पोलीस करणार आता बेशिस्त रिक्षाचालकांचे "स्टिंग ऑपरेशन' 

सकाळ वृत्तसेवा 
बुधवार, 20 नोव्हेंबर 2019

नाशिक शहर-परिसरात सुमारे 23 हजार रिक्षा आहेत. यातील किमान 40 ते 50 टक्के रिक्षा विनापरवाना आहेत. बेशिस्त रिक्षाचालकांचा शहराच्या बेशिस्त वाहतुकीच्या समस्येत अग्रक्रम आहे. वाहतूक नियमांचे उल्लंघन करण्यात ते आघाडीवर असतात. चौकाचौकांतील रिक्षा थांब्यांच्या ठिकाणीही वाहतुकीला अडथळा निर्माण करण्यात रिक्षाचालकच कारणीभूत असल्याचे वाहतूक शाखेच्या सर्वेक्षणातून समोर आले आहे. 

नाशिक : नाशिकची सर्वदूर ओळख ही धार्मिक पर्यटनस्थळ असताना पर्यटकांना रिक्षाचालकांकडून आर्थिक व मानसिक त्रास होत असल्याने शहराच्याच नावाला गालबोट लागते आहे. त्यामुळे बेशिस्त रिक्षाचालक आणि प्रवाशांची लूट करणाऱ्या रिक्षाचालकांविरोधात वाहतूक शाखेकडून लवकर कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे. पोलिसांकडूनच बेशिस्त व मुजोर रिक्षाचालकांचे "स्टिंग ऑपरेशन'ही केले जाणार असल्याचे संकेत पोलिस आयुक्त विश्‍वास नांगरे-पाटील यांनी दिले. 

बेशिस्त रिक्षाचालकांचा वाहतुकीच्या समस्येत अग्रक्रम

नाशिक शहर-परिसरात सुमारे 23 हजार रिक्षा आहेत. यातील किमान 40 ते 50 टक्के रिक्षा विनापरवाना आहेत. बेशिस्त रिक्षाचालकांचा शहराच्या बेशिस्त वाहतुकीच्या समस्येत अग्रक्रम आहे. वाहतूक नियमांचे उल्लंघन करण्यात ते आघाडीवर असतात. चौकाचौकांतील रिक्षा थांब्यांच्या ठिकाणीही वाहतुकीला अडथळा निर्माण करण्यात रिक्षाचालकच कारणीभूत असल्याचे वाहतूक शाखेच्या सर्वेक्षणातून समोर आले आहे. 

विनापरवाना रिक्षा पोलिसांच्या रडारवर 

शहरात रिक्षा थांब्यांच्या ठिकाणी क्षमतेपेक्षा चार ते पाच पटीने रिक्षा थांबतात. त्यातही बेशिस्तपणे रिक्षा थांबलेल्या असतात. रिक्षाचालकांकडून प्रवाशांशी अरेरावीची भाषा केली जाते. मनमानी पद्धतीने अव्वाच्या सव्वा भाडे वसूल केले जाते. मीटरचा वापर केला जात नाही. रिक्षाचालकांत गुन्हेगारी पार्श्‍वभूमीच्या चालकांनीही घुसखोरी केली आहे. त्यामुळे रात्री लुटमारीच्या घटनाही घडलेल्या आहेत. हे सारे गृहित धरून पोलिस आयुक्त विश्‍वास नांगरे-पाटील बेशिस्त रिक्षाचालकांविरोधात कारवाईचा बडगा उगारणार आहेत. 23 हजार रिक्षांपैकी विनापरवाना 40 ते 50 टक्के रिक्षाचालकांवर कठोर कारवाईचे आदेशही दिले आहेत. तत्पूर्वी आयुक्तांच्या उपस्थितीत वाहतूक शाखा आणि रिक्षाचालक- मालक संघटनांची बैठक घेण्यात येणार आहे. 
 

सर्वप्रथम रिक्षाचालकांना शिस्त लावणे गरजेचे आहे

शहरात येणारा पर्यटक शहराची ओळख घेऊन जातो. परंतु रिक्षाचालकांकडूनच त्यास त्रास होत असेल तर शहराच्या प्रतिष्ठेला गालबोट लागते. त्यामुळे सर्वप्रथम रिक्षाचालकांना शिस्त लावणे गरजेचे आहे. त्यादृष्टिकोनातून येत्या काही दिवसांत पावले टाकले जातील. - विश्‍वास नांगरे-पाटील, पोलिस आयुक्त 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Police will now conduct sting operation of rickshaw Nashik News