पोलिस कर्मचाऱ्यांसह नागरिकांकडून दंड वसूल

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 27 नोव्हेंबर 2016

नाशिक -  वाहतूक व्यवस्थेमध्ये येत्या काळात कठोर नियमांची अंमलबजावणी करण्यापूर्वीच पोलिस आयुक्तांनी पोलिस ठाण्यांपासून दंडात्मक कारवाईला सुरवात केली. सक्तीची अंमलबजावणी करताना हेल्मेट नसलेल्या कर्मचाऱ्यांकडून 500 रुपयांचा दंड वसूल केला. एवढेच नव्हे, तर पोलिस ठाण्यांमध्ये दुचाकीवरून येणाऱ्या नागरिकांनाही हेल्मेटसक्ती केली आहे, अन्यथा त्यांच्याकडूनही 500 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

दोन दिवसांपासून पोलिस आयुक्त रवींद्र सिंगल यांनी 13 पोलिस ठाण्यांमध्ये प्रत्यक्ष भेटी देऊन अधिकाऱ्यांपासून कर्मचाऱ्यांपर्यंत हेल्मेट वापरण्याचे आवाहन करतानाच वाहतूक नियमांची सुरवात स्वतःपासून करण्यास सांगितले. त्यानुसार आजपासून पोलिस ठाण्यांमध्ये येणाऱ्या कर्मचाऱ्यांकडे हेल्मेट नसल्यास प्रवेशद्वारांवरच अडवून 500 रुपयांचा दंड आकारण्यात आला. याचप्रमाणे पोलिस आयुक्तालय कार्यालयातही हेल्मेट नसलेल्यांना प्रवेश नाकारण्यात आला. तसेच कार्यालयीन कर्मचाऱ्यांकडून 500 रुपयांचा दंड आकारून प्रवेश देण्यात आला. यामुळे बहुतांश कर्मचाऱ्यांनी तातडीने हेल्मेट खरेदीचा पर्याय निवडला आहे.

यादी करण्याच्या सूचना
पोलिस ठाण्यांमध्ये हेल्मेट नसणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या तातडीने याद्या तयार करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार प्रायोजक शोधून कर्मचाऱ्यांना हेल्मेटचे वाटप केले जाणार आहे, तर नाशिक रोड, उपनगर, इंदिरानगर, अंबड यासह काही पोलिस ठाण्यांमध्ये कर्मचाऱ्यांना हेल्मेटचे वाटप करण्यात आले. आज काही महत्त्वाच्या रस्त्यांवर चारचाकी वाहनातील चालकाने सीटबेल्ट न लावलेल्यांना जागेवर 500 रुपयांचा दंड आकारण्यास सुरवात केली.

कायदेशीर नियमांची अंमलबजावणी करायची असेल, तर ती सर्वप्रथम स्वत:पासून केली पाहिजे. त्यानुसार आधी पोलिसांनीच हेल्मेटचा वापर आणि सीटबेल्टचा वापर करायला शिकले पाहिजे. पोलिसांना हेल्मेटसक्ती केली आहे. काही दिवसांत संपूर्ण शहरात हेल्मेटसक्‍ती केली जाईल अन्यथा दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागेल.
-डॉ. रवींद्र सिंगल, पोलिस आयुक्त

Web Title: Police recovered fine from citizens with police employees