नवजीवन एक्‍स्प्रेसच्या इंजिनवर कोसळला विद्युत खांब 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 7 मे 2017

भुसावळ-सुरत रेल्वेलाईन एकमार्गी (सिंगल) असल्याने पश्‍चिम रेल्वेमार्गावरील वाहतुकीचा यामुळे दोन तास खोळंबा झाला. एक्‍स्प्रेसच्या इंजिनमध्येही बिघाड झाल्याने मालगाडीचे इंजिन लावण्यात आले. त्यानंतर नवजीवन एक्‍स्प्रेस मार्गस्थ झाली.

जळगाव - चेन्नई-अहमदाबाद नवजीवन एक्‍स्प्रेसच्या इंजिनवर पाडसे (ता. अमळनेर)  रेल्वे स्थानकाजवळ विद्युत खांब पडल्याने दोन तास एक्‍स्प्रेस रोखण्यात आली.

भुसावळ-सुरत रेल्वेलाईन एकमार्गी (सिंगल) असल्याने पश्‍चिम रेल्वेमार्गावरील वाहतुकीचा यामुळे दोन तास खोळंबा झाला. एक्‍स्प्रेसच्या इंजिनमध्येही बिघाड झाल्याने मालगाडीचे इंजिन लावण्यात आले. त्यानंतर नवजीवन एक्‍स्प्रेस मार्गस्थ झाली. चालकाच्या प्रसंगावधानाने मोठी दुर्घटना टळली. 

पाडसे रेल्वे रूळावरील दुहेरीकरण सुरू असलेल्या बाजूच्या रूळावर पोल टाकण्याचे काम सुरू आहे. आज सकाळी सव्वादहाच्या सुमारास अमळनेर स्थानकावरून सुटलेली नवजीवन एक्‍स्प्रेस पाडसेजवळ पोचली असता क्रॉसिंगमुळे एक्‍स्प्रेसचा वेग कमी होता. मात्र, यावेळीच विद्युत पोल इंजिनवर कोसळला. चालकाने प्रसंगावधान राखून लागलीच एक्‍स्प्रेस रोखल्याने मोठी दुर्घटना टळली. मात्र, इंजिनमध्ये बिघाड झाला. मालगाडीचे इंजिन लावून पुन्हा मागे घेऊन पाडसे स्थानावर एक्‍स्प्रेस थांबविण्यात आला. त्यानंतर पुढे इंजिन बदलून एक्‍स्प्रेस दोन तासानंतर मार्गस्थ झाला. रणरणते ऊन, लग्नसराईने प्रवाशांचे हाल झाले. पाडसे स्थानकावर खाद्यपदार्थ व पाण्याची सोय नसल्याने प्रवाशांची तारांबळ उडाली. 

Web Title: Power pole collapsed on Navajivan Express