लगबग येत्या नवरात्रोत्सवाची..!

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 23 सप्टेंबर 2019

जुने नाशिक​ : नवरात्रोत्सवास अवघे सात दिवस शिल्लक राहिल्याने सार्वजनिक मंडळांसह विविध प्रकारच्या खरेदीसाठी नागरिक तसेच विशेषत: महिलावर्गाची धावपळ वाढली आहे. नवरात्रीनिमित्त सार्वजनिक दांडिया उत्सवाचे आयोजन करणाऱ्या मंडळांकडून महापालिका, पोलिस प्रशासनाची परवानगी घेण्यासह स्टेज उभारणीची तयारी सुरू आहे. देवीची मूर्ती स्थापनेसाठी मंडपाची उभारणी करण्याचे काम जोरात सुरू आहे.

जुने नाशिक : रविवारी (ता. 29) घटस्थापनेने नवरात्रोत्सवास सुरवात होणार असून शहरात सर्वत्र जोरदार तयारी सुरू आहे. मंदिरांच्या रंगरंगोटीपासून ते सार्वजनिक मंडळांकडून दांडिया आयोजनाच्या तयारीस वेग आला आहे. मूर्तिकारांकडून मूर्तींवर शेवटचा हात फिरविला जात आहे. नवरात्रोत्सवास अवघे सात दिवस शिल्लक राहिल्याने सार्वजनिक मंडळांसह विविध प्रकारच्या खरेदीसाठी नागरिक तसेच विशेषत: महिलावर्गाची धावपळ वाढली आहे.

रंगीलो गरबा- दांडीयाची धूम..

नवरात्रीनिमित्त सार्वजनिक दांडिया उत्सवाचे आयोजन करणाऱ्या मंडळांकडून महापालिका, पोलिस प्रशासनाची परवानगी घेण्यासह स्टेज उभारणीची तयारी सुरू आहे. देवीची मूर्ती स्थापनेसाठी मंडपाची उभारणी करण्याचे काम जोरात सुरू आहे. शहराच्या विविध भागांत दांडियांचे धडे गिरविण्यासाठी दांडिया क्‍लास सुरू आहेत. गुजराती बांधवांकडून गरबासाठी वापरणारे मडके अन्य मडक्‍यांपेक्षा आकर्षक असते. त्यांच्यावर विशिष्ट प्रकारचे नक्षीकाम केले जाते. अशा कामातही महिलावर्ग दंग दिसून येत आहेत.

 पोलीस प्रशासनाची सुरक्षा यंत्रणा सज्ज

दुसरीकडे सार्वजनिक मंडळांसह घरोघरी स्थापना करण्यासाठी देवीच्या मूर्तीला मागणी वाढली आहे. तयार झालेल्या मूर्तींवर अखेरचा हात फिरविला जात आहे. त्याचप्रमाणे शहरातील विविध देवी मंदिरांची रंगरंगोटी केली जात आहे. दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना त्रास होणार नाही म्हणून मंदिरांच्या विश्‍वस्तांकडून मंदिर परिसरात नियोजन केले जात आहे. कालिका मंदिरासह काही महत्त्वाच्या मंदिरांच्या ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टीने सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले. पोलिस विभागाकडूनही सार्वजनिक मंडळ आणि मंदिर विश्‍वस्तांना सुरक्षेबाबत सूचना केल्या आहेत.

                  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Preparation for navratri in nashik city