शहरातील टपाल कार्यालयांतून सव्वा कोटी रुपयांचे वाटप 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 14 नोव्हेंबर 2016

पंचवटी - रविवार असूनही शहरातील मुख्य टपाल कार्यालयासह विविध 32 कार्यालयांतून आज एक कोटी 31 लाख रुपयांचे वाटप करण्यात आले. मात्र, याद्वारे केवळ दोन हजारांच्याच नोटांचे वाटप करण्यात आल्याने नागरिकांपुढील सुट्यांची डोकेदुखी थांबण्याची कोणतीही चिन्हे नाहीत. सुटीचा दिवस असूनही टपाल खात्यातर्फे ग्राहकांची गैरसोय टाळण्यासाठी शहरातील सर्व टपाल कार्यालये खुली ठेवत "एक्‍स्चेंज' मोहीम राबविण्यात आली. केंद्र सरकारने चलनातून हजार व पाचशे रुपयांच्या नोटा बंद केल्याने नोटा बदलण्यासाठी बॅंकांमध्ये गर्दी उसळली आहे. 

सरकारने बॅंकांसह देशभरातील टपाल कार्यालये आज सुरू ठेवत नागरिकांसाठी नोटा बदलून देण्याची व्यवस्था केली होती. मुख्य टपाल कार्यालयात आज सकाळीही नोटा बदलून घेण्यासाठी मोठी रीघ लागली होती. येथे दिवसभरात 40 लाखांच्या नोटा बदलून देण्यात आल्या. पंचवटीतील गणेशवाडीतील टपाल कार्यालयातही नागरिकांनी पैसे बदलून मिळण्यासाठी रांगा लावल्या होत्या. तेथे चार लाख रुपये बदलून देण्यात आल्याची माहिती पोस्टमास्टर संदेश बैरागी यांनी दिली. काळाराम मंदिर उत्तर दरवाजाजवळील उपटपाल कार्यालयातूनही आज चार लाख रुपयांचे वाटप करण्यात आल्याची माहिती पोस्टमास्टर ई. एल. पालवे यांनी "सकाळ'ला दिली. 

नागरिकांचा रोष कायम 

शहरातील राष्ट्रीयीकृत बॅंकांसह सहकारी बॅंका, मुख्य टपाल कार्यालयांसह विविध 32 टपाल कार्यालयांमधून नोटा बदलून देण्याची सुविधा करण्यात आली आहे. मात्र, असे असले तरी ग्राहकांना आवश्‍यक असलेल्या शंभर व पन्नास रुपयांच्या नोटांऐवजी दोन हजार रुपयांच्या नोटा मिळत असल्याने नागरिकांची डोकेदुखी आणखी वाढली आहे. कारण प्रत्येक जण दोन हजार रुपयांची नोट घेऊन येत असल्याने व्यावसायिकांचीही गैरसोय होत आहे. 

टपाल खात्यातर्फे नोटा बदलून देण्याची मोहीम यापुढेही सुरूच राहणार आहे. खात्याच्या अल्पबचत प्रतिनिधींनीही घाबरून जाण्याचे कारण नाही, त्यांनी त्यांचा भरणा बचत खात्यात जमा करावा. 

- मोहन अहिरराव, सीनिअर पोस्टमास्टर, मुख्य टपाल कार्यालय

Web Title: Post offices allocated Rs crore city

टॅग्स