सत्तेचा फेव्हिकॉल: भाजप-सेना वाद तात्पुरता- चंद्रकांत पाटील

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 9 फेब्रुवारी 2017

जिल्हापरिषद निवडणुकीच्या निमित्ताने चंद्रकांत पाटील दोन दिवसांपासून जिल्ह्यात असून आज त्यांनी 'सकाळ' कार्यालयास भेट दिली. यावेळी त्यांच्यासमवेत भाजपच्या 'बेटी बचाओ' अभियानाचे राष्ट्रीय संयोजक तथा गोव्याचे प्रभारी डॉ. राजेंद्र फडके उपस्थित होते. 

जळगाव : भाजप-शिवसेनेतील मतभेद तत्कालिक आहेत, तात्त्विक नाहीत. सत्ता ही फेविकॉलने चिटकवल्यासारखी घट्ट असते, त्यामुळे सध्या या दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये सुरू असलेल्या राजकीय चिखलफेकीचे दूरगामी परिणाम दोन्ही पक्षांवर होणार नाहीत, असे राज्याचे महसूल तथा सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले. 

उलटपक्षी मुंबई महापालिकेत आमचे 114 नगरसेवक निवडून आले, तरीही भाजप-शिवसेनेने सोबत काम केले पाहिजे, अशी भावना पाटील यांनी व्यक्त केली. 

'सकाळ'च्या औद्योगिक वसाहतीतील कार्यालयात आयोजित 'कॉफी विथ सकाळ' या कार्यक्रमात ते बोलत होते. जिल्हापरिषद निवडणुकीच्या निमित्ताने चंद्रकांत पाटील दोन दिवसांपासून जिल्ह्यात असून आज त्यांनी 'सकाळ' कार्यालयास भेट दिली. यावेळी त्यांच्यासमवेत भाजपच्या "बेटी बचाओ' अभियानाचे राष्ट्रीय संयोजक तथा गोव्याचे प्रभारी डॉ. राजेंद्र फडके उपस्थित होते. 

राज्यातील भाजप-सेनेच्या नेत्यांमध्ये महापालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर होत असलेल्या राजकीय चिखलफेकीसंदर्भात बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, हा वाद तत्कालिक स्वरुपाचा आहे. परंतु, यात शिवसेना नेत्यांकडून अगदीच खालच्या पातळीवर टीका होत आहे. अगदी प्राण्यांचा उल्लेख, पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांवर एकेरी भाषेत टीका हे जनतेलाच आवडणार नाही व जनता त्यांच्या भावना मतांमधून व्यक्त करेल. भाजपने मात्र कुठेही अशाप्रकारची भाषा वापरली नाही, ती आमची संस्कृती नाही, असेही ना. पाटील म्हणाले. 
 

Web Title: power is like fevicol, chandrakant patil