युती दुभंगल्यास महापालिकेतही सत्तांतराचे वारे 

सकाळ वृत्तसेवा 
रविवार, 10 नोव्हेंबर 2019

मुख्यमंत्रिपदावरून राज्यात महायुतीत काडीमोड होण्याची शक्‍यता असल्याने शिवसेनेने सत्ता स्थापन केल्यास त्याचा परिणाम महापालिकेच्या राजकारणावर होणार आहे. भाजपमधील नाराजांना बरोबर घेत शिवसेनेकडून सत्ता स्थापनेच्या हालचाली होण्याच्या शक्‍यतेने महापालिकेत दगाफटका होऊ नये म्हणून माजी मंत्री गिरीश महाजन नाशिकमध्ये ठाण मांडणार आहेत. 

नाशिक : मुख्यमंत्रिपदावरून राज्यात महायुतीत काडीमोड होण्याची शक्‍यता असल्याने शिवसेनेने सत्ता स्थापन केल्यास त्याचा परिणाम महापालिकेच्या राजकारणावर होणार आहे. भाजपमधील नाराजांना बरोबर घेत शिवसेनेकडून सत्ता स्थापनेच्या हालचाली होण्याच्या शक्‍यतेने महापालिकेत दगाफटका होऊ नये म्हणून माजी मंत्री गिरीश महाजन नाशिकमध्ये ठाण मांडणार आहेत. 

महायुती म्हणून बहुमत मिळाले असले तरी मुख्यमंत्रिपदावरून युती दुभंगली

2014 मध्ये राज्यात महायुतीची सत्ता आल्यानंतर 2017 मध्ये महापालिकेच्या निवडणुकांची घोषणा करण्यात आली. भाजपच्या वतीने प्रचार करताना तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिक दत्तक घेत असल्याची घोषणा केली. गेल्या अडीच वर्षांच्या कार्यकाळात सत्ताधारी भाजपला ठोस असे काम करता आले नसले तरी शेवटच्या टप्प्यात टायरबेस मेट्रोसह पाणीपुरवठा, मलनिस्सारण व्यवस्थेसाठी निधी देण्याची घोषणा करण्यात आली. नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकांमध्ये भाजप- शिवसेनेने महायुती म्हणून निवडणूक लढविली. महायुती म्हणून बहुमत मिळाले असले तरी मुख्यमंत्रिपदावरून युती दुभंगली. त्यामुळे सध्या राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे. युती तोडल्याची घोषणा झाली नसली तरी तुटल्यात जमा असल्याचे मानले जात आहे. 

शिवसेनेकडून सत्ता स्थापन करण्यासाठी प्रयत्नाची शक्यता 

शिवसेनेकडून सत्ता स्थापन करण्यासाठी प्रयत्न होण्याची शक्‍यता आहे. शिवसेनेचा मुख्यमंत्री झाल्यास त्याचा परिणाम महापालिकेच्या सत्ताकारणावर होण्याची दाट शक्‍यता आहे. महापालिकेत भाजपचे 66 नगरसेवक असल्याने बहुमत आहे. त्याखालोखाल शिवसेना व अन्य पक्षांचे नगरसेवक आहेत. दोन नगरसेवकांनी राजीनामा दिला असल्याने बहुमताचा आकडा पार करण्यासाठी साठ नगरसेवकांची आवश्‍यकता आहे. शिवसेनेचे 34 व अन्य 19, असे 53 नगरसेवकांचे बळ एकत्रित केल्यानंतरही सात ते आठ नगरसेवकांची गरज भासेल. भाजपमधून राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये त्यानंतर शिवसेनेत प्रवेश केलेल्या माजी आमदार बाळासाहेब सानप समर्थक नगरसेवकांची संख्या पंधराच्या आसपास आहे. त्यातील सात ते आठ नगरसेवकांनी शिवसेनेला पाठिंबा दिल्यास महापालिकेत सत्तांतर होण्याची दाट शक्‍यता असल्याने शिवसेनेकडून तसे प्रयत्न सुरू असल्याचे बोलले जात आहे. 

सत्तांतर झाल्यास या प्रकल्पांवर परिणाम 
- टायरबेस मेट्रोसाठी प्रकल्प 
- 14 हजार पदांचा नवीन आकृतिबंध 
- शहर बससेवा 
- ड्रेनेज, मलनिस्सारण केंद्र क्षमता वाढीसाठीचा निधी 
- पाणीपुरवठा योजनांसाठी निधी 

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: political Alliance at Nashik News