चार महिन्यात पिकवली दोन लाखाची पापडी वाल 

farming
farming

इगतपुरी : एकीकडे कर्जबाजारीपणा आणि बाजारभावातील निचांकी भाव असताना, दुसरीकडे त्याच भीषण परिस्थितीत इगतपुरी तालुक्यातील गोंदे दुमाला येथील शेतकऱ्याने शेतीतील सूक्ष्म नियोजन केले. त्याने हिरवी पापडी वालाची शेती करीत शेतकऱ्यांना आदर्शवत शेतीचा धडा घालून दिल्याने त्यांचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. शांताराम जाधव, शिवाजी जाधव हे शेतकरी पूर्वी पारंपरिक पद्धतीने शेती करत. मागील वर्षी त्यांनी टॉमॉटोची लागवड केली होती. मात्र, मोठा तोटा सहन करावा लागला होता. समस्येतून वाट काढीत त्यांनी उभारी घेतली. योग्य पीक नियोजन केले. त्यातूनच परिस्थितीवर मात करीत वालाची शेती आपल्या 20 जणांच्या कुटुंबाच्या मदतीने अपार कष्टातून अक्षरश:नंदनवन फुलवले. प्रागतिक शेतीचा मार्ग त्यांनी चोखाळला, रासायनिक खतांऐवजी त्यांनी सेंद्रीय खताचा वापर केला. त्यामुळे उत्पादनात चांगलाच फरक पडला.

डबघाईला आलेल्या शेतीला पर्यायी व्यवस्था निर्माण केली. शांताराम जाधव यांना सन 2015 रोजी समाजभूषण पुरस्कार देखील मिळाला आहे. ह्या शेतकऱ्याने स्वकष्टातून साधलेली ही किमया अनेकांना प्रेरणा देणारी आहे!

केवळ जिद्दीच्या बळावर त्यांनी ठिबक सिंचन, मल्चिंग ड्रीप पद्धतीचा अवलंब करीत शेतीचा प्रयोग उभा केला आहे. दररोज वालाच्या जाळ्या घोटीला विक्रीसाठी ते नेतात. यातून त्यांना  दररोज चांगले उत्पन्न मिळत आहे. आतापर्यंत दोन लाखापर्यंत त्यांचे उत्पन्न झाले आहे. अजूनही उत्पन्न अपेक्षित असल्याचे त्यांनी सांगितले. 


गेल्या काही वर्षाच्या कालखंडात निसर्गाने शेतकऱ्यांची हवी तशी साथ दिलेली नसतांना देखील त्यांनी कोणत्याही गोष्टीची पर्वा न करता वालाची शेती जगवली आहे. इगतपुरी तालुक्यात शेतकऱ्यांपुढे अनेक संकटे उभी असतांना तालुक्यातील गोंदे दुमाला येथील शेतकऱ्यांनी खचून न जाता डबघाईला आलेली कौटुंबिक अर्थव्यवस्था सावरण्यासाठी टॉमॉटो ऐवजी वालाच्या शेतीचा नवा पर्याय निवडला. त्यातून आर्थिक घडी बसवली. त्यांच्या या प्रयोगाला यश आले. त्यामुळे त्यांच्या कष्टाला मिळालेली ती पावतीच आहे

टॉमॉटो शेतीतून मिळणारे उत्पादन, त्यासाठी लागणारा खर्च व मिळणारे बाजारभाव हे समीकरण तोट्यात चालले होते. जमिनीचा कस हा चिंतेचा विषय असताना यावर्षीपासून वालाच्या शेतीची लागवड केली आहे. बाजरभाव चांगला मिळत आहे.
 शांताराम जाधव, शिवाजी जाधव - प्रगतशील शेतकरी, गोंदे दुमाला

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com