‘प्रकाशा-बुराई’ योजनेचे काम मार्गी लावा

‘प्रकाशा-बुराई’ योजनेचे काम मार्गी लावा

धुळे - मालपूर (ता. शिंदखेडा) येथील अमरावती धरणात अकरा वर्षांपासून पूर्ण क्षमतेने जलसाठा झालेला नाही. धरणाचे काम झाल्यापासून एकदाही देखभाल- दुरुस्ती न झाल्याने दुरवस्था झाली आहे. याकडे संबंधित विभागाने लक्ष द्यावे, अमरावती प्रकल्प तापीच्या पाण्याने भरण्यासाठी प्रकाशा- बुराई उपसा सिंचन योजनेला गती द्यावी, आदी मागण्यांसाठी आज सकाळी अकराला प्रकाशा- बुराई उपसा सिंचन योजना संघर्ष समितीतर्फे येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.

शिंदखेडा पंचायत समितीचे मालपूर गणाचे सदस्य सतीश पाटील यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले. माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, नंदुरबार जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष वकील पाटील, शिंदखेडा पंचायत समितीचे माजी उपसभापती रामसिंह गिरासे, दोंडाईचा बाजार समितीचे माजी सभापती विठ्ठलसिंह गिरासे, हिरामण बैसाणे, मालपूर ग्रामपंचायत सदस्य बापू कोळी, कृष्णा पाटील, वसंत वाघ, माजी उपसरपंच भगवान कोळी, शांतिलाल गोराणे, मोहन लांडगे, राहुल पाटील, नंदलाल पाकळे, सुनील धनगर, भटू कोळी, कमलेश पाटील, दामू माळी, भटू भिल, रघुनाथ अहिरे, हरी माळी, निंबा माळी यांच्यासह लाभक्षेत्रातील तरुण शेतकरी सहभागी झाले होते.

निवेदनात विविध मागण्या
मागण्यांचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी तुकाराम हुलवळे यांना देण्यात आले. त्यात म्हटले आहे, की  तापी नदीवरील प्रकाशा बॅरेजवरून प्रकाशा- बुराई उपसा सिंचन योजना १७ वर्षांपासून मंजूर आहे. यात पावसाळ्यात तापीच्या पुराचे वाहून जाणारे पाणी जलवाहिनीद्वारे उचलले जाणार आहे. योजनेतील आराखड्यात काही बदल करणे आवश्‍यक आहेत. प्रकाशा-बुराई उपसा सिंचन योजनेचा केंद्र सरकारच्या शीघ्र पाणीपुरवठा योजनेत समावेशासाठी राज्य सरकारने शिफारस करावी, योजनेचे काम चार टप्प्यांत होणार असून, त्यासाठी  वेगवेगळ्या निविदा काढाव्यात, प्रकल्पस्थळी जाणारा रस्ता, कालवे, विजेची व्यवस्था, बंधाऱ्याजवळील मातीबांधाची देखभाल-दुरुस्ती व्हावी, बुडीत क्षेत्रात शेती गेलेल्या शेतकऱ्यांना पूर्ण मोबदला द्यावा, प्रकल्पग्रस्त कुटुंबांतील बेरोजगारांना शासकीय नोकरी द्यावी, उपसा सिंचन योजनेला लागणाऱ्या ३५० कोटी निधीची तरतूद यंदाच्या अर्थसंकल्पातच करावी.

अधिकाऱ्यांनी दिली भेट
आंदोलनस्थळी पाटबंधारे उपविभागाचे (साक्री) उपविभागीय अधिकारी डी. टी. बडगुजर, अमरावती प्रकल्पाचे शाखा अभियंता ए. एम. तोरवणे यांनी भेट दिली. यावेळी प्रकल्पस्थळी जाणाऱ्या रस्त्याची दुरुस्ती, नवीन सोलर लाइट लावणे, कालव्यांची दुरुस्ती यासाठी सहा लाख रुपयांची मागणी अधीक्षक अभियंत्यांकडे केल्याचे श्री. बडगुजर यांनी सांगितले. धुळे पाटबंधारे प्रकल्प मंडळाचे उपअधीक्षक अभियंता एस. के. भदाणे यांनीही आंदोलकांचे निवेदन स्वीकारले. निवासी जिल्हाधिकारी हुलवळे यांनी, या विषयावर संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांची एकत्रित बैठक घेऊन सर्व ‘अपडेट’ मागविले जातील. यातून मागण्यांसंदर्भात कार्यवाहीबाबत चर्चा करण्याचे आश्‍वासन दिले.

‘सकाळ’च्या वृत्तमालिकेची दखल
‘सकाळ’मध्ये सात मार्चपासून ‘अमरावतीची वाताहत’ ही वृत्तमालिका प्रकाशित होत आहे. त्याची दखल घेत संघर्ष समितीने आज धुळ्यात आंदोलन केले. आंदोलकांनी संबंधित अधिकाऱ्यांकडे अमरावती प्रकल्पाच्या दुरवस्थेबाबत कैफियत मांडली. मागण्यांबाबत कार्यवाही न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही दिला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com