मोटार वाहन निरीक्षक पदाच्या परीक्षेत प्रांजल सोनवणे दुसरी

रोशन खैरनार
सोमवार, 2 एप्रिल 2018

देशासाठी काहीतरी करण्यासाठी आयएएस बनण्याची माझी लहानपणापासून इच्छा आहे. पहिल्याच प्रयत्नात सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक पदाच्या परीक्षेत राज्यात दुसरा क्रमांक मिळाल्यामुळे खूप भारावले आहे. यामुळे माझे कुटुंबीय आनंदी आहेत. यापुढील काळात आयएएस बनण्याचे स्वप्न पूर्ण करणार आहे.
- प्रांजल राजेंद्र सोनवणे

सटाणा : महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक पदाच्या परीक्षेत इतर मागास प्रवर्गातून सटाणा येथील प्रांजल राजेंद्र सोनवणे या विद्यार्थिनीने राज्यात दुसरा क्रमांक मिळविला आहे. तिच्यासोबतच बागलाण तालुक्यातील अमित श्रीकांत रौंदळ (भाक्षी) व अनिकेत संजय गुंजाळ (तिळवण) यांनी राज्यात अनुक्रमे ९८ व १०३ वा क्रमांक मिळवून यश मिळविले आहे. या सर्वांनी पहिल्याच प्रयत्नात मिळविलेल्या या यशाने महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील टॅलेंटवर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले आहे.

गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात घेण्यात आलेल्या प्रादेशिक परिवहन (आर.टी.ओ.) विभागा अंतर्गत सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक पदाच्या ८३३ जागांसाठी ही परीक्षा घेण्यात आली होती. परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. येथील प्रगतीशील शेतकरी राजेंद्र सोनवणे व वंदना सोनवणे यांना दोन मुली असून आपल्या मुलींनी भरपूर शिकावे, कलेक्टर बनून देशसेवा करावी आणि आजच्या पिढीसमोर एक आदर्श निर्माण करावा अशी श्री.सोनवणे यांची इच्छा आहे. त्यानुसार त्यांनी मोठी मुलगी प्रांजलला शिक्षणात प्रोत्साहन दिले. प्रांजलचे प्राथमिक शिक्षण मविप्र समाज संस्थेच्या येथील अभिनव बालविकास मंदिर शाळेत तर माध्यमिक शिक्षण जिजामाता गर्ल्स हायस्कूलमध्ये झाले. पुणे येथील होरायझन महाविद्यालयात उच्च माध्यमिक शिक्षण घेत असताना इयत्ता बारावीत तिने ८८ टक्के गुण मिळवले होते. २०१६ मध्ये मुंबईच्या माटुंगा येथील व्ही.जे.टी.आय. शासकीय महाविद्यालयात तिने बी.टेक. (प्रोडक्शन) ही पदवी पूर्ण केली.

दरम्यानच्या काळात वर्तमानपत्रात प्रादेशिक परिवहन विभागा अंतर्गत सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक पदाच्या परीक्षेची जाहिरात बघताच आईच्या आग्रहाखातर तिने ही परीक्षा दिल्याचे सांगितले. पूर्व परीक्षेत मन लावून अभ्यास करून चांगले गुण मिळविल्याने मुख्य परीक्षेसाठी तिची निवड झाली. त्यानंतर ऑगस्ट महिन्यात इतर मागास प्रवर्गातून तिने परीक्षा दिली होती. परीक्षेसाठी कुटुंबासोबत तिला बहिण डॉ.प्रज्ञा पाटील (मुंबई) यांची विशेष मदत मिळाली. सटाणा पालिकेचे माजी नगराध्यक्ष (कै.) यादवराव झिप्रू सोनवणे यांची ती नात, येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती भिका सोनवणे यांची पुतणी तर प्रगतीशील शेतकरी राजेंद्र सोनवणे यांची ती कन्या आहे. निकाल जाहीर होताच सोनवणे कुटुंबियांनी एकच जल्लोष करीत आनंदोत्सव साजरा केला.  अनेक मान्यवर व नातलगांनी घरी येऊन प्रांजलचे विशेष कौतुक केले.

भाक्षी (ता.बागलाण) येथील सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील अमित श्रीकांत रौंदळ याने सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक पदाच्या परीक्षेत राज्यात ९८ वा क्रमांक मिळवत नेत्रदीपक यश मिळविले. प्रगतीशील शेतकरी व ज्येष्ठ पत्रकार श्रीकांत रौंदळ यांचा तो पुत्र आहे. येथील कर्मवीर आबासाहेब तथा ना.म. सोनवणे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातून बारावीची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर त्याने नाशिक येथील मविप्र समाज संस्थेच्या ऍड. बाबुराव ठाकरे इंजिनिअरिंग कॉलेजमधून बी.ई. (मेकेनिकल) ची पदवी संपादन केली. त्यानंतर गेल्या वर्षी अमितने सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक पदाची परीक्षा दिली होती. 

तिळवण येथील अनिकेत संजय गुंजाळ याने या परीक्षेत राज्यात १०३ वा क्रमांक मिळविला आहे. क्रिएटीव्ह अकॅडमी येथे बारावीची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर त्याने लोणेरे (जि.रायगड) येथील बाबासाहेब आंबेडकर टेक्निकल युनिव्हर्सिटीमध्ये बी.टेक. पदवी मिळविली. अनिकेत सध्या पुणे येथील शासकीय महाविद्यालयात एम.टेक. पदवीच्या पहिल्या वर्षात शिक्षण घेत आहे. लोहोणेर (ता.देवळा) येथील प्राथमिक शिक्षक संजय गुंजाळ व करंजाड (ता.बागलाण) येथील माध्यमिक विद्यालयाच्या उपशिक्षिका लता शिरसाठ यांचा तो पुत्र तर कळवण येथील प्रख्यात बांधकाम व्यावसायिक रमेश शिरसाठ यांचा भाचा आहे. ग्रामीण पार्श्वभूमी, शेतकरी आईवडील आणि सोबत केवळ कष्ट आणि काहीतरी करून दाखवण्याच्या जिद्दीच्या बळावर ग्रामीण भागातील या पिढीने प्रतिकुल परिस्थितीत मिळवलेले यश इतरांना निश्चितच प्रेरणा देणारे आहे. या तिघा विद्यार्थ्यांचे अभिनंदन होत आहे.

देशासाठी काहीतरी करण्यासाठी आयएएस बनण्याची माझी लहानपणापासून इच्छा आहे. पहिल्याच प्रयत्नात सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक पदाच्या परीक्षेत राज्यात दुसरा क्रमांक मिळाल्यामुळे खूप भारावले आहे. यामुळे माझे कुटुंबीय आनंदी आहेत. यापुढील काळात आयएएस बनण्याचे स्वप्न पूर्ण करणार आहे.
- प्रांजल राजेंद्र सोनवणे

Web Title: Pranjal Sonawane second in Competitive exam