मृगाच्या पावसाची वादळ, गारांसोबत समाधानकारक सलामी! 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 8 जून 2019

येवला : आज मृग नक्षत्र सुरु झाले मात्र, त्याच्या एक दिवस आधीच शुक्रवारी पावसाने जोरदार सलामी देत शेतकऱ्यासह सर्वांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवले. वादळासह गारांच्या सोबतीने आलेल्या पावसाने शहरातील दोन कांदा व्यापाऱ्यांचे शेड उडून वीस लाखांवर नुकसान झाले

येवला : आज मृग नक्षत्र सुरु झाले मात्र, त्याच्या एक दिवस आधीच शुक्रवारी पावसाने जोरदार सलामी देत शेतकऱ्यासह सर्वांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवले. वादळासह गारांच्या सोबतीने आलेल्या पावसाने शहरातील दोन कांदा व्यापाऱ्यांचे शेड उडून वीस लाखावर नुकसान झाले तर, ठिकठिकाणी झाडे उन्मळून पडली. काही ठिकाणी घरांचे पत्रे व भिंतीही पडल्या.शहरासह तालुक्यात सायंकाळी तीन तासांवर वीजपुरवठा देखील तारा तुटल्याने खंडित झाला होता. ५० लाखांवर नुकसान पहिल्याच पावसात झाल्याचा अंदाज आहे.

आज सकाळपासूनच वातावरणात बदल होऊन उष्णता तयार झाली होती. अपेक्षेप्रमाणे दुपारी ३ वाजेच्या सुमारास राजापूर ,ममदापुर परिसरात जोरदार वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस झाला त्यानंतर हा पाऊस पुढे सरकत येवल्याच्या दिशेने आला. शहर व परिसरातही सुमारे १० मिनिटे जोरदार वादळ सुरु होते. या वादळात रस्ता देखील दिसत नव्हता अशी स्थिती होती यानंतर गारांसह पावसाचे आगमन झाले. सुमारे वीस ते पंचवीस मिनिटे हा पाऊस सुरू होता. जोरदार वारे असल्याने येथील कांदा व्यापारी उमेश अटल यांच्या मनमाड रोडवरील कांद्याचे शेड उन्मळून पडले. या शेडमध्ये ठेवलेल्या कांद्यापैकी सुमारे दोन हजार क्विंटल खांदे भिजले असून शेडही पडल्याने त्यांचे दहा लाखापर्यंत नुकसान झाले आहे. तसेच संकेत पटणी यांची देखील शेड उन्मळून ४०० क्विंटल कांदे भिजल्याने पाच लाखाच्या आसपास नुकसान झाले असल्याचे सांगण्यात येत आहे.

शहरातील फात्तेबुरुज नाक्यावरील येवला कोपरगाव महामार्गावर भररस्त्यात झाड उन्मळून पडल्याने येथे दोन ते तीन तास वाहतूक विस्कळीत झाली होती तसेच पाटोदा रोडवर कृषी कार्यालया समोर एक झाड उन्मळून पडल्याने वाहतूक विस्कळीत झाली असून सुदैवाने जीवितहानी झाली नाही. आडगाव चोथवा येथे वाल्मीक किसन खोकले यांच्या घराचे पत्रे उडाले व भिंती पडल्याने त्यांचा संसार उघड्यावर आला आहे. याशिवाय बदापूर येथील शाळेचे पत्रही उडून गेले.रेंडाळे परिसरात जोरदार वादळी पावसामूळे अनेक घरांचे पत्रे उड़ाले असून एक वृद्ध जखमी झाला आहे. या पहिल्याच पावसाने वातावरणात वाढलेला प्रचंड विषमता कमी होणार असून जनावरांच्या चारा-पाण्याचा निर्माण झालेला प्रश्नही अल्पशा प्रमाणात सुटणार आहे. तसेच खरिपाच्या दृष्टीने शेतीच्या मशागतीला ही उद्यापासूनच वेग येणार आहे अजून दोन-तीन मोठे पाऊस झाले तर पूर्व भागात कपाशी मका लागवड इलाही वेग घेऊ शकणार आहे.

राजापूरला गारांसह पाऊस
राजापूरला दुपारी तीन वाजेच्या दरम्यान अचानक वादळी वार्याभसह विजांचा कडकडाट व गाराचा पाऊस सुरू झाला. यामुळे शेतकर्यां च्या चेहर्यावर हास्य दिसले.पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. चारा भिजल्याने शेतकरी वर्गाची एकच धावपळ झाली. काही ठिकाणी झाडांच्या फांद्या तूटून पडल्या आहे.वरूणराजाने हजेरी लावल्याने हरिण, मोर व वन्य प्राण्यांना पिण्यासाठी डोंगरात पाणी उपलब्ध झाले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pre monsoon Rainfall is satisfactory in yeola