राजकारण पिंड नाही - ॲड. निकम

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 7 जानेवारी 2019

राजकारण हा माझा पिंड नाही. यावर गांभीर्याने सध्यातरी विचार नाही. याबाबत कुटुंबीयांसह आप्तेष्टांना विचारूनच यापुढील निर्णय घेईल. सध्या तरी मी खटल्यांमध्ये व्यस्त आहे, असे ॲड. निकम यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

चोपडा - महाराष्ट्रातील आत्महत्याग्रस्त कुटुंबाला मदत करणाऱ्या नाम फाउंडेशनचे काम चांगले आहे. नाम फाउंडेशनच्या पाच ट्रष्टीपैकी मी एक आहे. आजपर्यंत मी अनेक कार्यक्रमांना गेलो. परंतु चोपड्यात पत्रकारांनी सामाजिक बांधिलकी जपत कार्यक्रम घेऊन आत्महत्याग्रस्त कुटुंबांना मदत केली ही बाब अभिमानास्पद आहे. वृत्तपत्र व पत्रकारिता हे बऱ्याच गोष्टी बोलतात. हा व्यवसाय नसून धर्म मानला पाहिजे, असे मत पद्मश्री ॲड उज्ज्वल निकम यांनी आज व्यक्त केले.

पत्रकार दिनानिमित्त अकुलखेडा येथील गिरीराज लॉन्स आयोजित तालुक्‍यातील दोन वर्षांत झालेल्या आत्महत्याग्रस्त शेतकरी बांधवांच्या वारसांना आर्थिक मदतीचा हात देताना ते बोलत होते.

विधानसभा माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराथी अध्यक्षस्थानी होते. व्यासपीठावर ‘सकाळ’चे खानदेश आवृत्तीचे निवासी संपादक राहुल रनाळकर, माजी आमदार डॉ. सुरेश पाटील, माजी आमदार कैलास पाटील, माजी आमदार जगदीश वळवी, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष गोरख तात्या पाटील, नगराध्यक्षा मनीषा चौधरी, इंदिराताई पाटील, विजया पाटील, प्रभाबेन गुजराथी, अतुल ठाकरे, नीता पाटील, दिलीप पाटील, डॉ. विकास हरताळकर, डॉ. दीपक पाटील, राजेंद्र रायसिंग, अशोक सोनवणे, पी. बी. पाटील, चंद्रशेखर पाटील, नंदकिशोर पाटील, जीवन चौधरी, गजेंद्र सोनवणे, एम. व्ही. पाटील, आनंदराव रायसिंग, विकास पाटील, राजाराम पाटील, राजेंद्र पाटील, अनिल वानखेडे, रवींद्र भादले, ज्ञानेश्वर भादले, कल्पना यशवंत पाटील, मालुबाई कोळी आदी उपस्थित होते. आत्महत्याग्रस्त शेतकरी बांधवांच्या वारसांना आर्थिक मदत देण्याचा अनोखा कार्यक्रम पत्रकार म्हणून संजय सोनवणे, सुनील पाटील, पंकज पाटील, प्रवीण पाटील, तुषार सूर्यवंशी, विनोद निकम, छोटू वारडे यांनी आयोजित केला होता.

ॲड. निकम म्हणाले की, पत्रकारांनी सामाजिक बांधिलकी जोपासून आत्महत्याग्रस्त कुटूंबांना मदत करून धर्म पाळला आहे. तसेच मी आज काय बोलणार म्हणून चोपडा येथील पत्रकाराच्या आयोजित कार्यक्रमाला मोठी गर्दी झाली असली, तरी मी वकील असल्याने शब्द सांभाळून बोलणार आहे. मला राजकीय चर्चेत कोणी ढकलले हे समजत नाही. परंतु मी वकील असल्याने यात सापडणार नाही. मी कोणत्याही राजकीय पक्षाशी बांधील नसून समाजाचा वकील म्हणून समाजात वावरत असतो. 

असा कार्यक्रम मी पाहिला नाही - गुजराथी
चोपड्यातील पत्रकारांनी आज चोपडा तालुक्‍यातील दोन वर्षात आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याच्या वारसांना जी मदत दिली आहे ती बाब गौरवास्पद असून चाळीस वर्षात असा कार्यक्रम मी पाहिला नाही, असे श्री. गुजराथी यांनी सांगितले.

श्री. रनाळकर म्हणाले, की तरुण पिढी सोशल मीडियात ओढली गेली. यामुळे किमान १२ ते १५ पिढ्या बरबाद होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. त्यामुळे विचाराच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपणारी पिढी निर्माण करावी. 

डॉ. दीपक पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले. राधेश्‍याम पाटील यांनी सूत्रसंचालन केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Politics Ujjwal Nikam