सेवानिवृत सैनिकाचा स्पर्धा परीक्षेत लक्षभेद

pune.jpg
pune.jpg

येवला : वय वाढते, अनुभवही वाढतो पण विद्यार्थी दशा कधी संपत नाही. त्यात मनात ऊर्मी असेल तर, काहीही शक्य आहे. हे साध्य करुन दाखविले आहे सोमठाण जोश येथील शेतकरी कुटुंबातील प्रदीप आगवन या युवकाने. देशसेवा करून सेवानिवृत्त झाल्यानंतर मनात स्पर्धा परीक्षेचे स्वप्न पाहत या युवकाने पहिल्याच प्रयत्नात यशस्वी होऊन कर सहाय्यक पदाला गवसणी घातली आहे.

तुमच्याकडे जिद्द, मेहनत आणि स्वप्न असले की कुठलाच अडथळा रोखू शकत नाही. शालेय दशेपासून चुणचुणीत असलेल्या प्रदीप यांनी राजापूरच्या शाळेत शिक्षण घेतल्यानंतर नांदगाव येथे पदवी संपादन केली. शिकतानाच देशसेवेची आवड असल्याने पहिल्याच भरतीत ते २००० मध्ये सैनिक म्हणून देशसेवेसाठी रुजू झाले ते १९ व्या वर्षी. त्यानंतर १७ वर्षे त्यांनी देशसेवा केली. तेथेही आपल्यातील चुणूक दाखवत नेहमीच आपल्या उत्कृष्ट कामाचा आदर्श त्यांनी दाखविला. जुलै २०१७ मध्ये सेवानिवृत्त झाल्यानंतर अनेक नोकरीच्या संधी असताना या संधींच्या पाठीमागे न लागता त्यांनी लोकसेवा आयोगाची परीक्षा देऊन उच्च पदावर काम करायचे असा निश्चय केला आणि सुरू झाला तो प्रवास. 

औरंगाबाद येथे विनर्स करियर पोइंट स्पर्धा परीक्षेचा क्लास लावून एक वर्षभर त्यांनी नियमितपणे तेथे अभ्यास केला. विशेष म्हणजे या वयातही कुठल्याही गोष्टीचा अडथळा येऊ न देता या अभ्यासावर त्यांनी लक्ष केंद्रित केले. त्याचा परिणाम म्हणजे जून २०१८ मध्ये झालेल्या लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत ते पहिल्याच प्रयत्नात आणि वर्षभराच्या अभ्यासातच उत्तीर्ण झाले आणि कर सहाय्यक या पदाला त्यांनी गवसणी घातली आहे. लवकरच या पदावर ते रुजू होणार आहे. विशेष म्हणजे या पुढेही अजून स्पर्धा परीक्षा देऊन उच्चपदावर काम करण्याचा त्यांचा मानस आहे.

“सेवानिवृत्त झाल्यावर विविध ठिकाणी नोकरीच्या संधी होत्या परंतु अभ्यासातून यश मिळवू शकतो हे मी ओळखले आणि नोकरी न करता उच्च पदावर काम करण्यासाठी स्पर्धा परीक्षा द्यायचे असे ठरवले.आई-वडिलांचे भावांचे ही मार्गदर्शन मिळाले आणि वर्षभराच्या प्रयत्नांना पहिल्याच प्रयत्नात यश आले. देश सेवा केल्यानंतर पुन्हा एकदा देशासाठी चांगल्या पदावर काम करण्याची संधी मिळाल्याचा अत्यानंद आहे.”
- प्रदीप आगवण,सोमठाणे जोश.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com