पोल्ट्री व्यवसायिकांमध्ये आनंदी वातावरण

विजय पगारे
रविवार, 27 मे 2018

इगतपुरी : दरवर्षी जेमतेम भावाने मिळणारे चिकन चालू वर्षी उन्हाळ्यातील सर्वाधिक भावाने विक्री होत आहे. सध्या सुरू असलेले विविध समारंभ,  लग्नसराई, वाढदिवस पार्ट्या तसेच सुट्टीच्या दिवसांत कौटोंबिक सहल यामुळे चिकनला मागणी वाढली असून ऐन उन्हाळ्यात चिकनचे भाव कडाडले आहेत.

इगतपुरी : दरवर्षी जेमतेम भावाने मिळणारे चिकन चालू वर्षी उन्हाळ्यातील सर्वाधिक भावाने विक्री होत आहे. सध्या सुरू असलेले विविध समारंभ,  लग्नसराई, वाढदिवस पार्ट्या तसेच सुट्टीच्या दिवसांत कौटोंबिक सहल यामुळे चिकनला मागणी वाढली असून ऐन उन्हाळ्यात चिकनचे भाव कडाडले आहेत.

होलसेल मार्केटिंग करणा-या चिकन व्यावसायिकांनी या आठवड्यात 90 ते 95 रुपये दराने कोंबड्या खरेदी केल्या आहेत. दोन महिन्यांपूर्वी कोंबड्यांच्या विक्रीवर मंदीचे सावट होते. त्यामुळे लिफ्टिंगला बॅच येऊन देखील कंपनी माल उचलायला लवकर तयार होत नसे. त्यामुळे बेचाळीस ते पन्नास दिवसांपर्यंत इगतपुरी तालुक्यातील पोल्ट्री शेड भरलेले दिसले. परंतु गेल्या आठवड्यांपासून चिकनचे भाव आणि मागणी वाढली असून 38 व्या दिवशीच कंपनी शेड खाली करत असल्याचे चित्र दिसत आहे. 

इगतपुरी तालुक्यात शेतीला पूरक व्यवसाय म्हणून अनेक बेरोजगार युवकांनी पोल्ट्री व्यवसाय उभारले आहेत. 'कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग'च्या माध्यमातून विविध नामांकित कंपन्यांशी करार करून आपले व्यवसाय जोमात सुरू केले आहेत. परंतु पाण्याच्या दुर्भिक्ष्य अभावी काहींनी आपापले शेड रिकामेच ठेवले आहेत. सध्या उष्णतेचा पारा चाळीस पर्यंत पोहोचला असूनही यावर्षी बाजारात चिकनला मागणी वाढली आहे. बॉयलर कोंबडीचे लिफ्टिंग रेट 90 ते 95 पेक्षा पुढे जाऊन पोहोचले असून किरकोळ विक्री करणारे व्यवसायिक 160  ते 180 रुपये किलो दराने कोंबडीचे चिकन विकत आहेत. सद्यस्थिती, हळद आणि मित्र मंडळींना घेऊन वाढदिवस पार्ट्या साजरे करण्याचे सुटलेले पेव बघता मटण, चिकन पाटर्याना चांगलाच उत आला आहे. 

उन्हाळ्यामुळे काही पोल्ट्री शेड रिकामे आहेत तर वातावरणातील तीव्र उष्णतेने स्ट्रोक बसून लिफ्टिंगला असलेल्या शेड मधील पक्षी मरतात. परिणामी पोल्ट्री व्यवसायिकांचे नुकसान होते. यामुळे कोंबड्यांअभावी घाऊक बाजारात मालाची पुरेशी उपलब्धता नाही म्हणूनच चिकनचे दर वधारले आहेत. 

दिवसेंदिवस चिकन खाणा-यांची संख्या वाढत आहे त्यातच उन्हाळ्यातील पक्षांची मर आणि इतर आजारामुळे पोल्ट्री धारक सहसा बॅच टाकत नाही. परिणामी बाजारात चिकनला तुटवडा भासतोय. ज्यांची बॅच येत्या पंधरवाड्यात लिफ्टिंगला आहे त्यांना वाढत्या बाजारभावाचा नक्कीच फायदा होईल. उन्हाळ्यात पक्षांची काळजी घेऊन शेडवर गवत टाकावे आणि पाणी मारावे. बाजार भाव असेच महिनाभर तरी टिकतील.
 - विक्रम पासलकर, पोल्ट्री व्यवसायिक अस्वली स्टेशन 

Web Title: poultry businessmen are Happy