प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजनेचा नाशिक जिल्ह्यातील 52 हजार मातांना लाभ

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 14 जून 2019

कळवणः प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजनेमुळे माता व बालमृत्यूचे प्रमाण कमी झाले आहे. जिल्ह्यात 62 हजार 742 मातांना लाभाचे उद्दिष्ट असताना एप्रिल 2019 अखेर 52 हजार 366 गरोदर मातांच्या खात्यांमध्ये 5 हजार रुपयांप्रमाणे मदत थेट जमा झाली आहे.

कळवणः प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजनेमुळे माता व बालमृत्यूचे प्रमाण कमी झाले आहे. जिल्ह्यात 62 हजार 742 मातांना लाभाचे उद्दिष्ट असताना एप्रिल 2019 अखेर 52 हजार 366 गरोदर मातांच्या खात्यांमध्ये 5 हजार रुपयांप्रमाणे मदत थेट जमा झाली आहे.

माता व बालकांच्या आरोग्यास संरक्षण मिळावे व बालमृत्यूचे प्रमाण कमी व्हावे, या उद्देशाने ही योजना राबवली जात आहे. लाभार्थ्यांना योजनेचा लाभ घेण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात नोंद करणे आवश्‍यक आहे. ग्रामीण भागात आर्थिक आणि सामाजिक परिस्थिती अत्यंत बिकट असल्याने महिलांनाही कुटुंबाला आर्थिक आधार द्यावा लागतो. त्यासाठी त्यांना रोजंदारीचे काम करावे लागते. परिणामी, महिलांना पुरेसा आरामही मिळत नाही. यातूनच कुपोषणाची समस्या निर्माण झाल्याने केंद्र सरकारने प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना सुरू केली. प्राथमिक आरोग्य केंद्रात नोंदणी केलेल्या स्त्रियांनाच ही योजना लागू आहे. योजनेंतर्गत 5 हजारांची रक्कम 3 टप्प्यांमध्ये लाभार्थ्यांच्या खात्यांमध्ये थेट जमा करण्यात येते. त्यात पहिला हप्ता 1 हजार रुपये गर्भवतींना प्राथमिक आरोग्य केंद्रात नोंदणी केल्यानंतर मिळतो. दुसरा हप्ता 2 हजार रुपये गर्भधारणेच्या सहाव्या महिन्यानंतर मिळतो. शेवटचा हप्ता 2 हजार रुपये स्त्री प्रसूत झाल्यानंतर मिळतो. जननी सुरक्षा योजनेंतर्गत 1 हजार रुपयांची रक्कम प्रोत्साहनात्मक मिळते. यामुळे सर्वसामान्य परिस्थितीतील गरोदर माता व बालकांना हक्काचे आरोग्यकवच मिळत आहे.

--प्रतिक्रिया--

कळवण तालुक्‍यातील तीन हजार 311 लाभार्थी महिलांच्या खात्यांत रक्कम जमा करण्यात आली. योजनेचा गरोदर माता व बालकांना निश्‍चितपणे फायदा होत असून, कुपोषित बालकांचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर कमी झाले.
-डॉ. सुधीर पाटील, तालुका वैद्यकीय अधिकारी, कळवण
---
प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजनेचा लाभ घेण्यासाठी आशा सेविकांमार्फत सर्व कागदपत्रांची पूर्तता केली. या योजनेत टप्प्याटप्प्याने मिळालेल्या आर्थिक मदतीमुळे माझे व बालकाच्या आरोग्याची काळजी घेण्यास मदत झाली.
-सुनीता दळवी, लाभार्थी, गोपालखडी

---
तालुका लाभार्थी संख्या
देवळा 2,310
सुरगाणा 2,909
कळवण 3,311
इगतपुरी 3,594
पेठ 1,750
त्र्यंबकेश्‍वर 2,405
चांदवड 2,969
दिंडोरी 4,241
बागलाण 4,946
नाशिक 3,385
निफाड 5,779
सिन्नर 3,833
येवला 2,804
मालेगाव 5,258
नांदगाव 2,652


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Prime Minister's motherhood Vandana scheme benefits 52 thousand mothers in Nashik district