मालमत्ता करसवलत रद्द केल्याने नऊ कोटींपेक्षा अधिक तूट

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 3 मे 2018

नाशिक - आगाऊ मालमत्ता कर अदा करणाऱ्या ग्राहकांना महापालिकेकडून करामध्ये दिली जाणारी सवलत रद्द केल्याने त्याचा फटका आर्थिक वर्षाच्या पहिल्याच महिन्यात बसला असून, सुमारे नऊ कोटी रुपयांपेक्षा अधिक महसुलात तूट दिसून येत आहे.

नाशिक - आगाऊ मालमत्ता कर अदा करणाऱ्या ग्राहकांना महापालिकेकडून करामध्ये दिली जाणारी सवलत रद्द केल्याने त्याचा फटका आर्थिक वर्षाच्या पहिल्याच महिन्यात बसला असून, सुमारे नऊ कोटी रुपयांपेक्षा अधिक महसुलात तूट दिसून येत आहे.

महापालिकेच्या उत्पन्नात वाढ करण्याबरोबरच ग्राहकांना देयके प्राप्त होण्याआधीच मालमत्ता कर भरण्यास प्रवृत्त करण्यासाठी माजी आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी करसवलत योजना लागू केली होती. त्यानुसार एप्रिलमध्ये आगाऊ कराचा भरणा केल्यास पाच, मे महिन्यात तीन, तर जूनमध्ये कर भरल्यास दोन टक्के सवलत देण्याची योजना होती. त्याव्यतिरिक्त ऑनलाइन कर भरणा करण्यासाठी प्रवृत्त करण्यासाठी अतिरिक्त एक टक्का सवलत दिली जात होती. परंतु आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सवलत योजना बंद करण्याचा निर्णय घेत तसा अध्यादेशही काढला. मागील व चालू आर्थिक वर्षाच्या एप्रिलमध्ये प्राप्त झालेल्या महसुलाची तुलना केल्यास महापालिकेला गेल्या वर्षाच्या तुलनेत नऊ कोटींपेक्षा अधिक रक्कम कमी मिळाली आहे. गेल्या वर्षी एप्रिलमध्ये अठरा कोटी ९५ लाख ६६ हजार ७८६ रुपये महसूल प्राप्त झाला होता. या वर्षाच्या एप्रिलमध्ये नऊ कोटी १८ लाख ४० हजार ५७३ रुपये महसूल प्राप्त झाला. गेल्या वर्षाच्या तुलनेत नऊ कोटी ७७ लाख २६ हजार २१३ रुपये महसूल कमी प्राप्त झाला आहे.

विभागनिहाय मालमत्ता करातील तूट (रुपयांत)
विभाग         या वर्षातील 
                  महसुलातील तूट

सातपूर        (-१,१९,४७,४५७)
पश्‍चिम      (-५,३४,२३,५३६)
पूर्व      (-१,१४,०४,६४२)
पंचवटी      (-४,७२,७२९)
सिडको      (-१,३१,७७,३७०)
नाशिक रोड  (-१,३३,१२,४७९)
एकूण      (-९,७७,२६,२१३)

Web Title: property tax concession cancel municipal loss