पोलिस अधीक्षक लोहार खंडणी प्रकरणात दोषी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 17 जानेवारी 2019

जळगाव - मुंबईत गृहरक्षक दल मुख्यालयात पोलिस अधीक्षक म्हणून सध्या कार्यरत असलेले मनोज प्रभाकर लोहार व त्यांचा साथीदार धीरज येवले या दोघांना खंडणी प्रकरणात न्यायालयाने दोषी ठरविले असून, त्यांच्या शिक्षेची सुनावणी येत्या शनिवारी (ता. १९) होणार आहे. न्यायालयाने त्यांना दोषी ठरवितानाच तत्काळ अटक करण्याचे आदेश पोलिसांना दिले. 

जळगाव - मुंबईत गृहरक्षक दल मुख्यालयात पोलिस अधीक्षक म्हणून सध्या कार्यरत असलेले मनोज प्रभाकर लोहार व त्यांचा साथीदार धीरज येवले या दोघांना खंडणी प्रकरणात न्यायालयाने दोषी ठरविले असून, त्यांच्या शिक्षेची सुनावणी येत्या शनिवारी (ता. १९) होणार आहे. न्यायालयाने त्यांना दोषी ठरवितानाच तत्काळ अटक करण्याचे आदेश पोलिसांना दिले. 

चाळीसगाव येथे अप्पर पोलिस अधीक्षक पदावर कार्यरत असताना मनोज लोहार यांनी तत्कालीन जिल्हा परिषद सदस्य डॉ. उत्तमराव महाजन यांना २५ लाखांच्या खंडणीसाठी डांबून ठेवल्याप्रकरणी न्या. पी. वाय. लाडेकर यांच्या न्यायालयात खटला सुरू होता. त्याची सुनावणी पूर्ण होऊन आज न्यायालयाने दोघांना दोषी ठरविले. याच प्रकरणात विश्‍वासराव निंबाळकर यांना निर्दोष मुक्त करण्यात आले आहे. 

रस्तोगींची कर्तव्यदक्षता
डॉ. महाजन यांचा मुलगा मनोज याने तत्कालीन जिल्हा पोलिस अधीक्षक संतोष रस्तोगी यांना फोन करून घटना कळविली. रस्तोगींनी कर्तव्यदक्षता दाखवत प्रकरणाचा छडा लावून डॉ. महाजन यांना डांबून ठेवल्याचे निश्‍चित झाल्यावर या प्रकरणी २ ते ४ जुलै २००९ पर्यंत चाळीसगाव पोलिस ठाण्यात तळ ठोकून ३० लोकांचे जाब-जबाब नोंदवले व पोलिस महासंचालकांना तसा अहवाल पाठवला.

असे आहे प्रकरण
मनोज लोहार हे चाळीसगाव येथे अप्पर पोलिस अधीक्षक पदावर कार्यरत असताना त्यांनी ३० जून २००९ ला जिल्हा परिषदेचे तत्कालीन सदस्य तथा चाळीसगाव आयुर्वेदिक महाविद्यालयाचे संचालक प्राचार्य डॉ. उत्तमराव महाजन यांना उपनिरीक्षक विश्‍वासराव निंबाळकर यांच्यासह दोन कर्मचारी पाठवून ताब्यात घेतले होते. गुजरात येथील कॉन्ट्रॅक्‍टरच्या बिलांचा संदर्भ देत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली आणि धीरज येवले याच्या माध्यमातून निरोप देत प्रकरण मिटवायचे असेल तर ६० लाख रुपयांची खंडणी मागितली होती. तडजोडीअंती ही रक्कम २५ लाखांपर्यंत ठरली. त्यानंतर पैसे देण्यासाठी पंधरा दिवसांची मुदत मागितल्याने डॉ. महाजन यांना पैसे दिल्याशिवाय सोडणार नाही, असे म्हणत डांबून ठेवण्यात आले होते.

Web Title: Police Officer Manoj Lohar Tribute case Crime