गुन्ह्यांवर नियंत्रण मिळविण्यात पोलिस अपयशीच...!

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 9 एप्रिल 2017

चोऱ्या, घरफोड्या, लूट सुरूच; निरीक्षकांच्या नियंत्रणाबाहेर कारभार; डीबी पथकेही निरुपयोगी
जळगाव - जिल्ह्याचे ठिकाण असलेल्या जळगाव शहरात गेल्या वर्षभरापासून चोऱ्या, घरफोड्या, दरोडे, जबरी लूट यावर नियंत्रण मिळविण्यात पोलिस दल अपयशी ठरल्याचे दिसते. किरकोळ घरफोड्यांच्या एक-दोन गुन्ह्यांतील संशयित, मोटारसायकलचोर वगळता दाखल गुन्ह्यांचा छडा लावण्यात संबंधित पोलिस ठाण्याच्या डीबी पथकाला पूर्णपणे अपयश आले आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या सायबर सेलची मदत किंवा त्यांच्या नेटवर्कद्वारेच एक-दोन गुन्हे उघडकीस आले.

चोऱ्या, घरफोड्या, लूट सुरूच; निरीक्षकांच्या नियंत्रणाबाहेर कारभार; डीबी पथकेही निरुपयोगी
जळगाव - जिल्ह्याचे ठिकाण असलेल्या जळगाव शहरात गेल्या वर्षभरापासून चोऱ्या, घरफोड्या, दरोडे, जबरी लूट यावर नियंत्रण मिळविण्यात पोलिस दल अपयशी ठरल्याचे दिसते. किरकोळ घरफोड्यांच्या एक-दोन गुन्ह्यांतील संशयित, मोटारसायकलचोर वगळता दाखल गुन्ह्यांचा छडा लावण्यात संबंधित पोलिस ठाण्याच्या डीबी पथकाला पूर्णपणे अपयश आले आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या सायबर सेलची मदत किंवा त्यांच्या नेटवर्कद्वारेच एक-दोन गुन्हे उघडकीस आले.

आश्‍चर्यकारकपणे एक-दोन गुन्हेगार सापडले. इतरत्र मात्र गुन्हे नियंत्रण व दाखल गुन्हे उघडकीस येण्याच्या प्रमाणात अंधारच अंधार दिसतोय. पोलिस दलाचा वचकच संपुष्टात आला असून, जणू जाब विचारणारेच कुणी उरलेले नाही, अशी स्थिती आहे.

जळगाव शहरात गेल्या दोन वर्षांत घडलेल्या मोठ्या गुन्ह्यांच्या तपासाच्या फायली एकापाठोपाठ बंद करण्याचा सपाटाच पोलिस ठाण्यांनी लावला आहे. तक्रारीत तथ्य असूनही गुन्हेगार सापडून येत नसल्याने तपास बंदची प्रकरणे वाढत आहेत. अंत्यत दाट लोकवस्तीच्या शनिपेठ, रिधुरवाडा भागात भरदुपारी सहा-सात दरोडेखोर येतात अन्‌ ५० ते ६० लाखांचे सोने लुटून नेतात. दाखल गुन्ह्यात मुद्देमाल कमी दाखविला जातो.

गुन्ह्याचा तपास दोन वर्षे उलटल्यानंतरही होत नाही. जामनेर येथील व्यावसायिकाच्या कारमधून ५६ लाखांची रोकड अजिंठा चौफुलीसारख्या वर्दळीच्या ठिकाणावरून चोरीस जाते, या गुन्ह्याचाही तपास लागलेला नाही. पोलिस अधीक्षक कार्यालयापासून काही पावलावर असलेल्या भजेगल्लीतील चोपडा मार्केटमधून पन्नास लाखांची सिगारेट चोरटे लंपास करतात, या गुन्ह्याचा तपास नाही की पाठपुरावा नाही. जिल्हा न्यायालयासमोरच्या जेटी चेंबर्स संकुलातील दुकानातून पंचवीस लाखांचे मोबाईल चोरट्यांनी काल लंपास केले. या गुन्ह्याचा तपास लागेल, संशयितांना अटक होईल, याची छातीठोकपणे शाश्‍वती देईल, असा कुणी अधिकारी पोलिस दलात सध्या तरी दिसत नाही. या सर्व परिस्थितीवरूनच आता ‘जळगावकरांनो, स्वत:च्या मालमत्ता स्वत:च सांभाळा, पोलिसांच्या भरवशावर राहू नका’ असे म्हणण्याची वेळ सामान्य जळगावकरांवर येऊन ठेपली आहे. 

पोलिस पेट्रोलिंग कागदावर 
जळगाव शहरातील सहा पोलिस ठाण्यांतून स्वत: पोलिस निरीक्षक रात्री गस्तीला नसतात. ड्युटी बटवड्यात नाइट ड्युटी असते. मात्र, साहेब रात्री नसतात. साहेबच नाही म्हटल्यावर साहेबांचे ‘खास’ या संज्ञेत मोडणारे कर्मचारीही नसतात. शहरात एखादी मोठी घरफोडी झाली, की एक-दोन 
दिवस रात्रगस्तीला सर्वांची शरीराने हजेरी असते. पुन्हा येरे माझ्या मागल्या सुरू. जळगाव शहर व जिल्हापेठ पोलिस ठाण्याची संयुक्त हद्द असलेल्या कोर्ट चौकात एकामागून एक दुकाने फोडले जात असताना आणि शहरात इतरत्रही परिस्थिती विदारक असताना कागदावरील गस्तीचे पितळ उघडे पडते. 

मोजकेच कामगार, बाकी ठेकेदार
जळगाव शहरातील प्रत्येकच पोलिस ठाण्यातील निरीक्षकांच्या नियंत्रणाबाहेर पोलिस ठाण्यांचा कारभार पोहोचला आहे. रात्रगस्तीला दुय्यम अधिकारी एक- दोन कर्मचाऱ्यांना घेऊन रात्री साडेदहाला अस्थापना बंद करण्यासाठी सायरन वाजवत फिरतात. त्यानंतर गस्तीवाहन रात्री ठीक दोनलाच मोजक्‍या ठिकाणी सायरन वाजवताना दिसते. नंतर दिवस उजाडेपर्यंत चोरांसाठी शांतता असते. बिटमार्शल कुठेतरी बसून वॉकीटॉकीचे लोकेशन नियंत्रण कक्षाला सांगून रात्र काढतात. साहेबांच्या नजरेत कूचकामी, न आवडणारे कर्मचारी रात्रीच्या नाइट ड्युट्या घेतात तरी उर्वरित मात्र हजेरी मास्तरला मॅनेज करूनच ठेकेदार पद्धतीने ड्युटी करतात. 

गुन्हे घडले, की बैठका सुरू
शहरात पाच-पन्नास लाखांचे मोठे गुन्हे घडले, की डीबी कर्मचाऱ्यांच्या बैठकांचे सत्र सुरू होते. दत्तक गुन्हेगाराची माहिती घेतली जाते. दिवस-दिवसभर नुसतीच ‘चाय पे’ चर्चा होऊन पुढे पाठ मागे सपाट होते. 

गेल्या पंधरा दिवसांत चोऱ्या 
०८ मार्च : बळिराम मंदिरात चोरीचा प्रयत्न 
१२ मार्च : गणेश कॉलनीत शिक्षक दाम्पत्याकडे चोरी 
१६ मार्च ः बी. जे. मार्केटमध्ये चोरीचा प्रयत्न 
१९ मार्च : समतानगरात एकाच रात्री दोन घरफोड्या 
२१ मार्च : शाहूनगरात चार घरांमध्ये शिरून ऐवज लंपास 
२६ मार्च : गणपतीनगरात भोजवानी यांचा बंगला फोडला
२९ मार्च : गणेश कॉलनीत महिलेची सोनसाखळी लंपास
०३ एप्रिल : जीवननगरातील घर फोडून दागिने रोकड लंपास
०७ एप्रिल : चंद्रमा अपार्टमेंटसमोर शिक्षिकेच्या गळ्यातून सोनसाखळी लंपास

दाखल कमी, उकल शून्य 
औद्योगिक वसाहत पोलिस ठाण्याची हद्द मोठी म्हणून गुन्हेही जास्त दाखल होतात. येथील डीबी पथकाचे गेल्या वर्षभरापासून तारतम्यच बिघडले आहे. गुन्ह्यांचे नियंत्रण तर सोडाच; मात्र दाखल गुन्ह्यांचा तपास नशिबानेच लागतो. शहरातील सर्वच प्रकारचे गुन्हेगार शनिपेठच्या हद्दीत वास्तव्यास आहेत. हाणामाऱ्या, चोऱ्या, लुटीचे गुन्हे करून संशयित येथे निर्धास्त असतात. शहर पोलिस ठाण्याच्या मदतीलाही नेहमी नशीब धावून येते. त्यांच्या हद्दीतील गुन्हे सोडून वेगळेच संशयित त्यांच्या तावडीत सापडतात. त्यांच्याकडील गुन्हे आहे तसेच आहेत. जिल्हापेठ पोलिस ठाण्याची तऱ्हाच न्यारी आहे. आजवर साहेबांच्या पुढे-पुढे करणारे पहिलवान कार्यरत होते. साहेब बदल काम पेंडिंग आहे. तालुका पोलिस ठाणे तर नकाशावरच नाही. वरिष्ठांनी सांगूनही येथील साहेब गुन्हे नोंदवीत नसल्याचे अनुभव आहेत आणि रामानंदनगर पोलिस ठाण्याचा ‘राम’च वाली आहे.

Web Title: police unsuccess in crime control