Dhule News: आयुक्तांकडे तक्रार करूनही प्रश्‍न सुटत नाही; मंत्रालयातील चर्चेत आमदारांची तक्रार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Dhule Municipal Corporation

Dhule News: आयुक्तांकडे तक्रार करूनही प्रश्‍न सुटत नाही; मंत्रालयातील चर्चेत आमदारांची तक्रार

धुळे : महापालिका आयुक्तांकडे वेळोवेळी तक्रार करूनही शहरात मूलभूत सोयीसुविधा मिळत नसल्याची तक्रार आमदार फारुक शाह यांनी नगरविकास विभागाच्या प्रधान सचिवांकडे केली आहे.

याअनुषंगाने प्रधान सचिव, आमदार शाह, आयुक्त देवीदास टेकाळे व अन्य अधिकाऱ्यांची मंगळवारी (ता. २१) दुपारी अडीचला मंत्रालयात संयुक्त बैठक होणार आहे. याकामी आयुक्तांना तयारीनिशी उपस्थितीची सूचना प्रधान सचिवांनी दिली आहे.

आमदार शाह यांनी सांगितले, की महापालिका शहरवासीयांना मूलभूत सुविधा पुरविण्यास असमर्थ ठरली आहे. आयुक्त आणि अन्य अधिकाऱ्यांच्या बेजबाबदार, गैरकारभारामुळे शहरवासीयांना पाणी, स्वच्छता, रस्ते, गटारी आदी मूलभूत सुविधांपासून वंचित राहावे लागत आहे.

तशी तक्रार मुख्यमंत्र्यांसह प्रधान सचिवांकडे केली होती. याअनुषंगाने नगरविकास विभागाच्या प्रधान सचिवांकडे संयुक्त बैठक होणार आहे. यासंदर्भात १२ मुद्द्यांवर आधारित पत्र प्रधान सचिवांना दिले आहे.

मनपातर्फे कार्यवाही नाही

धुळेकर विविध प्रकारचे कर भरतात. त्यापोटी महापालिका कुठल्याही प्रकारची सुविधा धुळेकरांना नियमित पुरवत नाही. त्यामुळे नागरिक वारंवार मूलभूत सोयीसुविधांबाबत तक्रारी करतात.

अशा तक्रारींना मनपा प्रशासन केराची टोपली दाखवते. मनपा आयुक्त व अन्य अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे धुळेकर त्रस्त आहेत. शहरातील मूलभूत १२ मुद्यांबाबत संदर्भीय पत्रानुसार मागणी करूनही मनपातर्फे अद्याप कोणतीही ठोस कारवाई होताना दिसत नाही. त्यामुळे प्रधान सचिव स्तरावरून प्रश्‍न मार्गी लागावे यासाठी संयुक्त बैठक घेतली जात आहे.

आमदार शाह यांची मागणी

मुबलक जलसाठा असूनही शहराला आठ ते दहा दिवसांनी पाणीपुरवठा होतो. मनपातर्फे अनियमित व अशुद्ध पाणीपुरवठा केला जातो. धुळेकरांना नियमित आणि शुद्ध जलपुरवठा व्हावा.

कचरा संकलनाच्या नावाखाली नागरिकांच्या जिवाशी सुरू असलेला खेळ बंद केला जावा. पुरेसे कचरा संकलन होत नसल्याने जागोजागी घाणीचे साम्राज्य पसरले आहे. घंटागाडी नियमित येत नसल्याने नागरिक रस्ता आणि गटारीत कचरा फेकतात. अपुऱ्या स्वच्छता कर्मचाऱ्यांअभावी आरोग्याचा प्रश्न बिकट झाला आहे.

महापालिका मोकाट जनावरांचा बंदोबस्त करू शकलेली नाही. सर्वच मुख्य रस्त्यांवर मोकाट जनावरे ठाण मांडून असतात. त्यामुळे वाहतुकीची समस्या बिकट झाली आहे. यासंदर्भात तक्रारी होऊनही प्रशासन कुठलीच उपाययोजना करत नाही.

मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त झालेला नाही. शहरात गल्लोगल्ली मोकाट कुत्र्यांची संख्या वाढली आहे. रात्रीअपरात्री मोकाट कुत्र्यांची भीती वाटत असते. याप्रश्‍नी प्रशासन ढिम्म आहे.

अतिक्रमण निर्मूलनाचा प्रश्‍न

शहरातील बंद पथदिवे तत्काळ सुरु करण्यात यावे. मोठा गाजावाजा करत वीज बिल वाचावे या हेतूने शहरात एलईडी बसविले. मात्र ते बसविल्यानंतर थोड्याच दिवसात बंद पडू लागले. त्यामुळे निम्मे शहर काळोखात असते.

अतिक्रमण निष्कासित करून शहराला मोकळा श्वास घेऊ द्यावा, अशी मागणी आहे. मुख्य रस्ते व चौक हे अतिक्रमणांनी वेढलेले आहेत. परिणामी वाहतुकीची समस्या निर्माण झाली आहे. साथीच्या आजारावर नियंत्रण करण्यास महापालिका अपयशी ठरली आहे.

महापालिकेच्या दवाखान्यात औषध पुरवठ्यात गैरप्रकार झाला आहे. औषधांअभावी अनेक भागात डेंगी आणि मलेरियाचे रुग्ण आढळत आहेत. मनपाचा आरोग्य विभाग कुचकामी ठरला आहे.. गटारी, नाल्यांची वेळोवेळी स्वच्छता केली जात नाही. शहरात वेळोवेळी धुरळणी होत नाही. नालेसफाई नियमित केली जावी.

खड्डेमय रस्त्यांची डोकेदुखी

शहर आणि देवपूर भागातील रस्ते खड्डेमय झाले आहेत. याबाबत नागरिक रोज दूषणे देतात. तरीही प्रशासनाला फरक पडत नाही. नागरिकांना मूलभूत सुविधा न पुरविता पठाणी करवसुली केली जाते.

इतर महापालिकेच्या तुलनेने धुळे महापालिकेची कर आकारणी जास्त आहे. तरीही नागरिक महापालिकेला कर अदा करीत असतात. यात पठाणी वसुली केली जात असताना मनपा सोयीसुविधा का पुरवत नाही हा प्रश्‍न आहे.

हेही वाचा: झोप नीट लागायला हवी? मग हे वाचाच

खुल्या जागा लाटल्या

मनपा मालकीच्या खुल्या जागा लाटणाऱ्या भूमाफीयांविरोधात कारवाई होताना दिसत नाही. मनपा मालकीचे अनेक भूखंड व खुल्या जागा भूमाफियांनी बळकावल्या आहेत. त्यांच्या विरोधात सक्त कारवाई करण्यात यावी.

यासंदर्भात वारंवार तक्रारी झाल्या आहेत. महापालिकेच्या शाळा बंद करण्याचे कटकारस्थान करण्यात येत आहे. शाळा दुरुस्तीसाठी मनपा निधी देत नाही. शाळांच्या जागेवर व्यापारी संकुलाचे प्रयत्न केले जात आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान संभवेल, असे आमदार शाह यांनी प्रधान सचिवांना दिलेल्या पत्रात नमूद केले आहे