लाचखोरीत पोलिस एक कदम आगे!

रईस शेख
गुरुवार, 18 मे 2017

महसूल विभागालाही टाकले मागे

महापालिका कर्मचारीही खाबुगिरीत पुढे 
‘एसीबी’च्या कारवाईची अर्धशतकी वाटचाल

महसूल विभागालाही टाकले मागे

महापालिका कर्मचारीही खाबुगिरीत पुढे 
‘एसीबी’च्या कारवाईची अर्धशतकी वाटचाल

जळगाव - लाचखोरीच्या तक्रारी आणि या तक्रारींच्या पार्श्‍वभूमीवर कारवाईचे प्रकार वाढल्याचे चित्र दिसत आहे. लाचखोरीच्या गतकाळातील प्रकरणांमध्ये ‘खाकी’तल्या पोलिसाने ‘महसूल’वर ‘एक’ने मात करीत अव्वल स्थान गाठले आहे, तर ‘मिनी मंत्रालय’ जिल्हा परिषदेला मागे सारत महापालिका लाचखोरीत पुढे राहिली आहे. गेल्या दोन वर्षांचा आढावा घेतला असता, लाचखोरीच्या समान तक्रारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे असून, गेल्या पंधरा महिन्यांत उपअधीक्षक पराग सोनवणे यांच्या पथकाने ४९ लाचखोरांना ‘बाद’ करीत अर्धशतकाकडे वाटचाल सुरू ठेवली आहे.

लाचखोरीच्या प्रकारांना सामान्य माणसांची मानसिकता सर्वाधिक जबाबदार आहे. काहीतरी ‘खुशाली’ दिली, तर काम लवकर होईल, काम केले आहे- द्यावेच लागेल, आपले काम इतरांपेक्षा लवकर हातोहात करून दिले किंवा नियमांच्या अडचणी असतानाही काम झालेच, अशा विविध हेतूंनी शासकीय नोकरांना पैसे देण्याची (खुशाली) प्रथा प्रचलनात आली. आतातर पैसे दिले तरच काम होईल; अन्यथा नियमांची कात्री दाखवून भीती घातली जाते. मिळणाऱ्या लाभात टक्केवारीचा ‘अघोषित’ नियमच करण्यात आला आहे. त्यातूनच शासकीय कार्यालयांतील लाचखोर नोकरदारांनी यंत्रणा पूर्णत: पोखरून काढली आहे.

महसूल- पोलिसांत स्पर्धा
किरकोळ दाखले, प्रमाणपत्र, परवानग्या, परवाने, उतारे आदींपासून थेट ठेकेदारीत टक्केवारीची हिस्सेदारी ठेवणारा महसूल विभाग आणि कायदा- सुव्यवस्था अबाधित ठेवण्याची जबाबदारी असणारे पोलिस दल यांच्यात लाचखोरीत काट्याची लढत असून, पोलिस दलाने गेल्यावर्षी महसूल विभागाला ‘एक’ने मागे टाकत पोलिस दलाने आपले स्थान अव्वल केले. साठ टक्के लोकसंख्येच्या रोजच्या कामांसाठी ‘मिनी मंत्रालय’ जिल्हा परिषद, भूसंपादन विभागाशी निगडित कामांमुळे लाचखोरीत हे दोघे विभाग पुढारलेले होते. मात्र, या दोघांना पिछाडीवर टाकत महापालिकेने यंदा त्यांच्या वरची जागा मिळवली.

पंधरा महिन्यांत ४९ ‘बाद’!
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक पराग सोनवणे यांच्या पथकाने गेल्या सव्वा वर्षात ४९ जण लाचखोरीच्या कारवाईत ‘बाद’ केले आहेत. त्यात फेब्रुवारी २०१६ मध्ये चार, मार्चमध्ये दोन, एप्रिलमध्ये तीन, मेमध्ये दोन, जूनमध्ये एक, जुलैत पाच, ऑगस्टमध्ये चार, सप्टेंबरमध्ये तीन, ऑक्‍टोबरमध्ये पाच, नोव्हेंबरमध्ये पाच, तर डिसेंबरमध्ये दोन, असे ३६ लाचखोर गेल्या वर्षी तावडीत सापडले; तर जानेवारी २०१७ मध्ये चार, फेब्रुवारीत एक, मार्चमध्ये तीन, एप्रिलमध्ये दोन, तर मेमध्ये तीन जणांवर कारवाई झाली आहे.

विभागनिहाय लाचखोर...
महसूल विभाग : सागर अरुण कोळी (बोरगाव- तलाठी), सत्यजित अशोक नेमाणे (पिंप्राळा- तलाठी), राहुल मुरलीधर वाघ (खडके- तलाठी), अभिजित नामदेव येवले (अव्वल कारकून), विजय साहेबराव वानखेडे (भूमापक), राजेंद्र विश्‍वनाथ सुपेकर (गोद्री- तलाठी), काळूसिंह मगन परमार (लोहटार- तलाठी), मनोहर जगन्नाथ वाणी (पारोळा- तहसील पंटर), प्रदीप देविदास भारंबे (फैजपूर- खासगी पंटर).

पोलिस दल : देवराज युवराज परदेशी, अनिल बबनराव पाटील (दोघे वाहतूक पोलिस), नाना दौलत अहिरे (उपनिरीक्षक), आबासाहेब भास्कर पाटील (चाळीसगाव शहर), रमेश हारू जाधव (पारोळा), कैलास उमरावसिंह चव्हाण (फैजपूर- सहाय्यक फौजदार), मंगला वेताळ पवार (मारवड), योगेश आबासाहेब देशमुख (अडावद- सहाय्यक पोलिस निरीक्षक), प्रकाश विश्राम काळे (रामानंदनगर), रामा सोमा वसतकर (भुसावळ- उपनिरीक्षक), विजय सदाशिव वरघट (जीआरपी).

महापालिका अन्‌ पालिका : उपायुक्त राजेंद्र बापूसाहेब फातले (जळगाव), विवेक पंडित भामरे (भुसावळ), नितीन रमेश खैरनार (अमळनेर), अशोक म्हस्के (जळगाव).

जिल्हा परिषद : अशोक रामदास सोनवणे, कैलास आनंदा ठोके, योगेश शिवाजी पवार. 

शिक्षण विभाग : विलास गंभीर भालेराव (मुख्याध्यापक- पहूर), किशोर तुकाराम तळेले (मुख्याध्यापक- फैजपूर) व दिलीप मुरलीधर चौधरी (शिपाई), अनंत कचरू हिवाळे (मुख्याध्यापक- चाळीसगाव) व संजय सखाराम पवार (उपशिक्षक).

लाचखोरांना रोकडच भावते!
संबंधित लोक लाच घेताना रोख रकमेलाच अधिक प्राधान्य देतात. चीजवस्तू घेताना फसवणुकीची भीती असते. त्यामुळे या वस्तूंच्या स्वरूपात शक्‍यतो लाच स्वीकारली जात नाही. तंत्रज्ञानाचा वापर वाढल्यामुळे लाचखोरही अधिक सावध झाले असून, खासगीतील पंटर किंवा एजंट त्यांची कामे करीत असतो. जनमानसातून तक्रारींची अधिक संख्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागावरील विश्‍वासाचे द्योतक आहे.
- पराग सोनवणे, उपअधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग

अधिकारी दर्जाचे ‘लाच’पटू...!

सुरेश सावंत (कार्यकारी अभियंता, तापी महामंडळ) - ४ लाख २५ हजार

राजेंद्र फातले (महापालिका उपायुक्त) - ५० हजार

डी. टी. डाबेराव  (कारागृह अधीक्षक) - २ हजार

सोमा भोरसे (मंडल अधिकारी) - ४ हजार

भाग्यश्री शिंदे  (महिला अभियंता) - १ हजार

Web Title: police one step next in bribe