बसवर "रुट बोर्ड'चा अनधिकृत वापर 

बसवर "रुट बोर्ड'चा अनधिकृत वापर 

जळगाव : ट्रॅव्हल्स वाहतूकदारांनी आरटीओचे नियम धाब्यावर बसवले असून महामंडळाच्या बसला "रुट बोर्ड' वापरले जातात तशाच स्वरूपात अनधिकृत बोर्ड तयार करून सर्रास वापर केला जातोय. "रुट बोर्ड'साठी परवानगी घ्यावी लागते, मात्र या बाबींची पूर्तता केली जात नाही. दरम्यान, यासंदर्भात परिवहन विभागाने (आरटीओ) कारवाईचे हत्यार उपसले असून बेशिस्त वाहनांना शिस्त लावण्यासाठी प्रशासनाने मोहीम सुरू केली आहे. 

टप्पा पद्धतीनुसार प्रवासी नेण्यास फक्त महामंडळाच्या गाड्यांना परवानगी असताना खासगी वाहतूकदार देखील त्याचा वापर करताना दिसताहेत. जळगाव ते भुसावळ, शेंदुर्णी, जामनेर, पाचोरा, चाळीसगाव, अशा जिल्ह्यातील सर्व ठिकाणी खासगी वाहतूक सुरू आहे. वेळोवेळी हा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. याला तात्पुरते स्वरूपात कारवाई केली जातेय. पण अधिकारी बदलला की या विषयांकडे दुर्लक्ष केले जाते. सध्या या वाहनांवर कारवाई केली जात असल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले. अजून कठोर स्वरूपात मोहीम राबवावी अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्‍त केली आहे. 

ट्रॅव्हल्सची मनमानी 
शहरातील कायदा- सुव्यवस्था तसेच वाहतूक व्यवस्थेचे आधीच वाभाडे निघत असताना त्यात ट्रॅव्हल्स धारकांची मनमानी वाढलेली आहे. शहरात महामंडळाची बस व्यवस्था तोकड्या स्वरूपात आहे त्यात रस्त्याची परिस्थिती विदारक असल्याने महामंडळाची बस वेळेवर पोहचत नाही. त्यांचे पूर्ण नियोजन कोलमडले आहे. प्रवाशांना नाइलाजास्तव खासगी वाहतुकीचा आधार घ्यावा लागतो. त्यात त्यांच्या अरेरावीचा सामना देखील प्रवासी करत असतात. अनेक गाड्यांची स्थिती ही खराब आहे अशा स्थितीत प्रशासनाने गाडीकडे लक्ष देण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. 

एसटीला आर्थिक फटका 
जळगाव परिवहन विभागात अनेक खासगी ट्रॅव्हल्स प्रवासी वाहतूक करत असल्याने त्याचा फटका एसटी महामंडळाला बसत आहे. बसच्या वेळेच्या आधी प्रवासी बसची वाट बघत असताना ट्रॅव्हल्स चालक प्रवाशांना घेऊन जातात. महामंडळाच्या बस रिकाम्या जात असतात. आर्थिक नुकसानाची झळ महामंडळाला बसत आहे. आधीच रस्त्याची दुरवस्था झाल्याने त्याचा फटका एसटीला बसत असताना त्यात खासगी वाहतूकदारांची भर पडली आहे. 

टप्पा वाहतूकही सर्रास 
प्रवासी वाहतूक करत असताना ट्रॅव्हल्सला ठरवून दिलेल्या ठिकाणीच बस थांबवता येते, मात्र जळगाव जिल्ह्यात या सर्व नियम गुंडाळून ठेवण्यात आले आहेत. प्रवास वाहतुकीत मोठ्या प्रमाणात मनमानी सुरू आहे. टप्प्याच्या ठिकाणी देखील ट्रॅव्हल्स थांबवल्या जात असल्याने त्याचा आर्थिक फटका हा महामंडळाच्या गाड्यांना बसत आहे. सर्वाधिक जळगाव ते पुणे, जळगाव ते मुंबई जाणाऱ्या ट्रॅव्हल्स आहेत. लांब पल्ल्याच्या गाड्यांना मध्ये थांबा घेण्याची परवानगी नसते. मात्र या नियमांना तुडवण्याचे काम अनेक चालक करत असतात. 

जिल्ह्यात नोंदणीकृत वाहनांची संख्या 
मिनी बस - 616 
स्लिपर ट्रॅव्हल्स - 145 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com