पर्यावरणाचे रक्षण करणारे ‘रचना’त्मक नागरिक

पर्यावरणाचे रक्षण करणारे ‘रचना’त्मक नागरिक

बदल होऊ शकतो...
वायुप्रदूषणात वाढ झाल्यावर काय परिस्थिती उद्‌भवू शकते, हे दिल्लीत दिवाळीतील स्थितीमुळे सर्वांच्याच लक्षात आले. पण तब्बल अकरा वर्षांपूर्वी महाराष्ट्र समाज सेवा संघ संस्थेच्या रचना माध्यमिक विद्यालयाने सुरू केलेल्या उपक्रमातून पर्यावरणाविषयी सजग करण्यासाठी ‘रचना’त्मक नागरिक घडविण्याचा उपक्रम हाती घेतला. रचना इकोक्‍लबद्वारे आजही विद्यार्थ्यांना पर्यावरणपूरक सण- उत्सव साजरे करण्याची शिकवण दिली जात आहे.

राष्ट्रीय हरितसेना उपक्रमांतर्गत माध्यमिक शाळांमध्ये पर्यावरण संवर्धनाशी निगडित उपक्रम राबविण्यासाठी योजना आहे. या योजनेने प्रेरित होऊन पर्यावरणविषयक जनजागृतीसोबत पर्यावरणसंवर्धन करणारी फळी निर्माण करण्यासाठी २००५ मध्ये रचना विद्यालयात रचना इकोक्‍लबला सुरवात झाली. अगदी सुरवातीपासूनच वर्षभर येणारे विविध सण-उत्सव पर्यावरणपूरक पद्धतीने कसे साजरे करावेत, याबद्दल विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले जाऊ लागले. पर्यावरणरक्षणात उद्‌भवणाऱ्या समस्या, विद्यार्थ्यांकडून त्यासंबंधी आलेले उपाय व त्याबाबतची कृती, अशा तीन स्तरांवर हा उपक्रम पार पडत होता. 

गणेशोत्सवात विसर्जनानंतर नदीत होणारे प्रदूषण रोखण्यासाठी इकोक्‍लबमार्फत विद्यार्थ्यांनी पीओपी मूर्तीला पर्याय शोधण्याचे ठरविले. कागदाच्या लगद्याची, शाडूमूर्ती घरी आणण्याचा विद्यार्थ्यांनी निर्धार केला. त्यासाठी शाडूमूर्ती कार्यशाळाही घेतली गेली. त्यापुढे जाऊन २००६-०७ ला विसर्जनस्थळी जाऊन या शाळकरी मुलांनी नाशिककरांना मूर्ती करण्याचे आवाहन केले. त्या वेळी सुरू झालेली ही चळवळ आज विस्तृत रूपात पोचली आहे. या वेळी त्यांना अनेक अडथळ्यांना सामोरे जावे लागले. मूर्तिदानाचा उपक्रम प्रथेविरोधात असून, विद्यार्थ्यांचा गैरवापर केला जात असल्याचा आरोप त्या वेळी झाला; परंतु पर्यावरणसंवर्धनाचा वसा घेतलेल्या क्‍लबने हा उपक्रम सुरू ठेवला. आज महापालिकेसह अनेक सामाजिक, शैक्षणिक संस्थांतर्फे मूर्तिदानासाठी उपक्रम राबविले जाताय. उत्सव काळातील निर्माल्य संकलन करत त्याद्वारे सेंद्रिय खतनिर्मितीचा अनोखा प्रयोग राबविला. सुमारे १२० किलो खताची निर्मिती करण्यात आली. शाळेच्या आवारातील झाडे फुलविण्यासह वाढदिवसाला रोपट्यासोबत विद्यार्थ्यांना भेट देण्यासाठी या सेंद्रिय खताचा वापर केला गेला. 

दिवाळीच्या उत्साहवर्धक वातावरणात फटाक्‍यांमुळे मोठ्या प्रमाणावर वायुप्रदूषण होत असते. या कालावधीत घराबाहेर पडणेही मुश्‍कील होईल, अशी परिस्थती निर्माण होते. दिवाळीतील या वायुप्रदूषणाला आळा घालण्याचे आवाहन रचना शाळेने स्वीकारले. त्यासाठी एका वर्गाची निवड करण्यात आली. दिवाळीत फटाके फोडायचे नाहीत, यासाठी विद्यार्थ्यांना तयार करणे तसे कठीण होते; परंतु धोके समजावून सांगत विद्यार्थीदेखील तयार झाले. पाल्याने फटाके फोडले नाहीत, असे पालकांकडून शाळेने लेखी स्वरूपात नोंदविले. हा प्रयोग राबविला तेव्हा दिवाळीत त्या एका वर्गाने तब्बल सुमारे तीन लाख रुपये तर वाचविले. सोबतच हवेत मिसळणाऱ्या विषारी वायूलाही अटकाव घातला. याशिवाय नागपंचमीतही विद्यार्थ्यांना सापांविषयी जनजागृती केली. मकरसंक्रांतीच्या वेळी धोकादायक अशा नायलॉन मांजाच्या वापराविरोधात विद्यार्थ्यांना सतर्क केले. सोबत समाजातही जनजागृती केली. अनेक अडथळ्यांवर मात करत रचना विद्यालयातील या रचना इकोक्‍लबने एक आदर्श उदाहरण निर्माण केले आहे. संस्थेच्या संस्थापिका (कै.) कुसुमताई पटवर्धन यांच्याशी प्रेरित होऊन संस्थेचे पदाधिकारी, तत्कालीन मुख्याध्यापिका मंगल धाडणकर, सुचेता येवला, प्रभारी मुख्याध्यापिका संगीता टाकळकर, प्रभारी उपमुख्याध्यापक सुनील गायकवाड व नीलेश ठाकूर यांचे उपक्रमासाठी मोलाचे योगदान राहिले.

काय केला ‘रचना’त्मक प्रयोग

- पर्यावरण संवर्धनासाठी इकोक्‍लबची स्थापना
- नदी प्रदूषण रोखण्यासाठी विद्यार्थ्यांना निर्धार
- उत्सव काळात निर्माल्यसंकलन
- वाढदिवशी विद्यार्थ्याला रोप भेट दत्तक योजना
- वायुप्रदूषण रोखण्यासाठी फटाकेमुक्त दिवाळी

असा झाला परिणाम
- अकरा वर्षांपासून पर्यावरणसंवर्धन उपक्रम
- शाडू व कागदाच्या लगद्यापासून मूर्तीनिर्मिती
- निर्माल्यसंकलनाद्वारे १२० किलो सेंद्रिय खताची निर्मिती
- फटाकेमुक्त दिवाळीमुळे तीन लाखांची बचत

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com