायकलवर जातो, तेव्हा त्या गावातील ग्रामस्थांना मोठे कुतुहल वाटते. सायकल चालवणे हा एक प्रकारे व्यायाम असून यातून आपले आरोग्य कसे चांगले राखता येईल, हाच त्यांचा प्रयत्न असतो. सायकलिंगचा व्यायाम ते आठवड्यातून चारच दिवस करतात. काही वेळा कामाचा व्याप असला तर रात्रीच्या वेळी ते सायकलवर घराबाहेर पडतात. रात्री डोक्‍यात टॉर्च असलेले "हेल्मेट' तसेच
सुरक्षेसाठी दोन्ही बाजूला बेल्ट लावून ते सायकलिंग करतात. सायकल चालविण्यासह श्री. हिरे हे बॅडमिंटन व योगा आवर्जुन करतात. आपल्या कर्मचाऱ्यांनाही बॅडमिंटनचा आनंदा लुटता यावा, यासाठी येथील पोलिस ठाण्यात लवकरच बॅडमिंटन व व्हॉलीबॉलसाठी जाळ्या ते लावणार असल्याचे त्यांनी "सकाळ'शी बोलताना सांगितले. आपल्या "फिटनेस'विषयी अधिक माहिती सांगताना श्री. हिरे यांनी सांगितले, की ड्यूटीवर घरातून बाहेर पडल्यानंतर ते घरी कधी येतील हे सांगता येत नाही. त्यामुळे सकाळी साडेदहाच्या सुमारास जेवण करूनच ते घराबाहेर पडतात. दिवसभर कामाचा ताण खूप असल्याने दुपारी फळे किंवा चहा, बिस्किट ते घेतात. 2012 पासून त्यांनी आपले रात्रीचे जेवण बंद केले आहे. फक्त अर्धा लिटर दूध व फळे ते घेतात. त्यामुळे आरोग्य चांगले राहत असल्याचा आपला अनुभव असल्याचे त्यांनी सांगितले.

कौटुंबिक "गेट टुगेदर'चे आयोजन
पोलिसांचे जीवन खूपच ताणतणावाचे व धावपळीचे असते. त्यामुळे जयपाल हिरे हे येथील पोलिस ठाण्यात रुजू झाल्यानंतर त्यांनी पोलिसांना सर्व कुटुंबीयांसह अंमत्रित करून "गेट टुगेदर'चे आयोजन केले. यात सर्वांनी एकत्र भोजनाचा आस्वाद घेताल. यावेळी मनोरंजनाचेही कार्यक्रम आयोजित केल्याने पोलिसांसह त्यांच्या कुटुंबीयांना या विरंगुळ्याचा आनंद लाभला. असे उपक्रम नेहमीच राबवावे, अशा प्रतिक्रिया पोलिसांच्या कुटुंबीयांकडून व्यक्त झाल्या.'

कामाचे नियोजन केले तर ताण नक्कीच कमी होतो. प्रत्येक कर्मचाऱ्याला कामाची सारखीच जबाबदारी देऊन त्यांना त्यांच्या शारीरिक आरोग्य व व्यायामाविषयी नेहमीच विचारपूस करीत असल्याने माझ्यासह माझे सर्व कर्मचारी ताणतणावमुक्त होऊन काम करीत असतात.
- जयपाल हिरे, सहाय्यक पोलिस निरीक्षक, मेहुणबारे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com